शार्दुल ठाकूर कसा बनला 'लॉर्ड' आणि अजिंक्य रहाणे का झाला ट्रोल?

शार्दुल ठाकूर

फोटो स्रोत, Getty Images

भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी वर्चस्व राखले. भारताने दुसऱ्या डावात 466 धावा केल्या आणि 367 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे आता इंग्लंडसमोर विजयासाठी 368 धावांचं लक्ष्य आहे.

चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने दुसऱ्या डावात बिनबाद 77 धावा केल्या होत्या. सामन्याच्या शेवटच्या दिवशी (6 सप्टेंबर) इंग्लंडसमोर विजयासाठी 291 धावांचं आहे.

भारताला विजयासाठी इंग्लंड हे लक्ष्य करण्यापूर्वीच आज दिवसभरात इंग्लंडचे सर्व गडी बाद करावे लागतील. मालिकेत दोघांची 1-1 ची बरोबरी आहे.

चौथ्या दिवशी शार्दुल ठाकूर आणि अजिंक्य रहाणे हे सर्वाधिक चर्चेत होते. रहाणे पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि पहिल्या डावात अर्धशतक (57 धावा) करणाऱ्या शार्दुल ठाकूरने दुसऱ्या डावातही अर्धशतक (60 धावा) केले.

शार्दुलने दुसऱ्या डावात केवळ 72 चेंडूत 60 धावा केल्या. शार्दुलच्या खेळाचं क्रिकेट चाहत्यांसह क्रिकेटच्या दिग्गजांनीही कौतुक केलं आणि ते सोशल मीडियावर सुद्धा ट्रेंड होऊ लागले.

माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या ट्विटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सेहवागने शार्दुलच्या अप्रतिम फलंदाजीनंतर त्याच्यासाठी 'लॉर्ड' लिहिले आणि नंतर ट्विटरवर #LordShardul ट्रेंड होण्यास सुरवात झाली.

सेहवागने शार्दुल ठाकूरचा खेळ हा शिक्षक दिनाची भेट असल्याचं म्हटलं, "लॉर्ड शार्दुल मिडिल ऑर्डरला दाखवत आहेत की फलंदाजी कशी केली जाते. शिक्षक दिनाला किती मोठी भेट आहे."

ट्विटर युजर आशुतोष सिंगने दोन्ही डावांत शार्दुलने केलेल्या अर्धशतकाबद्दल मनोरंजक ट्वीट केलं.

काही ट्विटर यूजर्सने शार्दुलच्या स्ट्रेट ड्राईव्हची तुलना सचिन तेंडुलकरच्या ड्राईव्हशी केली.

शार्दुल ठाकूरच्या डावाचे सोशल मीडियावर खूप कौतुक झाले, तर भारतीय उपकर्णधार अजिंक्य रहाणेला ट्रोल करण्यात आलं.

रहाणेचा खराब फॉर्म कायम असून ओव्हलवर इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीही त्याला चांगला खेळ दाखवता आला नाही.

फोटो स्रोत, Reuters

भारतीय संघ पहिल्या डावात 191 धावांत गारद झाला होता. रहाणेसह संघातील अव्वल फळीतील उर्वरित फलंदाज ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात अपयशी ठरले. मात्र सलामीवीर रोहित शर्मासह इतर अव्वल फळीतील फलंदाजांनी दुसऱ्या डावात त्याची भरपाई करण्यात यश मिळवले.

रोहित शर्माने शतक केलं. तो 127 धावांवर बाद झाला. पहिल्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या डावात 44 धावा केल्या.

रहाणे पुन्हा अपयशी

पहिल्या डावात 14 धावा करणाऱ्या रहाणेला दुसऱ्या डावात आपले खातेही उघडता आले नाही. तो केवळ आठ चेंडू खेळू शकला. तो एकही रन न काढता ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू झाला.

त्यानंतर चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. लवकरच तोही ट्विटरच्या टॉप ट्रेंडमध्ये सामील झाला. रहाणे इंग्लंड दौऱ्यात सातत्याने अपयशी ठरत आहे.

त्याने चार कसोटी सामन्यांच्या सात डावांत फक्त एक अर्धशतक झळकावले आहे. नॉटिंगहॅम कसोटीत त्याने पाच, लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात एक आणि दुसऱ्या डावात 61. तर लीड्स कसोटीच्याही पहिल्या डावात 18 आणि दुसऱ्या डावात 10 धावा केल्या.

लीड्स येथे भारताला एक डाव आणि 76 धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. रहाणेने चार कसोटीसामन्यांत एकूण 109 धावा केल्या आहेत.

ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या डावात रहाणे बाद झाल्यानंतर ट्विटर रमेश श्रीवत्स यांनी लिहिले की, "रहाणे इतक्या खराब फॉर्ममध्ये आहे की, पुढच्या सामन्यात एखादा गोलंदाज त्याची जागा घेईल."

"रोहित 50च्या जवळपास असताना त्याचे चाहते नर्व्हस होतात. कोहलीचे चाहते 40 धावा करताना नर्व्हस असतात. रहाणेचे चाहते जेव्हा त्याला फलंदाजीसाठी येताना पाहतात तेव्हाच नर्व्हस असतात." असे उदित नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने लिहिले आहे.

काही ट्विटर वापरकर्त्यांनी रहाणेला निवृत्त होण्याचा सल्ला दिला, तर काही वापरकर्त्यांनी त्याची जागा घेऊ शकणाऱ्या खेळाडूंची नावे सुचवायला सुरुवात केली.

ट्विटर हँडल कॉमन क्रिकेटने रहाणे आणि फिरकी गोलंदाज आर अश्विनच्या गेल्या काही डावातील आकडेवारीची तुलना केली आणि अश्विन एक चांगला फलंदाज असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला.

आर अश्विनला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अद्याप एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही आणि अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी त्याच्याबाबत विचारणा केली आहे. अश्विन हा सध्याच्या संघातील सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 413 बळी घेतले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)