उत्तर प्रदेश : कडेवर 3 वर्षांची चिमुकली असतानाही पोलिसाकडून लाठीमार

  • अनंत झणाणे
  • बीबीसी हिंदीसाठी
सोशल मीडिया वायरल

फोटो स्रोत, Twitter

उत्तर प्रदेशात कानपूरमध्ये मुलीला कडेवर घेतलेल्या व्यक्तीला पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर, या व्हीडिओत दिसणाऱ्या पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे.

हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करून त्याद्वारे राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर टीका केली जात आहे.

भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी या घटनेचा व्हीडिओ ट्वीट केल.

"सर्वांत दुबळ्या व्यक्तीलाही न्याय मिळेल अशी कायदे व्यवस्था सशक्त असते. उलट न्याय मागणाऱ्यालाच अत्याचाराचा सामना करावा लागणं योग्य नाही. हा प्रकार अत्यंत वेदनादायी आहे. भयभीत समाज हा कायदा सुव्यवस्थेचं उदाहरण नाही. सशक्त कायदेव्यवस्था म्हणजे कायद्याची भीती, पोलिसांची नव्हे," असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं.

पोलिसांनी या घटनेबाबत शुक्रवारी माहिती दिली आहे. कानपूर रेंजचे आयजी प्रशांत कुमार यांनीही शुक्रवारी पत्रकारांना संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या निलंबनाची माहिती दिली. या प्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश दिल्याचंही सांगण्यात आलं आहे.

"त्याठिकाणी एक वैद्यकीय महाविद्यालय बनत आहे. तो परिसर जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच आहे. त्यामुळं त्याठिकाणी धूळ माती उडत असते. मोठ्या गाड्या येतात. त्यामुळं रुग्णालयाच्या काही कर्मचाऱ्यांनी गेट बंद केलं. त्यामुळं ओपीडीवर परिणाम झाल्यानं पोलिसांना बोलावलं," असं प्रशांत कुमार म्हणाले.

"या कारवाईत आमच्या निरीक्षकांनी लाठीमार सुरू केला. त्यांनी तसं करायला नको होतो. समजावून लोकांना हटवायला हवं होतं. खासकरून मुलगी हातात असताना मारहाण करायला नको होती. अशा घटनांमधून असंवेदनशीलता झळकते. निरीक्षकाला निलंबित करण्यात आलं असून, विभागीय चौकशी सुरू झाली आहे."

प्रकरण काय?

ही घटना कानपूरच्या अकबरपूर परिसरातील आहे. त्याठिकाणी सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी एका स्थानिक मुद्द्यावरून संप पुकारला होता.

गुरुवारी पोलिसांनी हा संप मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या दरम्यान वाद चिघळल्यानं बळाचा वापर केला. संपाचं नेतृत्न करणाऱ्या रजनीश शुक्ला नावाच्या व्यक्तीला त्यांनी जीपमध्ये बसवलं.

त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी असलेल्या आणखी एका व्यक्तिला काठीनं मारहाण केली. त्या व्यक्तीच्या हातात त्यांची मुलगी होती.

त्या व्यक्तीचं नाव पुनीत शुक्ला असून ते रजनीश शुक्ला यांचे भाऊ आहेत. तर त्यांच्या हातात असलेली मुलगी रजनीश शुक्ला यांची मुलगी होती. तिचं वय तीन वर्षं असल्याचं सांगितलं जात आहे.

पोलीस पुनीत शुक्ला यांना काठीनं मारहाण करत असून, ते पाहून मुलगी एकसारखी रडत असल्याचं व्हीडिओमध्ये दिसत आहे.

पुनीतही मार खाताना पोलीस कर्मचाऱ्याला मुलीला लागेल, असं म्हणत असल्याचं स्पष्टपणे ऐकू येत आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)