उत्तर प्रदेश निवडणूक: प्रियंका गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस लढणार - सलमान खुर्शीद #5मोठ्याबातम्या

प्रियंका

फोटो स्रोत, Getty Images

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1) 'उत्तर प्रदेशात प्रियंका गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस लढणार'

"उत्तर प्रदेशात काँग्रेस कुणासोबतच आघाडी करणार नाही. प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक लढेल," अशी माहिती भारताचे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी दिली. इंडिया टुडेने ही बातमी प्रसिद्ध केलीय.

उत्तर प्रदेशच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे तेथील राजकीय घडामोडीही वाढण्यास सुरुवात झालीय. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात काँग्रेसचं काम करताना दिसत आहेत.

सलमान खुर्शीद पुढे म्हणाले की, "उत्तर प्रदेशात काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, हे ठरवण्यात आलं नाहीये. मात्र, आम्ही सर्व 403 जागा लढवू."

फोटो स्रोत, Getty Images

खुर्शीद हे काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या कामानिमित्त आग्र्यात गेले होते. तिथं त्यांनी हे वक्तव्य केलं.

काँग्रेसचा जाहीरनामा कुठल्या तज्ज्ञांच्या शिफारशींवर नव्हे, तर सर्वसामान्य लोकांच्या शिफारशींवर आधारलेला असेल, असंही ते यावेळी म्हणाले.

2) इन्फोसिसला 'देशद्रोही' म्हणणं अयोग्य - निर्मला सीतारामण

इन्फोसिस कंपनीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) पुरस्कृत 'पान्चजन्य' मासिकात लिहिलेल्या लेखात, कंपनीला 'देशद्रोही' म्हटलं गेलं. त्यानंतर अनेक उलट-सुलट प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. आता भाजप नेत्या आणि भारताच्या अर्थमंत्र्यांनीच यावर भाष्य केलंय.

आयकर विभागाच्या वेबसाईटमधील अडथळ्यामागे इन्फोसिसचा हात असल्याचा आरोप या लेखात करण्यात आला होता.

त्यावर बोलताना भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या, "ते बरोबर नव्हतं. मला वाटतंय त्यांनी (RSS) त्या लेखापासून स्वत:ला वेगळं केलंय. ते कुठल्याही स्थितीत बरोबर नव्हतं."

सीएनएन न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी याविषयावर आपले विचार मांडले.

केंद्र सरकार आणि इन्फोसिस सोबत काम करतंय आणि आयकर विभागाच्या वेबासाईटवरील अडथळे दूर करण्याचं काम सुरू आहे, असंही सीतारामण यांनी स्पष्ट केलं.

3) …तर मोदींचं सरकारही पाडलं जाऊ शकतं - अण्णा हजारे

लोकायुक्ताच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्याचा इशारा दिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता देशपातळीवर संघटना बांधणीचे काम सुरू केलं आहे.

भारतातील 14 राज्यांमधून आलेल्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण शिबिर राळेगणसिद्धीमध्ये झालं.

यावेळी बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, "कोणत्याही पक्षाच्या हाती देशाचे उज्ज्वल भवितव्य नाही. सगळे सत्ता आणि पैशांच्या मागे धावत आहेत. अशा परिस्थितीत जनसंसद मजबूत झाली पाहिजे."

फोटो स्रोत, Getty Images

"या माध्यमातून लोक जागे झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकारही पाडले जाऊ शकते," असं ते म्हणाले. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

तसंच, दीर्घकालीन नियोजन करून कामाला लागण्याच्या सूचनाही अण्णा हजारेंनी कार्यकर्त्यांना दिल्या.

4) अनिल देशमुखांच्या शोधासाठी ED ने मागितली CBI ची मदत

मुंबईचे माजी पोलीस आयुक्तांच्या पत्राचं प्रकरण आता अनिल देशमुखांच्या शोधापर्यंत पोहोचलं आहे.

100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने अनेकदा समन्स बजावले आहेत. असं असूनही देशमुख मात्र चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर होत नाहीत.

फोटो स्रोत, FACEBOOK/ANIL DESHMUKH

त्याचबरोबर ईडी अधिकाऱ्यांना अनिल देशमुख कुठे आहेत? याचा थांगपत्ताही लागत नाही.

त्यामुळे अनिल देशमुखांच्या शोधासाठी आता ईडीने केंद्रीय तपास यंत्रणा अर्थात सीबीआयची मदत मागितली आहे. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिली आहे.

5) 'ऑफर असूनही पैसे न घेता पक्षप्रवेश केला, तरी मंत्रिपद दिलं नाही'

कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदार श्रीमंत पाटील यांच्या वक्तव्यानं कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय.

"मी भाजपची पैशांची ऑफर न घेता पक्षात आलोय. मला पैसे नकोय, तर मला केवळ मंत्रिपद पाहिजे होतं. मात्र, मागणी करूनही मला मंत्रिपद देण्यात आलं नाही," असं भाजप आमदार श्रीमंत पाटील म्हणाले. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

"मला माहित नाही की मला सध्याच्या सरकारमध्ये मंत्रिपद का दिले गेले नाही. पण पुढील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद देण्यात येईल, असं आश्वासन मला देण्यात आलंय. यासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी माझं बोलणं झालंय," असंही पाटील यांनी सांगितलं.

श्रीमंत पाटील हे कर्नाटकातील कागवाड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते काँग्रेस आणि जनता दल-सेक्युलर (जेडीएस) मधून भाजपमध्ये सामील झालेल्या 16 आमदारांपैकी एक आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)