कुंडली : 'जन्मपत्रिका जुळत नसल्याने माझं लग्न जवळपास मोडलंच होतं' - ब्लॉग

लग्न

फोटो स्रोत, Arindam Ghosh/getty

"जन्मपत्रिका न जुळणं हे लग्न मोडण्याचं कारण असू शकत नाही," असं मत मुंबई हायकोर्टाने एका सुनावणीदरम्यान नोंदवल्याचं नुकतंच वाचण्यात आलं.

या प्रकरणातील आरोपीने लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवले. महिला पोलिसांत गेल्यानंतर त्याने विवाह करण्याचं मान्य केलं. पण नंतर पत्रिका जुळत नसल्याचं कारण देत त्याने लग्नास नकार दिला.

या आरोपीला फटकारताना हायकोर्टाने वरील स्वरुपात निरीक्षण सुनावणीदरम्यान नोंदवलं. पण या निमित्ताने का होईना, लग्न, पत्रिका, कुंडली या गहन मुद्द्यावर न्यायालयाने स्पष्ट मत मांडलं आहे.

म्हणजेच, आता फक्त पत्रिकेचं कारण देत कुणाला लग्न मोडता येणार नाही. तसं कुणी करत असल्यास या सुनावणीचा उल्लेख त्या प्रकरणात नक्की करता येऊ शकतो. या गोष्टीला माझ्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण....पत्रिका जुळत नसल्याने माझं लग्न जवळपास मोडलंच होतं...!

हिंदू विवाह पद्धत आणि जन्मपत्रिका

हिंदू विवाहप्रक्रियेतील पहिला टप्पा (की अडथळा?) म्हणजे कुंडली किंवा जन्मपत्रिका जुळवणं होय. कोणताही विवाह जमवण्याआधी कुंडलींची देवाण-घेवाण ठरलेलीच.

कुंडलीमध्ये एखाद्या ग्रहाचं स्थान जरी पुढे-मागे असल्यास चर्चेचे सगळेच मार्ग बंद केले जातात. मग 'स्थळ' किती जरी 'सोन्यासारखं' असलं तरी पत्रिकेची रवानगी पुन्हा गुरूजींच्या 'शबनम' बॅगेत होते.

हिंदू विवाहपद्धतीतील हुंडा देण्या-घेण्यासारख्या अनिष्ट प्रथेवर पितृसत्ताक मानसिकतेतून आलेली प्रथा म्हणून टीका केली जाते. पण याच व्यवस्थेत पत्रिका पाहणं ही कदाचित अशी गोष्ट असावी, ज्याची चर्चा करताना दोन्ही बाजू एकाच पातळीवर आलेल्या असतात.

फोटो स्रोत, Getty Images

रास, नाडी, गण, नक्षत्रं, मंगळादी ग्रहांचं स्थान यांचा ऊहापोह करून अखेर गुण तपासले जातात. या अग्निपरिक्षेतून सुटून अलगद बाहेर आलेल्या दोन जीवांनाच मिलनाची परवानगी मिळते.

याला अनेक शास्त्रीय कारणं असल्याचं कुंडलीसंस्कृतीचं समर्थन करणारे म्हणतात. पण माझ्याच घरचं उदारहण घ्यायचं म्हटलं तर कुंडली जुळवून लग्नाच्या बंधनात अडकवण्यात आलेले माझे आई-वडील रोजच्या रोज भांडत असल्याचं पाहताना माझ्या मनात याविषयी शंका निर्माण होणं स्वाभाविकच आहे.

जेव्हा मी 'मांगलिक' असल्याचं मला कळालं...

पत्रिका फक्त अरेंज मॅरेज पद्धतीत पाहिली जाते का?

तर नाही.

कॉलेजवयीन काळात माझी एका गोड मुलीशी भेट होऊन ओळखीचं मैत्रीत आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पुढे 'विचार' जुळल्याने लग्नाचा 'विचार' करण्याचा आम्ही निर्णय घेतला.

फोटो स्रोत, Mayur Kakade/getty

याबाबत आम्ही दोघांनीही घरच्यांना सांगितलं. याविषयी खलबतं होऊन पत्रिका जुळली तरच विवाहास परवानगी मिळेल, अशी अट आमच्यासमोर ठेवली गेली.

खरंतर प्रेम विवाहात या अटीची आवश्यकता नव्हती. पण कुणालाही नाराज करायला नको, अशी उदारमतवादी भूमिका घेत आम्ही हे दिव्य पार करण्यासाठी तयार झालो.

खरं सांगायचं तर 'कुंडली आहे, जुळेलच!' असं म्हणत आम्ही या गोष्टीला फारसं गंभीरपणे घेतलं नाही.

तत्पूर्वी, माझ्या 28 वर्षांच्या आयुष्यात कुंडली पाहण्याचा प्रसंग माझ्यावर कधीच आलेला नव्हता. इतकंच काय तर माझी रास कोणती हेसुद्धा मी कधी पाहिलं नव्हतं.

त्यामुळे मी माझी जन्मतारीख, जन्मवेळ आदी माहिती मुलीच्या नातेवाईकांना दिली.

पण त्यानंतर एकच गोंधळ उडाला. मी मांगलिक असल्याचं 'निदान' कुंडलीतून झालं होतं. माझ्या कुंडलीत आठव्या स्थानी मंगळ आहे. त्यामुळे हे लग्न केल्यास अनर्थ होईल, म्हणूनच हे लग्न होऊ शकणार नसल्याचा निरोप मला मिळाला.

लग्नाच्या तयारीला लागलो असताना एका पुढच्याच क्षणी बसलेल्या या धक्क्याने मी प्रचंड विचलित झालो होतो.

'शनि' कामी आला...

माझ्या कुंडलीत मंगळ असल्याचं स्पष्ट झाल्याने माझ्याशी मुलीचं लग्न लावून देता येणार नाही, अशी तिच्या नातेवाईकांची धारणा बनली.

त्यातून मग शब्दाला शब्द वाढत जाऊन वाद-वितुष्ट यांना तोंड फुटलं. पण आम्ही दोघं ठाम होतो.

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

आमचा प्रेमविवाह होणार होता आणि नातेवाईकांना आमचं लग्न जुळू द्यायचं नसल्यामुळे कुंडलीची पळवाट सांगितली जात आहे का, हेसुद्धा आम्हाला तपासायचं होतं.

अखेर आम्ही आमच्या पत्रिका घेऊन दुसऱ्या एका ज्योतिषाकडे गेलो.

तिथं सुरुवातीला कॉम्प्युटर सॉफ्टवेअरच्या मदतीने माझी पत्रिका काढली गेली, त्यामध्ये माझ्या आठव्या स्थानी मंगळ असल्याचं सांगितलं. कुंडली जमत नसल्याचा अहवालही सॉफ्टवेअरवरच प्राप्त झाला. तो कुंडली पाहणाऱ्या व्यक्तीने जसाच्या तसा आम्हाला सांगितला.

निराश होऊन आम्ही बाहेर पडलो.

याच चर्चेत काही दिवस गेले. दरम्यान, संयम दाखवत यातून काही तोडगा काढता येतो का, हे पाहणं आम्ही सुरू ठेवलं.

या कालावधीत आम्हाला विविध प्रकारचे सल्ले मिळाले. पण अखेरीस सॉफ्टवेअरवर विश्वास न ठेवता 'तज्ज्ञ' ज्योतिषाकडे जाऊन सल्ला घ्यावा, या निर्णयापर्यंत आम्ही पोहोचलो.

तिथं आम्हा दोघांच्याही कुंडली समोर ठेवून त्यांनी माहिती दिली. माझ्या आठव्या स्थानातील मंगळाकरिता माझ्या प्रेयसीच्या शनिचं स्थान पूरक असल्याचं ते म्हणाले.

मंगळावर शनिचा मात्रा लागू पडली. विवाह करण्यात काहीही अडचण नाही, असा निष्कर्ष ज्योतिषांनी दिला. सोबतच एक विशिष्ट विधी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

फोटो स्रोत, Getty Images

हा आमच्यासाठी आशेचा किरण होता. आम्ही ही बाब घरच्या व्यक्तींच्या कानावर घातली. त्यांनीही या गोष्टीची पडताळणी करून संबंधित 'विधी' करण्याचा शब्द घेत अखेर विवाहाला मान्यता दिली.

पण या काळात आम्हाला प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागलं. आज माझा विवाह होऊन दीड वर्षं उलटून गेली, पण हा प्रसंग माझ्या मनावर इतका ठळकपणे ठसला आहे की आयुष्यभर सतत हे माझ्या आठवणीत राहील.

कुंडलीचा बहाणा करणाऱ्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करता येईल का?

मला कल्पना आहे की, ज्योतिषशात्र हे विज्ञान आहे, असा अनेकांचा दावा आहे. काही ठिकाणी आता त्याचे कोर्सही सुरू झाले आहेत. समाजातल्या एका मोठ्या गटाचा त्यावर विश्वासदेखील आहे.

पण, खरंच लग्न करण्यासाठी पत्रिका जुळणं महत्त्वाचं असतं का? या लेखाच्या निमित्ताने थोडा रिसर्च करण्यासाठी मी कुंडली शब्दाच्या आजूबाजूला रचनात्मक शब्द वापरून गूगलही करून पाहिलं.

तिथं माझ्यासारखा प्रश्न पडलेले अनेक जण मला आढळून आले. क्वोरा नामक प्रश्नोत्तराच्या प्लॅटफॉर्मवर तर कुंडलीशी संबंधित प्रश्नोत्तरांचा ढीगच मला पाहायला मिळाला.

फोटो स्रोत, Science Photo Library

फोटो कॅप्शन,

मंगळ ग्रह

तिथं एकाने उत्तर दिलंय, "आमची पत्रिका जुळत नव्हती, तरी आम्ही लग्न केलं. आता दोन मुले आहेत."

दुसऱ्या एकाने म्हटलं, "माझी पत्रिका चांगली जुळूनसुद्धा विवाह टिकला नाही. विचार जुळणं महत्त्वाचं असतं."

पत्रिकेच्या जंजाळात बॉलीवूडचं बच्चन कुटुंबही अडकलं होतं. ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनच्या विवाहादरम्यान त्यांना विविध प्रकारे विधी करून घ्यावे लागले होते, याचीही आठवण मला या निमित्ताने झाली.

जगभरात चंद्र, मंगळ ग्रहावर जाण्याच्या मोहिमा चालतात. मानवाला अंतराळाची सैर करता येईल, इतपत प्रगती विज्ञानात झाली असताना आपण अजूनही पत्रिका-कुंडली यांचा विचार का करत आहोत?

हातभर आकाराच्या पत्रिकेमधूनच जर माणसाचं भविष्य ठरणार असेल, तर मनगटाचा उपयोग नेमका काय आहे?

आज हायकोर्टाने वरील मत नोंदवल्यानंतर मला वाटतं की या गोष्टींबाबत चर्चा व्हायला हवी.

जाता-जाता आणखी एक विचार मनात येतोय. भारतात कोणत्याही खटल्यांदरम्यान पूर्वीच्या काही खटल्यांचा तसंच त्यामध्ये न्यायाधीशांनी नोंदवलेल्या निरीक्षणांचा/मतांचा उल्लेख करून वकील युक्तिवाद करतात, हे आपण नेहमी पाहतो. तसंच या खटल्याबाबत होऊ शकेल का? कोर्टाने 'पत्रिका न जुळणं हे लग्न मोडण्याचं कारण असू शकत नाही,' असं आता म्हटलंच आहे. त्यामुळे पत्रिका जमत नसल्याचं कारण देणाऱ्या खडूस नातेवाईकांवर या खटल्यांचा आधार घेऊन गुन्हा दाखल करता येईल का?

असो, मला आत्ताच एका बातमीचं नोटिफिकेशन आलंय. स्पेसएक्स मोहिमेमार्फत अंतराळात गेलेल्या चार सर्वसामान्य नागरिकांनी तीन दिवसांनी जमिनीवर यशस्वी लँडिंग केल्याचं बातमीचा मथळा सांगतोय. बातमी वाचून घेतो.

( लेखातील विचार हे लेखकाचे वौयक्तिक विचार आहेत. लेखकाच्या विनंतीनुसार, त्यांचं नाव देण्यात आलेलं नाही.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)