IPL 2021 : हैदराबाद सनरायझर्सच्या टी. नटराजनला कोरोनाची लागण, आयपीएलवर पुन्हा टांगती तलवार?

टी. नटराजन

फोटो स्रोत, ANI

इंडियन प्रीमिअर लीगच्या चौदाव्या हंगामाच्या उर्वरित टप्प्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी. नटराजन कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

नटराजनसह क्लोज कॉन्टॅक्टमधील सहा सदस्यांनाही विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. यामध्ये विजय शंकर या खेळाडूचा समावेश आहे. बाकी सपोर्ट स्टाफचे सदस्य आहेत.

आज (22 सप्टेंबर) संध्याकाळी सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मुकाबला होणार आहे. नटराजन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने मॅचचं काय होणार याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.

बाकी खेळाडूंचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याने मॅच वेळापत्रकानुसार होणार आहे. नटराजन पॉझिटिव्ह आल्याचं स्पष्ट झाल्यानंतर बाकी खेळाडूंच्या आरटीपीसीआर चाचण्या घेण्यात आल्या. सगळे खेळाडू निगेटिव्ह असल्याने मॅचचा मार्ग मोकळा झाला.

एप्रिल-मे महिन्यात भारतात आयोजित आयपीएलच्या हंगामात कोरोना केसेस वाढू लागल्याने स्पर्धा स्थगित करावी लागली होती. कोलकाता नाईट रायडर्सचा संदीप वॉरियर आणि वरुण चक्रवर्ती, सनरायझर्सचा वृद्धिमान साहा, दिल्ली कॅपिटल्स संघाचा अमित मिश्रा यांच्यासह चेन्नई सुपर किंग्स संघातील सपोर्ट स्टाफचे चार सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.

बायोबबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने हंगाम स्थगित करण्यात आला होता.

भरगच्च अशा आंतरराष्ट्रीय वेळापत्रकातून जागा काढत आयपीएलचा अर्धवट राहिलेला हंगाम खेळवण्यात येत आहे. दुर्देवाने कोरोना केसेस वाढल्यास मॅच आयोजित करण्यासाठी पुरेसा वेळ नाही, कारण लगेचच ट्वेन्टी-20 वर्ल्डकप होत आहे.

आयपीएलच्या 14 व्या हंगामातील 29 सामने झाल्यानंतर कोरोनाचा शिरकाव झाल्यानं उर्वरित स्पर्धा स्थगित करण्यात आली. होती. 4 मे रोजी स्थगित झालेली ही स्पर्धा 19 सप्टेंबरला म्हणजे तीन दिवसांपूर्वीच पुन्हा सुरू झाली होती.

काही दिवसांपूर्वीच इंग्लंड दौऱ्यावरही भारतीय संघाची पाचवी कसोटी कोरोनाच्या प्रादूर्भावामुळं रद्द करावी लागली होती. त्यामुळं कोरोनाचं आयपीएलवरचं शुक्लकाष्ट कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.

नटराजनबरोबरच आणखी सहा विलगीकरणात

आयपीएलच्या सामन्यांदरम्यान संघांमध्ये कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी काही नियम पाळले जातात. त्यानुसार प्रत्येक सामन्यापूर्वी खेळाडुंची RT-PCR चाचणी केली जाते.

फोटो स्रोत, ANI

बुधवारी सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये सामना होणार असल्यामुळे खेळाडुंची चाचणी करण्यात आली. त्यात नटराजन पॉझिटिव्ह असल्याचं समोर आल्याचं पीटीआयनं म्हटलं आहे.

मात्र नटराजन याचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी, इतर सर्वांचे अहवाल मात्र निगेटिव्ह आले आहेत. तसंच नटराजनला काहीही लक्षणं नसून, तो विलगीकरणात असल्याचं आयपीएलच्या वेबसाईटवर स्पष्ट करण्यात आलं आहे.

नटराजनबरोबर त्याच्याशी जवळून संपर्कात असलेल्या आणखी सहा खेळाडुंनाही विलगीकरणात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

क्रिकेटपटू विजय शंकर, संघ व्यवस्थापक विजय कुमार, फिजिओथेरपिस्ट श्याम सुंदर जे, डॉक्टर अंजना वन्नन, व्यवस्थापक तुषार खेडकर, नेटमध्ये गोलंदाजी करणारा पेरियासामी गणेशन यांचा त्यात समावेश आहे.

बायोबबल किती सुरक्षित?

कोरोनाचा धोका पाहता अशा स्पर्धा व्हाव्यात यासाठी बायोबबलच्या माध्यमातून क्रिकेटपटुंना सुरक्षा प्रदान करण्याचा विचार समोर आला होता. त्यानुसार आयपीएलमध्ये बायोबबलमध्ये खेळाडुंना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल असं ठरलं होतं.

फोटो स्रोत, BCCI/IPL

आयपीएलच्या 14 व्या हंगामादरम्यान सुरुवातीचे सामने सुरळीत झाले मात्र त्यानंतर खेळाडुंना कोरोनाची लागण होण्याचे प्रकार एकापाठोपाठ एक समोर येऊ लागले होते. त्यामुळं स्पर्धा अर्ध्यातून स्थगित करावी लागली.

त्यानंतर पुन्हा स्पर्धा सुरू झाल्यानंतर तीन सामन्यानंतरच कोरोनाचा शिरकाव झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळे बायोबबलमध्ये स्पर्धेच्या सुरुवातीलाच कोरोनाचा शिरकाव झाल्याचं समोर आलं आहे.

त्यामुळे आयपीएल व्यवस्थापन खेळाडूंना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी ज्या बायोबबलवर अवलंबून होते, ते खरंच किती प्रमाणात सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आयपीएलचं अर्थकारण

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

कोरोनाचा एवढा धुमाकूळ सुरू असताना अशा स्पर्धा आणि प्रामुख्याने आयपीएलचा अट्टहास का असा प्रश्न उपस्थित केला जातो. यामागच्या कारणांपैकी सर्वात म्हत्त्वाचं कारण म्हणजे स्पर्धेमागचं आर्थिक गणित.

आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपसाठी बीसीसीआय आणि व्हिवो या कंपनीत करार झाला आहे. 5 वर्षांकरता (2018-2022) व्हिवो बीसीसीआयला 2,199 कोटी रुपये देत आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर एका हंगामासाठी साधारण 440 कोटी रुपये व्हिवोकडून बीसीसीआयच्या तिजोरीत जमा होतात.

आयपीएल मॅचेसचे प्रक्षेपण हक्क स्टार स्पोर्ट्सने 16,347 कोटी रुपये खर्चून पाच वर्षांसाठी हक्क मिळवले आहेत. म्हणजे एका मॅचसाठी स्टार स्पोर्ट्स 55 कोटी रुपये मोजतं. बीसीसीआयसाठी प्रक्षेपण हक्क हा उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे.

या रकमेपैकी ठराविक रक्कम आयपीएल संघांमध्ये समान प्रमाणात वितरित केली जाते. या रकमेचीही हमी असते कारण मैदानावर येऊन मॅच बघणाऱ्या प्रेक्षकांच्या तुलनेत टीव्हीवर आयपीएल मॅच पाहणाऱ्यांची संख्या अधिक असते.

प्रत्येक आयपीएल संघाचे स्वत:चे प्रायोजक असतात. तसंच प्रत्येक आयपीएल संघ मर्चंडायझिंगच्या माध्यमातून पैसा कमावतो. जर्सी, ट्रॅकपँट, टोप्या, सॅक, सोव्हेनियर, ऑटोग्राफ बॅट, मोबाईल कव्हर अशा अनेक गोष्टी स्पर्धेआधी, स्पर्धेदरम्यान विकल्या जातात.

जेतेपद पटकावल्यानंतर विजेत्या संघाला घसघशीत बक्षीस रकमेने गौरवण्यात येतं. ही रक्कमही आयपीएल संघासाठी उत्पन्नाचा हिस्सा आहे. विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला या पैशाचा वाटा मिळतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)