हेलिकॉप्टर अपघात: देशातील काही मोठे हवाई अपघात

बिपीन रावत

फोटो स्रोत, Getty Images

भारतीय संरक्षण दलांचे प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ: सीडीएस) बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झाला आहे.

हवाई दलाच्या 'एमआय-17-व्ही-5' या विमानातून रावत यांच्यासह त्यांची पत्नी, काही उच्चपदस्थ सेनाधिकारी आणि इतर कर्मचार जात असताना तामिळनाडूतील कुन्नूर इथे बुधवारी (8 डिसेंबर) हा अपघात झाला.

गेल्या वर्षी, जानेवारी 2020 मध्ये देशातील पहिले संरक्षण दलप्रमुख म्हणून बिपीन रावत यांची नियुक्ती झाली.

या अपघाताचं नेमकं कारण अजून समजलं नसून त्यासंबंधी तपास सुरू आहे, असं हवाई दलाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

हवाई दलाच्या एमआय-17-व्ही-5 या दोन इंजिनं असणाऱ्या विमानाला हा अपघात झाला आहे.

जगातील सर्वांत प्रगत वाहतूक हेलिकॉप्टरांमध्ये एमआय-17-व्ही-5 चा समावेश होतो. सैनिकांची व शस्त्रास्त्रांची ने-आण करणं, लढाईदरम्यान पाठबळ पुरवणं, पेट्रोलिंग, शोधमोहिमा व मदतकार्य, इत्यादीसाठी या हेलिकॉप्टरचा उपयोग केला जातो. समुद्रातील वातावरण व वाळवंटातील परिस्थितीमध्येसुद्धा उड्डाण करण्याच्या दृष्टीने या हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात आली आहे.

हवाई दल याचा वापर 'व्हीआयपी' चॉपर म्हणून करतं. तसंच भारतातील 'व्हीव्हीआयपी' व्यक्तींच्या उड्डाणांकरता या हेलिकॉप्टरचा वापर होतो. हवाई मार्ग नसतो अशा ठिकाणी 'व्हीआयपी' व्यक्तींचा प्रवास याच हेलिकॉप्टरद्वारे पार पडतो, असं सांगितलं जातं.

फोटो स्रोत, ANI

अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी याच प्रकारच्या हेलिकॉप्टरमधून लडाख व केदारनाथ आदी ठिकाणी गेले होते. संरक्षण मंत्र्यांसारखी 'व्हीव्हीआयपी' व्यक्तिमत्व दुर्गम भागांमध्ये या हेलिकॉप्टरमधून जातात.

भारतात यापूर्वीसुद्धा असे अनेक अपघात झाले आहेत. यात देशातील महत्त्वाच्या व्यक्तींना जीव गमवावा लागला होता.

संजय गांधी

संजय गांधी यांचा विमान अपघात सर्वाधिक वादग्रस्त व चर्चेला वाव देणारा ठरला होता.

इंदिरा गांधी यांचा धाकटा मुलगा व राजीव गांधी यांचा भाऊ असणारे संजय गांधी स्वतः विमान चालवत असताना 23 जून 1980 रोजी दिल्लीत हा अपघात झाला.

फोटो स्रोत, KEYSTONE/HULTON ARCHIVE/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन,

संजय गांधी

राजीव आणि संजय गांधी या दोघांनाही वेग आणि मशीन्सचं प्रचंड आकर्षण होतं. पण राजीव उड्डाणविषयक नियमांचं पालन करत विमान चालवायचे, तर दुसरीकडे संजय गांधी कार चालवल्याप्रमाणे विमान उडवायचे.

हवेमध्ये विमानाच्या कसरती करण्याचा त्यांना शौक होता. 1976 साली संजय गांधींना छोटं विमान उडविण्याचा परवाना मिळाला होता. मात्र, इंदिरा गांधी सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर जनता सरकारनं त्यांचा परवाना रद्द केला होता. पण नंतर त्यांना परवाना मिळाला आणि पुन्हा ते विमान उडवू लागले होते. 23 जून 1980 ला त्यांच्या विमानाला अपघात झाला त्यात त्यांचे निधन झाले.

माधवराव शिंदे

सप्टेंबर 2001 मध्ये काँग्रेस नेते माधवराव सिंदिया यांचं उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात भोगाव तालुक्यामधील मोता इथे विमान अपघातात निधन झालं. एका सभेत भाषण करण्यासाठी ते कानपूरला जात होते. विमानात त्यांच्यासह इतर सहा जण होते.

फोटो स्रोत, Getty Images

जिंदाल समूहाच्या 'सेस्ना सी-90' या दहा प्रवाशांची जागा असणाऱ्या चार्टर्ड विमानाने दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हवेत उड्डाण केलं. यात सिंदिया व त्यांचे सहकारी होते. आग्र्यापासून 85 किलोमीटरांवर गेल्यानंतर या विमानाचा अपघात झाला आणि सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला.

माधवराव शिंदे काँग्रेसचे आघाडीचे लोकप्रिय नेते होते. काँग्रेसमध्ये त्यांचं भविष्य उज्ज्वल असल्याचं मानलं जात होतं.

वाय. एस. राजशेखर रेड्डी

सप्टेंबर 2009 मध्ये आंध्र प्रदेशाचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी व इतर चार जण ज्या हेलिकॉप्टरमधून जात होते, ते हेलिकॉप्टर नल्लामाला वन क्षेत्रात बेपत्ता झालं. सैन्यदलाच्या मदतीने सदर हेलिकॉप्टर शोधण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images

या हेलिकॉप्टरचे अवशेष 3 सप्टेंबरला कुरुनूलहून 74 किलोमीटर अंतरावरील रूद्रकोंडा डोंगराच्या माथ्यावर आढळले होते.

दोरजी खांडू

एप्रिल 2011 मध्ये अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू हेलिकॉप्टरच्या अपघातात मरण पावले. चार प्रवाशांची जागा असणाऱ्या, एका इंजिनवर चालणाऱ्या 'पवन हंस- एएस-बी350-बी3' या हेलिकॉप्टरमधून ते जात होते.

तवांगहून त्यांचं हेलिकॉप्टर हवेत उडालं आणि 20 मिनिटांनी बेपत्ता झालं.

फोटो स्रोत, Getty Images

चार दिवस त्यांच्या हेलिकॉप्टरचा शोध लागला नव्हता. पाचव्या दिवशी शोधपथकाला अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष मिळाले आणि त्यात पाचही प्रवाशांचे मृतदेह होते.

जी. एम. सी. बालयोगी

मार्च 2002 मध्ये लोकसभेचे माजी अध्यक्ष जी. एम. सी. बालयोगी यांचा आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात 'बेल-206' हेलिकॉप्टरच्या अपघातात मृत्यू झाला. 'बेल-206' या खाजगी विमानात बालयोगी, त्यांचा अंगरक्षक व एक सहकारी प्रवास करत होते. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं.

ओ. पी. जिंदाल

एप्रिल 2005 मध्ये विख्यात उद्योजग व राजकीय नेते ओ. पी. जिंदाल यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री बंशीलाल यांचा मुलगा सुरिंदर सिंग यांचा आणि वैमानिकाचाही या अपघातात मृत्यू झाला.

जिंदाल चंदीगढहून दिल्लीला परत येत असताना हा अपघात झाला.

फोटो स्रोत, Getty Images

त्या वेळी ओ. पी. जिंदाल हरयाणाचे ऊर्जा मंत्री होते आणि देशातील आघाडीच्या उद्योजकांमध्ये त्यांची गणना केली जात होती. त्या वेळी 'फोर्ब्स' नियतकालिकाने श्रीमंतांच्या जागतिक यादीमध्ये जिंदाल यांना 548 वं स्थान दिलं होतं.

मे 1973 मध्ये माजी लोह, पोलाद व खाणकाम मंत्री मोहन कुमारमंगलम यांचंही निधान विमान अपघातात झालं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)