किरीट सोमय्यांनी रश्मी ठाकरेंवर केलेले आरोप भाजपाच्या फायद्याचे की बूमरँग होतील?

  • मयुरेश कोण्णूर
  • बीबीसी मराठी
रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रिफ यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे आणि त्यांची तक्रार करण्यासाठी ते कोल्हापूरला निघाले असताना घडलेल्या नाट्यामुळे ते चर्चेत आहेत.

सोमय्या मुंबईला परत आले तरीही आपण आता थांबणार नाही असं त्यांनी जाहीर केलं. या सरकारविरोधात आता आपलं पुढचं लक्ष्य कोण कोण असणार हेही त्यांनी जाहीर केलं. ज्यात एक नाव आहे रश्मी उद्धव ठाकरे.

सोमय्या यांनी असं म्हटलं आहे की, पुढच्या आठवड्यात मंगळवारी ते रायगड जिल्ह्याला भेट देणार आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी यांच्या आहेत असा कथित आरोप ज्या जमिनी आणि मालमत्तांबद्दल होतो तिथं जाऊन ते भेट देणार आहेत. या मालमत्तांबद्दलचे आरोप यापूर्वीही संजय निरुपम आणि सोमय्या यांच्यासारख्या विरोधकांकडून झाले आहेत.

पण 'महाविकास आघाडी'चं सरकार आल्यावर ठाकरे आणि शिवसेनेसोबतचा त्यांचा संघर्ष गेल्या काही दिवसांत अधिक तीव्र करणारे किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांना टारगेट करणं याचे अर्थ आणि परिणाम निराळे आहेत.

रश्मी ठाकरेंवर आरोप म्हणजे मुख्यमंत्र्यांवर आणि ठाकरे घराण्यावर आरोप हे स्पष्ट आहे. शिवसेनेच्या वा महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्यावर केलेल्या आरोपांपेक्षा त्याचे अर्थ वेगळे आहेत. गांभीर्यही अधिक आहे.

त्यामुळे सध्याच्या सरकारच्या शीर्ष नेतृत्वावर अशी टीका केल्यावर विरोधी पक्ष भाजपा या सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करेल आणि त्याचा परिणाम या सरकारचा जनाधार कमी होण्यात होईल, की ठाकरेंवरच्या हल्ल्यानं शिवसैनिक अधिक आक्रमक होऊन त्याचा फायदा सेनेला होईल, असा प्रश्न आहे.

रश्मी ठाकरे आणि जमिनीचा वाद

पडद्यामागून शिवसेनेची सूत्रं रश्मी ठाकरेच हलवतात असं त्यांच्याबद्दल कायम बोललं जातं तरीही रश्मी ठाकरे या कायम प्रसिद्दीपासून दूर असतात.

परिणामी, त्या कोणत्याही वादांपासूनही दूर राहतात. पण असं नाही आहे की त्यांचं नाव कधी वादात ओढलं गेलं नाही. रायगडमधल्या कोर्लईतल्या ज्या जमिनी आणि मालमत्तांचा विषय किरीट सोमय्यांनी काढला आहे, ते प्रकरण गेली काही वर्षं चर्चेत आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

2016 मध्ये पहिल्यांदा मुंबई कॉंग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी आरोप केला होता की कोर्लई येथे रश्मी ठाकरे आणि सेनेचे मंत्री रविंद्र वायकर यांच्या पत्नी यांनी मिळून जवळपास 42.2 एकर जमिन, जिची त्याकाळी किंमत जवळपास 125 कोटी रुपये इतकी होती, विकत घेतली होती. निरुपम यांनी जाहीर रित्या केलेल्या या आरोपांचं वृत्त 'हिंदुस्थान टाईम्स'मध्ये छापून आलं होतं.

निरुपम यांनी असाही आरोप केला होता की या दोन कुटुंबांनी कोकणात अन्यत्र 900 कोटी रुपयांची जवळपास 450 एकर जमिन विकत घेतली होती. रविंद्र वायकर यांनी हे सगळे आरोप फेटाळले होते. ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया या आरोपांवर दिली नव्हती.

पुढे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी 'रिपब्लिक टिव्ही'चे संपादक अर्नब गोस्वामी हे जेव्हा चर्चेत आले तेव्हा किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा या जमिनीवरुन रश्मी ठाकरेंवर आरोप केले होते. त्यांनी असा आरोप केला होता की रश्मी ठाकरे आणि वायकर यांच्या पत्नीने विकत घेतलेल्या जमिनीपैकी दीड एकर जमिन ही नाईक कुटुंबियांकडून घेतली आहे. सोमय्या यांनी त्याबद्दलची काही कागदपत्रंही सोशल मीडियावर तेव्हा प्रसिद्ध केली होती. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने तेव्हा हे वृत्त छापलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

किरीट सोमय्या, उद्धव ठाकरे

आता सोमय्या यांनी पुन्हा हे जमिनीचं प्रकरण समोर आणलं आहे. "मी पुढच्या सोमवारी-मंगळवारी कोर्लई इथं जाऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे 19 बंगल्यांचा जो घोटाळा केला आहे तिथे जाऊन भेट देणार आहे," असं सोमय्यांनी मुंबईत परतल्यावर माध्यमांशी बोलतांना जाहीर केलं. त्यामुळं हे स्पष्ट आहे रश्मी ठाकरेंचे कथित जमिन व्यवहार आता पुन्हा चर्चेत येणार. पण प्रश्न हा आहे की त्याचे राजकीय परिणाम काय होणार?

रश्मी ठाकरेंवरील आरोपांमुळे विश्वासार्हता धोक्यात येणार की शिवसैनिक आक्रमक होणार?

कोणत्याही सरकारला असे आरोप नको असतात. बहुतांश आरोपांमुळे तात्काळ परिणाम होत नाहीत, ते फेटाळलेही जातात. पण सातत्यानं होत राहणाऱ्या आरोपांमुळं जनमानसातली प्रतिमा बिघडत जाते.

तो राजकीय नेत्यांचा, पक्षांचा आणि सरकारांसमोरचा चिंतेचा विषय असतो. भाजपा आणि किरीट सोमय्या यांनी या सरकारविरुद्ध आरोपांची मोठा हल्लाच सुरु केला आहे आणि या सरकारला दोन वर्षांच्या आत अनेकदा मेटाकुटीला आणलं आहे.

आता रश्मी ठाकरे यांच्या निमित्तानं थेट मुख्यमंत्र्यांवरच टीकेचा रोख ठेवून सोमय्या आणि भाजपा आक्रमक होत आहेत. त्यामुळे सरकारच्या विश्वासार्हतेला अधिक मोठा धक्का बसेल का, असा प्रश्न विचारला जाणं स्वाभाविक आहे.

पण दुसरीकडे इतिहास पाहिला तर असंही दिसतं की अशा स्थितीचा शिवसेनेवर वेगळा परिणामही होतो. भावनेच्या आधारावर कायम आक्रमक होण्याऱ्या शिवसैनिकांसाठी ठाकरे कुटुंबीय हे सर्वोच्च आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर कोणतेही आरोप झाले ते शिवसैनिक आक्रमक होतात.

रश्मी ठाकरे यांना सेनेत 'वहिनी' म्हटलं जातं आणि बाळासाहेबांच्या काळात त्यांच्या पत्नी मीनाताई यांचं जसं सेनेच्या कार्यकर्त्यांसोबत भावनिक नातं तयार झालं होतं, तसं आता रश्मी यांचं झालं आहे असंही निरिक्षण नोंदवलं गेलं आहे. त्यामुळे रश्मी यांच्यावर केलेल्या आरोपांचा परिणाम शिवसेनेच्या काडरवर होण्याची शक्यता आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

रश्मी ठाकरे

सोमय्या यांनी जेव्हा उद्धव यांच्यावर आरोप केले होते तेव्हाही इतर राजकीय विरोधकांपेक्षा वेगळं शत्रुत्व त्यांचं शिवसेनेसोबत तयार झालं. कालांतरानं सोमय्यांचं तिकीट तर गेलंच, पण 2017 च्या महापालिका निवडणुकीत शिवसैनिक त्यावरुन आक्रमक झाले.

भाजपाचे नेते शिवसेनेवर टीका करतात, पण नारायण राणेंनी जेव्हा उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका केली तेव्हा शिवसैनिक रस्त्यावर उतरले. तशाच भावना जेव्हा शिवसेना भवनावर भाजपानं मोर्चा काढला तेव्हाही दादरमध्ये पहायला मिळाल्या. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंवर आरोपांच्या फैरी झाडून सोमय्यांच्या रुपानं भाजपा शिवसैनिकांना जागं करण्याची जोखीम पत्करणार की तसं करणं हे त्यांच्या राजकीय रणनीतीचा एक भागच आहे?

'द हिंदू' चे मुंबईतले राजकीय पत्रकार आलोक देशपांडे यावर म्हणतात की, "ठाकरे परिवाराला वैयक्तिक टारगेट केलं की शिवसैनिक आक्रमक होतात हा इतिहास आहे/ शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याला टारगेट करणं आणि ठाकरे परिवारातल्या सदस्याला टारगेट करणं यात फरक आहे. एकतर तुमच्याकडे पूर्ण पुरावे हवेत, नाहीतर त्या प्रकरणात हात घालू नये. कारण शिवसैनिकांकडून जी प्रतिक्रिया येईल ते भाजपाला परवडणार नाही. सोमय्या हे स्टंट करताहेत की गंभीरपणे हे बघायला हवं."

शीर्ष नेत्यांवरचे आरोप अंगलट येऊ शकतात?

ठाकरेंवर आरोप करण्यतली राजकीय जोखिम अजून एक आहे की गेल्या काही काळात कोणत्याही पक्षाचा शीर्ष नेत्यांविरुद्द तपास यंत्रणांच्या चौकशांचं अस्त्र उगारलं गेलं आहे, तिथं ही आक्रमकता भाजपाच्या राजकीय दृष्ट्या अंगलट आली आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात शरद पवारांवर असे आरोप झाले, मग 'ईडी'च्या चौकशीची चर्चा सुरु झाली आणि त्यानं राजकीय चित्र बदललं. शरद पवारांचे समर्थक त्यानंतर अधिक आक्रमक झाले आणि 'राष्ट्रवादी'ला त्याचा निवडणुकीत फायदा झाला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

शरद पवार, ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तृणमूल कॉंग्रेसविरोधात भाजपानं अशीच रणनीती वापरली. पण त्यामुळे ममता आणि त्यांच्या समर्थकांनी तशीच आक्रमक रणनीती स्वीकारल्यावर बंगालमधली स्थिती बदलली.

ममतांना अगोदरपेक्षा अधिक फरकानं बहुमत मिळालं. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव तुरुंगात गेले, मात्र त्यांचे पुत्र तेजस्वी यांना मात्र त्याची सहानुभूती मिळाली. तेजस्वी यांची लाट बिहारमध्ये आली. ती त्यांना सत्तेपर्यंत घेऊन गेली नाही, पण 'राजद'चं संख्याबळ सर्वात मोठा पक्ष बनण्यापर्यंत वाढलं.

त्यामुळे ज्या नेत्यांशी वा घराण्यांशी अस्मिता वा भावना जुळलेलं असते तिथं आरोप-चौकशीचे फासे उलटे पडू शकतात. अशी उदाहरणं नुकतीच घडली आहेत. त्यामुळे रश्मी ठाकरेंवर, म्हणजेच ठाकरे घराण्यावर, आरोप करुन पुन्हा तसंच मुंबई आणि महाराष्ट्रात घडेल का, असा विचार भाजपाला अर्थातच करावा लागेल.

रश्मी ठाकरेंवर आरोप करुन सेनेला सोबत घेता येतील का?

रश्मी ठाकरेंवर आरोप करुन शिवसेनेला दुखावलं तर भविष्यात सेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्याची शक्यता जी दोन्ही बाजूंकडून बोलून दाखवली जाते ती किती उरेल? दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा युती व्हावी असं मानणारे मोठे गट आहेत हे निश्चित.

उद्धव ठाकरे असतील वा मोदी-शाह-फडणवीस, एकमेकांवर टीका करतांनाही मर्यादा पाळतांना दिसतात. एकमेकांशी राजकीय संबंधही जपून आहेत. यामध्ये भविष्यात बदलल्या स्थितीनुसार एकत्र येण्याची शक्यता अभिप्रेत आहे.

फोटो स्रोत, Getty Images

पण रश्मी ठाकरेंवर आरोप करुन उद्धव ठाकरेंना दुखावलं तर भाजपा सेना संबंधांवर अधिक परिणाम होणार हे नक्की. भाजपाला सेनेचे गरज असेल तर अशा आरोपांची जोखिम ते पत्करतील का, हा राजकीय प्रश्न आहे. पण ज्येष्ठ राजकीय पत्रकार संदीप प्रधान यांच्या मते आता या सरकारविरुद्ध आरपारची लढाई करायची असा भाजपात मोठा सूर आहे, त्यामुळेच ठाकरेंवरही आरोप करायचे अशी रणनीती असण्याची शक्यता आहे.

'आता आरपारची लढाई'

"अगोदर हे सरकार बनलं तेव्हा भाजपाला वाटलं की ते अंतर्विरोधानं पडेल, आपल्याला फार काही करावं लागणार नाही. पण तसं काही झालं नाही. त्यांच्यातल्या कोणत्या नाराज गटालाही बाहेर काढता आलं नाही. त्यामुळं आता यश येत नाही म्हटल्यावर भाजपाला असं वाटतं की आरपारची लढाईच पाहिजे.

सात वर्षांच्या सत्तेचा तसा काहीही फायदा न झालेल्या सोमय्यांसारख्या नेत्यांसाठी अशा वेळेस पोलिटिकल स्पेस तयार करण्यासाठी संधी आहे. त्यामुळेच म्हणून ठाकरेंनाही लक्ष्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे," असं संदीप प्रधान म्हणतात.

प्रधान यांच्या मते ठाकरेंवरच्या आरोपांचा राजकीय फायदा मिळवण्याचा सेना प्रयत्न करेल, पण ती रस्त्यावर फार आक्रमक होण्याची शक्यता नाही.

"सेना आक्रमक होईल, पण ती बाळासाहेबांच्या काळातली सेना आता नाही. ते सत्तेमध्ये असल्यानं राडा करणार नाहीत. अगदीच गरज वाटली तर ते न्यायालयात जातील आणि नाव घेऊन नये अशी विनंती करतील. जर तक्रार घेऊन सोमय्या किंवा अन्य कोणी न्यायालयात गेलं तर रश्मी ठाकरेंना तिथं उत्तर द्यावं लागेल. पण रस्त्यावर प्रतिक्रिया येईल असं मला वाटत नाही. सेना त्याचा फायदा मात्र घेण्याचा प्रयत्न करेल. आता असं समजतं आहे की या महापालिकेच्या निवडणुकीत मराठी विरुद्ध गुजराती असं कार्ड खेळलं जाईल. ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न केला जातोय असंही मग बोललं जाईल. असं राजकारणही पहायला मिळू शकतं," प्रधान म्हणतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)