विराट कोहलीच भारतीय संघाचा कर्णधार, रोहित शर्माकडे कर्णधारपद जाण्याच्या चर्चांना BCCI चा पूर्णविराम

विराट कोहली, आयसीसी

फोटो स्रोत, Morne De Klerk-ICC

फोटो कॅप्शन,

विराट कोहलीच भारतीय टीमचा कर्णधार असेल, असं BCCIने स्पष्ट केलंय.

भारतीय क्रिकेट संघाचा व्हाईट बॉल कॅप्टन रोहित शर्मा असेल, या चर्चांना बीसीसीआयनं पूर्णविराम दिलाय.

विराट कोहलीच भारतीय संघाचा कर्णधार असेल असं बीसीसीआयचे खजिनदार अरूण धुमाळ यांनी म्हटलंय. IANS वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलंय.

कर्णधारपद रोहित शर्माकडे जाणार नसून विराट कोहलीच क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटसाठी भारताचा कर्णधार राहणार असल्याचं बीसीसीआयचे खजिनदार अरूण धुमाळ यांनी IANS शी बोलताना सांगितलं.

IANS शी बोलताना धुमाळ म्हणाले, "हे सगळं खोटं आहे. असं काहीही केलं जाणार नाही. ही फक्त मीडियामध्ये सुरु असलेली चर्चा आहे. या मुद्द्यावर BCCIची कोणतीही बैठक वा चर्चा झालेली नाही. विराटच सगळ्या फॉरमॅटसाठीचा कॅप्टन असेल."

कर्णधार आणि फलंदाज म्हणूनही विराट कोहलीचा फॉर्म गेले काही दिवस चांगला नाही, ऐन मोक्याच्या क्षणी विराट कोहली आपल्या नावाला साजेशी कामगिरी करू न शकल्याने संघ अडचणीत आल्याने त्यावरून चर्चांना सुरुवात झाली होती.

मैदानावरच्या त्याच्या आक्रमकपणावरही चर्चा झाली होती.

विराटच्या फलंदाजीतल्या अपयशामुळे भारतीय फलंदाजी फळीवर अनपेक्षित दबाव निर्माण होतो.

कधीकाळी खोऱ्याने धावा ओढणाऱ्या विराट कोहलीच्या गेल्या काही दिवसांतील आकडेवारीवर नजर मारल्यास हा फरक लक्षात येऊ शकतो.

विराट कोहलीच्या बॅटमधून शेवटचं शतक नोव्हेंबर 2019 मध्ये नोंदवलं गेलं. त्यानंतर क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये 51 डावांत विराट एकही शतक झळकावू शकला नाही.

फोटो स्रोत, Gareth Copley-ICC

फोटो कॅप्शन,

विराट कोहली

इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या सामन्यात लॉर्ड्स मैदानावर ऐतिहासिक विजय संपादित केल्यानंतर पुढच्याच सामन्यात हेडिंग्ले मैदानावर भारताला दारूण पराभव स्वीकारावा लागला.

बीबीसी मराठीच्या पराग फाटक यांनी केलेलं विश्लेषण

विराट कोहलीचा प्युअर बॅट्समन म्हणून रेकॉर्ड अफलातून आहे, पण कॅप्टन म्हणून त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. 2019 वर्ल्डकपनंतर वनडे आणि ट्वेन्टी 20 कॅप्टन्सी रोहितला द्यावी असा विचार पुढे आला होता.

कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाला ICC ट्रॉफी जिंकता आलेली नाही. कोहली आयपीएल स्पर्धेत बेंगळुरूचा गेली 8-9 वर्ष कॅप्टन आहे. पण तिथेही त्याच्या नेतृत्वात RCBला जेतेपद पटकावता आलेलं नाही. दुसरीकडे रोहितचा आयपीएलमध्ये कॅप्टन म्हणून रेकॉर्ड जबरदस्त आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने आयपीएलची 5 जेतेपदं पटकावली आहेत.

फोटो स्रोत, LAKRUWAN WANNIARACHCHI/AFP/Getty Image

फोटो कॅप्शन,

रोहित शर्मा

यासाठी त्याची स्वभाववैशिष्ट्यंही महत्त्वाची ठरतात. रोहित कुशल मॅन मॅनेजर आहे. शांत आहे. टॅक्टिकली श्रूड आहे. अनेक खेळाडूंचा तो मित्र आहे, त्यांचं करिअर घडण्यात रोहितचा मोलाचा वाटा आहे. रोहितचा वनडे आणि ट्वेन्टी-20 मध्ये बॅट्समन म्हणून रेकॉर्ड जबरी आहे.

एक्स्प्रेसचे स्पोर्टस एडिटर संदीप द्विवेदी यांच्या बातमीतून रोहित शॉर्ट फॉरमॅट कॅप्टन होईल असे संकेत दिसले होते. या नरेटिव्हला अरुण धुमाळ यांनी नाकारलं पण बीसीसीआयची सध्या सगळी सूत्रं जय शहा आणि सौरव गांगुली यांच्याकडे आहेत. पुढच्या महिन्यात ट्वेन्टी-20 वर्ल्डकप आहे. कोहलीकडे कॅप्टन म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याची जबाबदारी आहे.

2019 पासून कोहलीचा बॅट्समन म्हणून फॉर्म घसरणीला लागला आहे. बॅटिंगवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कोहली वनडे आणि ट्वेन्टी20 कॅप्टन्सी सोडू शकतो.

इंग्लंड दौऱ्यातली पाचवी टेस्ट कॅन्सल करण्यात रोहितची मेजर भूमिका होती. प्रत्यक्षात टेस्ट मध्ये रहाणे व्हाईस कॅप्टन आहे पण कोहलीच्या बरोबरीने रोहितने बीसीसीआयला टेस्ट कॅन्सल करायला लावली.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)