शिवसेना-राष्ट्रवादी: जितेंद्र आव्हाड म्हणतात ...तर भाजप आम्हाला लांब नाही #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Twitter/Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाड
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1) ...तर भाजप आम्हाला लांब नाही - जितेंद्र आव्हाड
"मोठा भाऊ म्हणून आदर करु, मात्र बोलायचे एक आणि करायचे एक हे खपवून घेतलं जाणार नाही," असं राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड शिवसेनेला उद्देशून म्हणाले. ते नवी मुंबईत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत होते. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
यावेळी आव्हाडांनी सूचक इशाराही दिला की, भाजप आम्हाला फार लांब नाही.
"आम्ही आघाडी धर्म पाळून विरोधी पक्षात असलेल्या भाजपा आमदार गणेश नाईक यांच्यावर टीका करायची. तुम्ही मात्र पडद्यामागून संबंध ठेवायचे. मग आम्ही शत्रुत्व का घ्यायचं? राजकारणातील गणितं कधीही बदलू शकतात. मौका सभी को मिलता है. त्यामुळे आम्ही कुणाबरोबर जायचे याचे पर्याय खुले आहेत," असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.
येत्या काही महिन्यात महाराष्ट्रातल्या काही महापालिकांच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात एकत्रित सत्तेत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीतच जुंपण्याची शक्यता निर्माण झालीय.
दरम्यान, यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक केलं. 2024 मध्येही महाविकास आघाडीचंच सरकार येईल आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील असं शरद पवारांनी आपल्याला खासगीत सांगितल्याचं आव्हाडांनी म्हटलं.
2) पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेसोबत आघाडीची मानसिकता ठेवा - अजित पवार
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी आपल्याला अशी मानसिकता ठेवावी लागेल, असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ते पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी बोलत होते. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
फोटो स्रोत, Twitter
अजित पवार
अजित पवार म्हणाले, "काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याने त्यांच्यासोबतच्या आघाडीचा प्रश्न तूर्तास मिटलाय, पण शिवसेनेची इथं आपल्यासोबत आघाडी करायची तयारी दिसते. दोन पावलं ते मागे आले तर आपणही तशी भूमिका घेऊ."
काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेचा धागा पकडत अजित पवार म्हणाले, "काँग्रेसच्या नेत्यांनी आधीच स्वबळावर लढणार हे जाहीर केलंय. हे मी नव्हे तर त्यांनीच आधीच सांगितलंय. त्यामुळे तो प्रश्न मिटलाय, कारण ते आता स्वबळावर लढणार आहेत."
एकूणच महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतले प्रमुख पक्षही विविध ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढण्याचे चित्र दिसू शकतं, हे आता स्पष्ट होऊ लागलं आहे.
3) आरे शिवसेनेमुळे नव्हे, तर मुंबईकरांमुळे वाचलं - अमित ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे आता राजकारणात अधिक सक्रीय झालेले दिसून येत आहेत. समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतल्यानंतर अमित ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली. सकाळ वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
आरे कॉलनीतल्या जंगलासाठी दोन वर्षांपूर्वी मोठं आंदोलन झालं आणि त्यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे सक्रीयपणे भूमिका घेताना दिसले. मात्र, यावर बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, आरेचं जंगल हे शिवसेनेमुळे नव्हे, तर मुंबईकरांमुळे वाचलं आहे.
फोटो स्रोत, INSTAGRAM / AMIT THACKERAY
अमित ठाकरे
मनसे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यांवर साफसफाईची मोहीम राबवणार आहेत. या मोहिमेच्या अनुषंगाने बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, गेल्या 25 वर्षात काम केलं असतं तर आम्हाला याप्रकारे समुद्रकिनारे साफ करण्याची वेळ आलीच नसती.
येत्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या मैदानात अमित ठाकरे अधिक सक्रीयपणे उतरल्याचे दिसतील, अशी चर्चा आहे.
4) आरोग्य खात्यातील पेपरफुटीची चौकशी करा, अन्यथा CBI कडे जाऊ - पडळकर
"आरोग्य खात्यातील परीक्षेच्या पेपर फुटीप्रकरणाची तातडीने न्यायालयीन चौकशी करा. सोबतच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचीही चौकशी करा," अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलीय. राज्य सरकारनं चौकशीबाबत टाळाटाळ केल्यास सीबीआयकडे जाण्याचा इशाराही पडळकरांनी दिलाय. टीव्ही 9 मराठीने ही बातमी प्रसिद्ध केलीय.
"आरोग्य मंत्र्यांचा आणि घोटाळेबाजाचा संबंध नेमका काय आहे? हे जनतेला कळलं पाहिजे. हे प्रकरण म्हणजे सगळी यंत्रणाच पोखरलेली आहे. या गंभीर घोटाळ्याची आरोग्य मंत्र्यांसहीत न्यायलयीन चौकशी झालीच पाहिजे," असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
तसंच, "आरोग्यमंत्र्यांचे हे कारनामे आरोग्य विभागाच्या पदभरती घोटाळ्यामुळं पुराव्यानिशी सिद्ध झाले आहेत. हे सरकार आता अधिकृतरित्या वसुली सरकार म्हणून मान्यता प्राप्त झालेलं आहे," अशी टीकाही पडळकरांनी राज्य सरकारवर केलीय.
5) जामिनाच्या अटी शिथील करा, आर्यन खानची हायकोर्टात याचिका
ड्रग्ज प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या आर्यन खाननं जामिनाच्या अटी शिथील करण्याची विनंती करणारी याचिका मुंबई हायकोर्टात केलीय. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.
दर शुक्रवारी एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश हायकोर्टानं आर्यन खानला दिले आहेत. मात्र, एनसीबीनं हे प्रकरण चौकशीसाठी दिल्लीमधील विशेष तपास पथकाला दिलंय. त्यामुळे मुंबई कार्यालयात हजेरी लावण्याची अट शिथील करावी, अशी मागणी आर्यननं याचिकेतून केलीय.
एनसीबी कार्यालयात जाताना पोलीस संरक्षण घ्यावे लागते, कारण प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी हजर असतात, असंही आर्यननं याचिकेत म्हटलंय.
या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)