हिंदी दिन : मराठी मुलं कॉलेजमध्ये हिंदीत का बोलतात?

  • दीपाली जगताप
  • बीबीसी मराठी
कॉलेजची मुलं

फोटो स्रोत, Getty Images / Mayur Kakade

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक छायाचित्र

तुम्ही मराठी आहात ना, मग एकमेकांशी हिंदीत का बोलत आहात? असा प्रश्न विचारण्याची वेळ तुमच्यावर सुद्धा कधी ना कधी आली असावी.

पण कॉलेजमध्ये मराठी मुलं मराठीत न बोलता हिंदीत बोलण्याचा ट्रेंड हल्ली दिसत आहे? शाळा-कॉलेजांमध्ये हिंदी बोलण्याची 'स्टाईल' आहे की मराठी भाषेचा न्यूनगंड याला कारणीभूत आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

"आम्ही बहिणी मराठी असूनही घरी एकमेकींशी हिंदीत बोलतो. शाळेत असल्यापासूनच हिंदी बोलायची सवय लागली. घरातले सगळे मराठी बोलतात. आम्ही बाकी सगळ्यांशी मराठीत बोलतो पण एकमेकींशी मात्र हिंदीत संवाद साधतो," साठ्ये महाविद्यालयात शिकणारी सुजाता अंगारखे सांगत होती.

तर अजय माने सांगतात, "एका प्रकारचीच मराठी तुम्ही बोलली पाहिजे असा आग्रह धरला जातो. यातून न्यूनगंड जन्माला येतो आणि मग हिंदी भाषा सोयीची वाटू लागते."

असे अनेक अनुभव मराठीजन सांगतात.

'आम्हाला मराठी येतं, पण…'

"तुम्ही काय हिंदी भाषिक आहात का? महाराष्ट्रीय असून मराठी येत नाही? मराठीत बोलताना लाज वाटते का तुम्हाला? असे अनेक प्रश्न लोक आम्हाला विचारतात. आमच्या घरातलेसुद्धा ओरडतात. पण आम्ही शाळेत होतो तेव्हा हिंदी आणि मराठी भाषिक एकत्र शिकलो. तेव्हापासून सगळ्यांशीच हिंदीत बोलायची सवय लागली. अनेकांना वाटतं स्टाईल म्हणून बोलतो पण तसं नाहीये."

आम्ही मराठी मुलं एकमेकांशी मराठीत बोलू, असाही प्रयत्न केला पण सवय झाल्याने एकमेकांसमोर आल्यानंतर हिंदी शब्दच ओठांवर येतात असंही सुजाता सांगते.

हा केवळ सुजाता आणि तिची बहीण विशाखाचा अनुभव नाही, तर मोठ्या संख्येने मराठी मुलं हिंदीत बोलताना आढळतात.

शाळा आणि महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये तर सर्रास मुलं इंग्रजी किंवा हिंदीतच बोलताना आढळतात. "महाविद्यालयात विविध भाषिक एकत्र शिकत असतात. त्यात शिक्षण इंग्रजीत दिलं जातं. त्यामुळे इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेली मुलं एकतर इंग्रजी बोलतात किंवा हिंदी. संवाद साधण्यासाठी समोरच्या व्यक्तीला मराठी येत असेल याची खात्री नसते आणि आपल्याला इंग्रजी येत नसेल तर हिंदीतून बोलण्याची सुरुवात होते," असं अजय माने सांगतो.

फोटो स्रोत, Getty Images / Mayur Kakade

तो म्हणाला, "मी आणि माझी मैत्रीण कल्याणी आम्ही महाविद्यालयात एकमेकांना पहिल्यांदा भेटलो. पण मातृभाषा माहिती नसल्याने हिंदीत बोलायला सुरुवात केली. मग कळालं की आपण दोघंही मराठी आहोत. पण आज अनेक वर्षं उलटली तरी 'हाय! किधर है?' यानेच संवाद सुरू होतो."

हिंदी भाषेचा प्रभाव हा 'पॉप्युलर कल्चर'चा भाग आहे असं भाषातज्ज्ञ गणेश देवी सांगतात.

ते म्हणाले, "हल्ली दोन बंगाली माणसं भेटली की ते इंग्रजीतून बोलतात. त्यांना बंगाली भाषा लिहिता, बोलता येते. पण तरीही ते इंग्रजीतून बोलतात. तसंच महाराष्ट्रातही आहे. हिंदी भाषा ही सिस्टमचा भाग आहे. शुद्ध हिंदी देशात बोलण्यात कुठेच अस्तित्वात नाही. म्हणूनच त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होऊ शकला. कारण त्यात अनेक भाषांना स्थान मिळत गेलं."

व्हीडिओ कॅप्शन,

अमेरिकेने विद्यार्थी व्हिसा नियम बदल झाल्याचा भारतीयांना फायदा कसा?

महाराष्ट्रात 50 हून अधिक बोलीभाषा आहेत. मालवणी, घाटावरची, अहिराणी, आगरी, वऱ्हाडी तर आदिवासींमध्ये कातकरी, कोरकू अशा अनेक बोली भाषा आहेत. त्यामुळे ज्या भागात आपण लहानाचे मोठे होतो त्याठिकाणची स्थानिक भाषा आणि घरात बोलली जाणारी मातृभाषा याचाही आपल्या भाषेवर मोठा प्रभाव असतो असं लेखिका शुभदा चौकर सांगतात.

त्यांनी सांगितलं, "मुलं शाळेत मराठी भाषा शिकत असले तरी त्यांच्या घरी कशा पद्धतीने मराठी किंवा बोलीभाषा बोलली जाते त्याचा त्यांच्या भाषेवर प्रभाव दिसून येतो. इंग्रजी सर्वांना येतेच असं नाही. पण हिंदी येतच असणार असं गृहीत धरलं जातं. मग जिथे अमराठी लोकसंख्या आहे तिथे सहज गप्पा मारता येतील यासाठी हिंदी भाषा वापरली जाते. याची सवय होते आणि मग मराठी लोक सुद्धा हिंदीत बोलू लागतात."

फोटो स्रोत, Getty Images /GCShutter

'मुंबईय्या' हिंदी तर स्वतंत्र भाषा आहे की काय असा प्रश्न पडतो असंही त्या म्हणाल्या. मुंबईत रिक्षावाला, भाजीवाला, ट्रेनमध्ये, शहरात कुठेही कशीही हिंदी बोलली जाते आणि ती खपवून सुद्धा घेतली जाते. त्यामुळे हे एक कारण असू शकतं की हिंदी बोलण्याकडे अधिक कल असतो.

'प्रमाणभाषेचा आग्रह नको, पण शिकणे आवश्यक'

"मी दलित आहे. माझं मराठी शुद्ध नाही, उच्चार स्पष्ट नाहीत असं मला सांगितलं जातं. यामुळे वाद-विवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेतही मला डावलण्यात आलं. मला सहभाग घेऊ दिला जात नव्हता. त्यांच्या प्रमाण भाषेनुसार मराठी बोलण्याचा आग्रह धरला जातो. यातून न्यूनगंड जन्माला येतो आणि मग हिंदी भाषा सोयीची वाटू लागते," असा अनुभव अजय माने यांनी सांगितला.

याला अनेक कारणं आहेत असंही तो सांगतो. "शाळांमध्ये शिक्षक प्रत्येक मुलाची भाषा पाहून त्याला स्वतंत्र शिकवण्याकडे तेवढं लक्ष देत नाहीत. शिक्षक सुद्धा राज्याच्या विविध भागातून येतात. त्यामुळे त्यांच्या मराठी भाषेला स्थानिक भाषेचा लहजा असतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीची भाषा आणि बोलण्याचा सूर याला अनेक पैलू कारणीभूत असतात.

मग प्रमाण भाषा कोणती मानायची? आणि त्याचा आग्रह का धरायचा?" असाही प्रश्न त्याने उपस्थित केला.

फोटो स्रोत, Raju Sanadi, Karad

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

तो पुढे सांगतो, "मराठी साहित्यातही विविध प्रकारच्या भाषा आढळतात. आपण म्हणतो शाहिरांनी महाराष्ट्र गाजवला, मग त्यांची भाषा कुठे आहे? अण्णाभाऊ साठे, दलित पँथरचे साहित्य, नेमाडे यांच्या साहित्याचे काय? ती प्रमाण भाषा नाही का? प्रत्येक भागात वेगळी संस्कृती आहे. मग त्याचेही प्रमाण भाषेत भाषांतर कसं करणार आहात? अशा सर्व कारणांमुळे हिंदीचा प्रभाव वाढतो. हिंदी अधिक सोयीची वाटू लागते."

यासंदर्भात बोलताना शुभदा चौकर सांगतात, "बोलीभाषेचा लहजा मुलांच्या मराठीत दिसतो. जेव्हा ही मुलं शहरात किंवा विद्यापीठात शिक्षणासाठी जातात तेव्हा त्यांना आपली बोली भाषा इतरांपेक्षा वेगळी वाटते. त्यांना चिडवलं जात असेल. त्यामुळे मुलांमध्ये मराठी भाषेविषयी एक धारणा निर्माण होते. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मराठी बोलताना शब्द चुकला किंवा वेगळ्या पद्धतीने बोलला तर लगेच कोणीतरी हटकतं. कसं मराठी बोलतो? असं म्हटलं जातं. मग त्यापेक्षा हिंदी बरी असंही मुलांना वाटू शकतं."

पण मराठीला प्रमाण भाषा आहे आणि ती शिकली पाहिजे असंही शुभदा चौकर यांना वाटतं. त्या म्हणाल्या, "प्रत्येक भाषेला प्रमाण भाषा आहे. तशीच ती मराठीलाही आहे. हळूहळू का होईना पण आपण प्रमाण भाषा शिकायला हवी. अगदी लहान मुलांना त्याचा आग्रह धरू नये पण माध्यमिक शिक्षण सुरू झाल्यानंतर शालेय शिक्षकांनीही मुलांची मराठी भाषा आणि उच्चारण याकडे लक्ष द्यायला हवं. याचा मुलांना उच्च शिक्षण आणि त्यापुढे फायदा होईल. त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होणार नाही."

हिंदी सिनेमांचा प्रभाव

महाराष्ट्रात अगदी 70-80 च्या दशकापासून मराठीजनांवर हिंदी सिनमांचा प्रचंड प्रभाव दिसून येतो. त्यात मुंबईत हिंदी सिनेमाचं बहुतांश काम चालतं त्यामुळे महाराष्ट्रात याची हिंदी भाषेची वृद्धी झाल्याचं जाणकार सांगतात. बॉलीवूडचे सिनेमे, कलाकारांचं माहेरघर मुंबई आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हिंदी सिनेमा आणि कालांतराने हिंदी टीव्ही चॅनेल्स याचंही प्रमाण वाढलं.

गणेश देवी सांगतात, "हिंदी सिनेमांमुळे ही भाषा सहज स्वीकारली गेली. हिंदी गाण्यांमुळे भाषा लोकप्रिय झाली, त्याचा विस्तार वाढला. असे अनेक प्रसंग असतात, ज्याचे वर्णन सहज हिंदीतून केलं जातं. किंबहुना, त्याची अभिव्यक्ती हिंदीतून नीट होऊ शकते. उदाहरणार्थ, आपण गाडी सुटल्यानंतर 'चलो चलो' असं म्हणतो. तसंच पुरे म्हणण्याऐवजी बास असं म्हणतो. बास हा शब्द हिंदी आणणि पर्शीयन आहे."

फोटो स्रोत, Getty Images

मुंबईत संमिश्र लोकवस्ती आहे. पूर्वीपासूनच मुंबईत व्यवसाय अमराठी लोकांकडे आहेत. त्यामुळे मुंबईत हिंदीचा प्रभाव अधिक आहेच. पण ग्रामीण भागांपर्यंत हिंदी पोहचण्याचं महत्त्वाचं माध्यम म्हणजे हिंदी सिनेमा आणि मालिका आहेत असंही दिसून येतं.

शुभदा चौकर सांगतात, "हिंदी टीव्ही चॅनेल्स, हिंदी सिनेमा यातील भाषेचा प्रभाव मुलांवर आहे. सिनेमांमधून लहानपणापासून मुलांनी हिंदी भाषा ऐकलेली असते. त्यामुळे त्याची किमान शब्दसंपदा त्यांच्याकडे असते. तिथून हिंदीचा आत्मविश्वास निर्माण होतो. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात हिंदी कशीही बोलली तरी ती स्वीकारली जाते."

महाराष्ट्रात किती टक्के हिंदी भाषा बोलली जाते?

भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार, भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा क्रमांक तिसरा आहे. महाराष्ट्रामध्ये 69 टक्के लोक मराठी भाषा तर 13 टक्के लोक हिंदी बोलतात, असं ही आकडेवारी सांगते. या सर्वेक्षणात 41 टक्के लोकांनी आपली भाषा हिंदी आहे, असं म्हटलं. म्हणजे भारतात सुमारे 60 टक्के लोक हिंदी सोडून इतर भाषा बोलतात.

हे सर्वेक्षण मातृभाषा या निकषावर आधारित आहे. मातृभाषा म्हणजे 'त्या व्यक्तीने आईकडून शिकलेली भाषा' अशी व्याख्या करण्यात आली आहे. त्या व्यक्तीच्या आईचा तिच्या बालपणातच मृत्यू झाला असेल तर मग तिच्या घरात बोलली जाणारी भाषा मातृभाषा म्हणून धरली जाते. या निकषांनुसार सगळ्या भाषांची क्रमवारी ठरवण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Anushree Fadnavis/ Indus Images

फोटो कॅप्शन,

डॉ. गणेश देवी हे प्रख्यात भाषातज्ज्ञ आहेत.

भारतात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली, झारखंड या 10 राज्यांमध्ये हिंदी बोलली जाते. त्यासोबतच मध्य प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान या राज्यांमध्ये स्वतंत्रपणे बोलल्या जाणाऱ्या भाषा या हिंदीच्या पोटभाषा म्हणून दाखवण्यात आल्या आहेत. अवधी, बगाती, बंजारी, भोजपुरी, गढवाली या भाषांना स्वतंत्र स्थान असलं तरी त्या भाषा हिंदीच्या पोटभाषा म्हणून दाखवल्याने हिंदीभाषिकांचं प्रमाण वाढलं आहे, असं गणेश देवी यांचं म्हणणं आहे.

गणेश देवी यांच्या मते, "हिंदीची वाढ महाराष्ट्र, भारतातच नाही तर जगभर झाली आहे. जगभरातल्या 60 देशांनी हिंदी भाषेला तिथली अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली आहे. हिंदी भाषेच्या या वृद्धीमध्ये हिंदी सिनेमाचा वाटा मोठा आहे. त्यामुळे अर्थातच महाराष्ट्रात हिंदी ही दुसऱ्या क्रमाकांची भाषा आहे. मराठी आणि हिंदीमध्ये 70 टक्के शब्द समान आहेत हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)