व्हायग्रा: नपुंसकत्वावरील गोळी ठरणार स्मृतिभ्रंशासाठी वरदान?

कपल

फोटो स्रोत, Getty Images

(27 मार्च 1998 ला व्हायग्राला अमेरिकेच्या अन्न आणि औषधी प्रशासन विभागाने मान्यता दिली होती. आज त्या गोष्टीला 24 वर्षं पूर्ण होत आहेत. त्या निमित्त हा लेख पुन्हा शेअर करत आहोत.)

नपुंसकत्वाच्या उपचारासाठी वापरली जाणारी गोळी व्हायग्रा अल्झायमर आजारासाठी उपयुक्त उपचार ठरू शकते, असं अमेरिकन संशोधकांचं म्हणणं आहे. या संशोधकांनी मेंदूतील त्यांच्या परिणामांचा अभ्यास केला आहे.

पेशींच्या चाचण्यांमधून काही बाबी लक्षात आल्या आहेत. त्यानुसार, या प्रकारची औषधं स्मृतिभ्रंशात जमा होणाऱ्या काही प्रथिनांना लक्ष्य करतात. यासंदर्भात क्लीव्हलँड टीमने 70 लाख रुग्णांच्या डेटाबेसचा अभ्यास केला आणि यात असं आढळलं की जे पुरूष हे औषध घेत होते त्यांना अल्झायमरचा धोका कमी आहे.

यासंबंधी अधिक संशोधन करण्याची गरज आहे, असं ते 'नेचर एजिंग' या नियतकालिकात म्हणतात.

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, हे काम रोमांचक आहे, कारण नवीन उपचार शोधण्यापेक्षा आणि विकसित करण्यापेक्षा विद्यमान औषधाला पुनरुज्जीवित करणं जलद, सोपं आणि स्वस्त असू शकतं.

अल्झायमर रुग्ण

व्हायग्राला सिल्डेनाफिल म्हणूनही ओळखले जाते. रक्तवाहिन्यांना आराम देणे किंवा रक्तप्रवाह सुधारण्यासाठी हे औषध तयार करण्यात आले होते.

डॉक्टरांना असंही आढळलं की, याचा परिणाम शरीरात इतरत्रही समान होतो. पुरुषांच्या जननेंद्रीय धमन्यांसह आणि ते इरेक्टाइल डिसफंक्शनवर यशस्वी उपचार म्हणून विकसित करण्यात आलं.

तज्ज्ञांना असंही वाटतं की त्याचे इतरही उपयोग असू शकतात. सिल्डेनाफिलचा वापर महिला आणि पुरुषांमध्ये फुफ्फुसाच्या फुफ्फुसीय उच्च रक्तदाबासाठी पूर्वीपासूनच केला जातो.

रक्तवाहिन्यासंबंधी स्मृतिभ्रंशाचा धोका असलेल्या लोकांना मदत करू शकतात की नाही यासंबंधी अलीकडच्या काळात शास्त्रज्ञ शोध घेत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

अल्झायमर रुग्ण

अल्झायमरनंतर स्मृतिभ्रंशाचा दुसरा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे - रक्तप्रवाह कमी झाल्याने मेंदूला हानी पोहोचवतो. संशोधकांना आता असा विश्वास वाटतो की यामुळे अल्झायमर या आजारातही मदत होऊ शकते.

या प्रकारच्या स्मृतिभ्रंशाचे नेमके कारण अद्याप पूर्णपणे समजलेले नाही.

क्लीव्हलँड टीमला आढळले:

  • औषधाचा अधिक डोस (सामान्यपेक्षा अधिक) मेंदूच्या पेशींची वाढ वाढवतात आणि मानवी टिश्यूंच्या प्रयोगशाळेत प्रथिनांचा संचय कमी करतात.
  • सहा वर्षांच्या वैद्यकीय आकडेवारीच्या आधारे आणि 7.23 दशलक्षाहून अधिक व्यक्तींच्या माहितीच्या आधारे औषध न घेणाऱ्यांच्या तुलनेत सिल्डेनाफिल घेणाऱ्यांना अल्झायमर होण्याची शक्यता कमी असल्याचं आढळलं

हे निष्कर्ष प्रोत्साहन देणारे आहेत परंतु यावर आणखी संशोधनाची गरज असल्याचं मुख्य अन्वेषक डॉ. फेझिओंग चेंग सांगतात.

ते म्हणाले, "कारण आमच्या निष्कर्षांमुळे केवळ सिल्डेनाफिलचा वापर आणि अल्झायमरचा धोका कमी असण्याचा संबंध प्रस्थापित होतो. त्यामुळे आम्ही आता सिल्डेनाफिलच्या क्लिनिकल फायद्यांची पुष्टी करण्यासाठी अल्झायमरच्या रुग्णांसाठी चाचणी आणि फेज 2 क्लिनिकल ट्रायल करण्याचा विचार करत आहोत."

फोटो स्रोत, Getty Images

एडिनबर्ग विद्यापीठातील ब्रिटनमधील मेंदू संशोधन तज्ज्ञ प्राध्यापक तारा स्पायर्स-जोन्स म्हणाल्या, "हे औषध अल्झायमर आजाराचा धोका खरोखरच कमी करू शकतं की नाही हे जाणून घेण्यासाठी अधिक काम करण्याची आवश्यकता आहे."

"हा डेटा वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाचा वाटत असला तरी या अभ्यासाच्या आधारे अल्झायमर आजाराला प्रतिंबध म्हणून सिल्डेनाफिल घ्यावं असं सुचवण्याची घाई मी करणार नाही."

टास्मानिया विद्यापीठात वैद्यकीय विज्ञानाचे व्याख्याता डॉ. जॅक ऑटी म्हणाले, "अल्झायमर आजारासंबंधी संशोधनाच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत अनेक औषधांकडून आम्हाला अपेक्षा होती पण पण क्लिनिकल चाचण्यांमध्ये आमच्या हाती निराशा आली. मी या संशोधन टीमचे आणि सिल्डेनाफिलसंबधी संशोधनाचे बारकाईने निरीक्षण करणार आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)