बेळगाव मनपा : भाजपची एकहाती सत्ता, महाराष्ट्र एकीकरण समितीला फक्त 2 जागा

  • स्वाती पाटील
  • बीबीसी मराठी
बेळगाव

फोटो स्रोत, Swati Patil/BBC

बेळगाव महापालिकेच्या निकालाचं चित्र स्पष्ट झालंय. भाजपनं बेळगाव महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवलीय, तर महाराष्ट्र एकीकरण समितीनं सपाटून मार खाल्ल्याचं निकालातून स्पष्ट झालंय.

1984 सालापासून काही अपवाद वगळता बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीच वर्चस्व होतं. पण हे वर्चस्व भाजपने मोडीत काढलंय.

बेळगाव महापालिकेच्या एकूण 58 जागांपैकी फक्त दोन जागांवर महाराष्ट्र एकीकरण समितीला यश मिळालंय, तर भाजपने तब्बल 35 जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं.

बेळगाव महापालिकेत कुठला पक्ष किती जागांवर विजयी?

  • भाजप - 35
  • महाराष्ट्र एकीकरण समिती - 2
  • काँग्रेस - 9
  • एमआयएम - 1
  • अपक्ष - 11

विशेष म्हणजे, भाजप पहिल्यांदाच बेळगाव महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती.

बेळगाव महापालिका निवडणूक आजवर भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावर लढवली गेली होती. मात्र यंदा पहिल्यांदाच राजकीय पक्ष या निवडणुकीत आपापल्या चिन्हांवर रिंगणात उतरले होते.

भाजपनं सर्व 58 जागांवर उमेदवार उभे केले होते; तर महाराष्ट्र एकीकरण समितीने 23, काँग्रेसने 39 आणि आपने 24 जागांवर उमेदवार दिले होते. शिवाय एमआयएम, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी देखील आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते.

फोटो कॅप्शन,

याच ठिकाणी सध्या बेळगाव महापालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे.

मात्र महाराष्ट्र एकीकरण समिती आणि भाजप यांच्यातच चुरशीची लढत झाल्याची पाहायला मिळाली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक उमेदवार अवघ्या काही मतांच्या फरकाने पराभूत झाल्याचं चित्र आहे.

राजकीय पक्ष निवडणूक रिंगणात उतरल्याने साम-दाम-दंड-भेद अशा गोष्टींचा पुरेपूर वापर झाल्याची चर्चा बेळगावमध्ये आहे. काही वर्षांचा अपवाद सोडला तर बेळगाव महापालिकेवर कायम महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता होती. यंदा मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीला भाजपनं जोरदार दणका दिल्याचं चित्र आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)