किशोरी पेडणेकर यांना अश्रू अनावर, प्रकरण काय?

किशोरी पेडणेकर
फोटो कॅप्शन,

किशोरी पेडणेकर

वयाची साठी ओलांडत असताना अशा प्रकारे समाजातील विकृत व्यक्तीनं पाठवलेलं पत्र कोणावरही परिणाम करू शकतं, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय.

किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देणारं आणि अश्लील शिवीगाळ करणारं एक पत्र आलं आहे. ते वाचून दाखवताना त्यांना अश्रू अनावर झाले.

कुटुंबातील प्रत्येक सदस्य, नवरा आणि मुलांसह सर्वांना गोळ्या घालू मारून टाकू, तुमच्या ठरावीक अवयवांची विटंबना करू असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे.

अशा प्रकारानंतर कुठलीही स्त्री वयानं कितीही मोठी असली तरी तिची स्त्रीसुलभ लज्जा राखली जाते. पण हे पत्र राजकीय आरोपांची पातळी खाली चालली असल्याचं दर्शवणारं आहे, असा पेडणेकर यांनी म्हटलंय.

"पूर्वी आरोप पक्षांवर व्हायचे. पण महिला महापौर असल्याचं माहिती असूनही ज्या शब्दांत आरोप होत आहेत, ते मलाच नव्हे तर संपूर्ण महिलांना क्लेशदायक आहे. एक संपण्याआधी दुसरं सुरू होतं. ज्यांनी पत्र लिहिलं ते विजेंद्र म्हात्रे असं नाव आहे. उरणचा पत्ता आहे. तर पोस्टाचा शिक्का पनवेलचा आहे. पत्रावर पत्ता माझ्या जुन्या जागेचा आहे."

"पत्र संभ्रम करणारं आहे. पण भाषा विचार करून हीनदर्जाची मुद्दामपणे वापरली आहे. शिवसेनेच्या महिला कशा असतात हे सर्वांना माहिती आहे," असं त्या पुढे म्हणाल्यात.

अशाप्रकारची भाषा वापरून कट करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, मी शिवसेनेचं काम करते. त्यात माझं काही झालं तरी चालेल. पण कुटुंबाला धक्का लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर ते सहन करणार नाही, असंही पेडणेकर म्हणाल्या.

महापौर पेडणेकर यांनी या पत्रातील भाषेबाबत संताप व्यक्त केला आहे.

माध्यमांशी बोलताना पेडणेकर म्हणाल्या, "पत्र माझ्यासाठी सर्वप्रथम आहेच पण माझं कुटुंबही तेवढंच महत्त्वाचं आहे. आम्ही उद्धव ठाकरेंच्या कुटुंबातील आहोत. या कुटुंबाकडे त्यांचं लक्ष आहे. मी अशा गोष्टीला भीक घालत नाही. पण एवढ्या भाषेत लिहिणारी व्यक्ती नक्की कोणाशी तरी जोडलेली असेल हे नक्की. मुंबई पोलिसांवर माझा विश्वास आहे.

"सर्व महिला नेत्या आमच्याबरोबर आहेत. सगळेच नेते आमच्याबरोबर आहेत. कारण नसताना महाराष्ट्राची एवढ्या हीन पातळीवर बदनामी करण्याचा हा डाव आहे.

"प्रत्येकाच्या घरात ही नाती असतात. त्यांची विटंबना करणं करविणाऱ्यानं थांबवायला हवं. महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे. पण शिवरायांनी महिलांचा सन्मान करण्याचा दिलेला उद्देश विसरत चालले आहेत."

नेमकं प्रकरण काय?

भाजप नेते आशिष शेलार आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. याची सुरुवार आशिष शेलार यांच्या वक्तव्यापासून झाली.

वरळीच्या बीडीडी चाळीत सिलिंडरचा स्फोट होऊन चार महिन्याच्या बाळाचा आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. मुंबईच्या महापौर घटनेनंतर 72 तासांनी रुग्णालयात पोहोचल्या. त्यावर आशिष शेलारांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू झाला.

फोटो स्रोत, Getty Images

"72 तास तुम्ही का पोहचला नाही? करून दाखवलं म्हणता ना, मग कुठं निजून दाखवलं होतं? झोपला कुठं होतात?", अशा प्रकारचं वक्तव्य शेलारांनी केलं होतं.

त्यानंतर झोपला कुठं होतात या अर्थाने मी हा शब्द वापरतो आहे. निजणं म्हणजे झोपणं. या अर्थाने झोपला कुठं होतात हा प्रश्न विचारला तर यात गैर काय?, असं स्पष्टीकरणही शेलार यांनी दिलं होतं.

त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आशिष शेलार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आशिष शेलार यांना या प्रकरणी जामीन मिळाला असून, त्यांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, या प्रकारानंतर किशोरी पेडणेकर यांना एक धमकीचं पत्र मिळालं असून, त्यात त्यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसंच अर्वाच्य भाषेचा वापर यात करण्यात आल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)