हिंदूंची लोकसंख्या कमी झाली तिथं तिथं समस्या निर्माण झाल्या - मोहन भागवत #5मोठ्याबातम्या

मोहन भागवत

फोटो स्रोत, Getty Images

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. हिंदूंची लोकसंख्या कमी झाली तिथं-तिथं समस्या निर्माण झाल्या - मोहन भागवत

"जिथं जिथं वेगवेगळ्या कारणांमुळे हिंदूंची लोकसंख्या कमी झाली, तिथं तिथं समस्या निर्माण झाल्या, याच कारणामुळे संघ सर्वव्यापी होऊन जागतिक कल्याणाबाबत चर्चा करणार आहे," असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे.

राजस्थानमध्ये उदयपुर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक भागवत बोलत होते.

"हिंदू राष्ट्राच्या परम वैभवामुळे जगाचं कल्याण होईल, कोरोना काळात संघ-स्वयंसेवकांनी केलेली निःस्वार्थ सेवा म्हणजेच हिंदुत्व आहे," असंही भागवत म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "हिंदू सामाजाला एकत्र आणल्यास भारताच्या सर्व समस्यांवर समाधान मिळवता येऊ शकतं संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी म्हटलं होतं. आपण सर्वजण भारतमातेची लेकरं आहोत. हिंदूंच्या विचारसरणीत शांती आणि सत्य या दोन गोष्टींचा समावेश आहे. आपण हिंदू नाहीत अशा प्रकारची एक मोहीम देश आणि समाजाला कमकुवत बनवण्याच्या उद्देशाने राबवली जात असल्याची डॉ. भागवत म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली.

2. पत्रिका न जुळणं हे लग्न मोडण्याचं कारण असू शकत नाही : हायकोर्ट

लग्नाचं अमिष दाखवून महिलेशी शारीरिक संबंध ठेवून त्यानंतर शब्द फिरवणाऱ्या आरोपीची गुन्हा रद्द करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

पत्रिका जुळत नाही हे लग्नाचं वचन मोडण्याचं कारण असूच शकत नाही, असे निरीक्षण हायकोर्टाने यावेळी नोंदवलं.

बदलापूर इथं राहणाऱ्या अविशेक मित्राचे (33) चे बोरीवलीतील एका महिलेशी प्रेमसंबंध होते. दरम्यान, अविशेकनं महिलेला लग्नाचं खोटं आश्वासन देऊन तिच्याशी कथितरित्या शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोप करत महिलेने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी दोघांनाही एकत्र बोलवून बोरीवली पोलिसांनी 4 जानेवारी 2013 रोजी समुपदेशनासाठी पाठवलं होतं. तेव्हा आरोपीनं घरच्यांसमोर लग्नाची तयारी दर्शवली त्यामुळे तक्रारदार महिलेनं तक्रार मागे घेतली. पण नंतर आपण लग्न करणार नसल्याचं समुपदेशकांना कळवलं. त्यावरून महिलेने पुन्हा तक्रार दाखल केली.

आरोपीचा हेतू प्रामाणिक आणि खरा असता तर त्याने समुपदेशकांना पत्र लिहून लग्न करणार नसल्याचं कळवलं नसतं. त्यामुळे पत्रिका जुळत नसल्यानं लग्नाचं वचन मोडलं हा युक्तिवाद ग्राह्य धरता येणार नाही, असं म्हणत कोर्टाने आरोपीची याचिका रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली. ही बातमी एबीपी माझाने दिली.

3. 'सरदार खलिस्तानी, आम्ही पाकिस्तानी तर फक्त भाजपवाले हिंदुस्तानी'

"भाजप सरकारसाठी सरदार खलिस्तानी झाले, आम्ही पाकिस्तानी झालो, तर फक्त भाजप हिंदुस्तानी आहे, अशा शब्दांत जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

फोटो स्रोत, EPA

"हे सरकार फक्त नाव बदलण्याचं काम करत आहे. नाव बदलल्याने मुलांना रोजगार मिळणार नाही," असं मुफ्ती यांनी यावेळी म्हटलं.

"केंद्र सरकार तालिबान, अफगाणिस्तानबद्दल बोलतं. पण देशातील शेतकरी बेरोजगारीबद्दल बोलत नाही. नेहरू-वाजपेयी यांच्यासारख्या नेत्यांना जम्मू-काश्मीरसाठी दूरदृष्टी होती. पण हे सरकार हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचं काम करत आहे," असं मुफ्ती म्हणाल्या. ही बातमी लोकमतने दिली.

4. IPL च्या उभारणीत ललित मोदी यांचं योगदान होतं ही वस्तुस्थिती

इंडियन प्रीमिअर लीग (IPL) च्या उभारणीत ललित मोदी यांचं योगदान होतं, ही वस्तुस्थिती आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू चंदू बोर्डे यांच्या सन्मान कार्यक्रमादरम्यान ते पुणे येथे बोलत होते.

यावेळी शरद पवारांना ललित मोदींचं कौतुक केल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला.

याला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, "ललित मोदी यांनी खेळात जे योगदान दिलं त्याबाबत मी बोललो. मी बाकी काही बोललो नाही. त्याचा काही माझा विषय नव्हता इथे. पण ही गोष्ट खरी आहे की आज जगात आयपीएलचं नाव झालं आहे. मी अध्यक्ष असताना IPL च्या निर्मितीचा निर्णय घेण्यात आला. त्याच्या उभारणीत ललित मोदी यांचं योगदान होतं ही वस्तुस्थिती आहे." ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

5. अनिल परब यांचा किरीट सोमय्या यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा

शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानी दावा मुंबई हायकोर्टात दाखल केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

किरीट सोमय्या यांनी प्रतिज्ञापत्रासह त्यांच्या वैयक्तिक ट्विटर हँडलवर, किमान दोन प्रमुख इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेच्या वृत्तपत्रांमध्ये जाहीररित्या बिनशर्त माफी मागावी अशी मागणी परब यांनी याचिकेतून केली आहे.

याशिवाय, भविष्यात आपल्याविरोधात सोमय्यांना कोणतेही बदमानीकारक व्यक्तव्य करण्यापासून मनाई करण्याचे आदेशही देण्याची मागणी अनिल परबांनी या याचिकेतून केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदा घेऊन महाविकास आघाडीतील मंत्र्यांना लक्ष्य केलं होतं. याप्रकरणी परब यांनी सोमय्या यांना 14 सप्टेंबर रोजी नोटीस पाठवून सोशल मीडियावरील सर्व पोस्ट डिलीट करण्यास तसंच बिनशर्त माफी मागण्यास सांगितली होती. पण सोमय्या यांनी माफी न मागितल्याने त्यांनी अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)