शरद पवारांच्या विचारांना भगवं कव्हर घातलंय - संजय राऊत #5मोठ्याबातम्या

संजय राऊत

फोटो स्रोत, Getty Images

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1) शरद पवारांच्या विचारांना भगवं कव्हर घातलं - संजय राऊत

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणांचा पत्रकार सुधीर भोंगळे यांनी संपादित केलेला संग्रह काल (11 डिसेंबर) प्रकाशित झाला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाषणादरम्यान राजकीय टोलेबाजी केली. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

या संग्रहाचं मुखपृष्ठ भगव्या रंगाचं असल्यानं, तो धागा पकडत संजय राऊत हे पवारांना उद्देशून म्हणाले, "तुमच्या विचारांना भगवं कव्हर घातलं आहे. हे सरकार बेरंग नाही. अवघा रंग एकचि झाला. महाविकास आघाडीचा जो ग्रंथ आहे, त्याला आपण निर्माण केला आहे, त्याला आपण भगवं कव्हर घातलं."

राऊतांच्या या टोलेबाजीनंतर सभागृहात उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

यावेळी संजय राऊत यांनी नवी दिल्लीत संसदेबाहेर खासदारांच्या निदर्शनस्थळी शरद पवारांना बसण्यासाठी खुर्ची का आणून दिली, यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, ज्यांना तो प्रश्न पडलाय, त्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे.

फोटो स्रोत, Facebook/NCP

दरम्यान, "भाजपाला देशाचं ऐक्य नको हे शरद पवार यांनी 25 वर्षापूर्वी सांगितलं होतं, आम्हाला 2 वर्षापूर्वी कळलं," असा टोला राऊतांनी पवारांच्या एका भाषणाचा संदर्भ देत भाजपला लगावला.

2) अनेक वर्षे हिंदूंचा अपमान, मोदींनी मिळवून दिला सन्मान - अमित शाह

"हिंदू समाजाच्या श्रद्धा केंद्रांचा अनेक वर्षांपासून अपमान करण्यात आला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून अशा स्थळांचं नूतनीकरण केलं जातंय," असं केंद्रीय गृहमंत्री अत शाह अहमदाबादमधील एका कार्यक्रमात बोलत होते. झी चोवीस तासनं ही बातमी दिलीय.

पूर्वी लोक मंदिरात जाण्यास टाळाटाळ करत होते, परंतु मोदी सरकारमुळे नवीन युग सुरू झाल्याचंही अमित शाह म्हणाले.

फोटो स्रोत, Twitter

अहमदबादमधील कडवा पाटीदार पंथाची देवी 'माँ उमिया' यांना समर्पित उमियाधाम मंदिराची पायाभरणी समारंभात अमित शाह बोलत होते. 1500 कोटी रुपये खर्च करून हे मंदिर उभारले जात आहे.

"मंदिरे ही केवळ धार्मिक श्रद्धेची केंद्रेच नाहीत, तर ती समाजसेवेची आणि जीवनातून निराश झालेल्या लोकांसाठी त्यांच्या अडचणींवर मात करून पुढे जाण्यासाठी ऊर्जा देणारी केंद्रे आहेत," असं प्रतिपादनही अमित शाह यांनी यावेळी केलं.

3) मराठा आरक्षण आंदलोनातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी मिळणार

मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देणार असल्याची घोषणा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

वारसांना फक्त महामंडळात नोकरी न देता गुणवत्तेच्या आधारावर योग्य नोकरी देण्यात यावी, असं राजेश टोपे म्हणाले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ज्या मराठा युवकांना मदत करण्यात आली त्यांची यादी ट्विटरवरुन शेअर केली होती. सतत पाठपुरावा केल्यानं मराठा समाजातील 34 युवकांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये मदत देण्यात आल्याचं ट्विट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं होतं.

4) ट्वीट आणि कँडल मार्चनं भाजपचा पराभव अशक्य - प्रशांत किशोर

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर टीका केलीय. ट्वीट आणि कँडल मार्चच्या माध्यमातून तुम्ही भाजपला हरवू शकत नाही, असं प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला उद्देशून म्हटलं. लोकमतनं ही बातमी दिलीय.

"देशात काँग्रेसशिवायदेखील विरोधीपक्ष शक्य आहे. तसेच, पक्ष वाचवायचा असेल, तर लोकशाही पद्धतीने गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीकडे अध्यक्षपदाची धुरा द्यावी लागेल," असं प्रशांत किशोर म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images

"1984 नंतर काँग्रेसला एकातरी लोकसभा निवडणुकीत एक हाती विजय मिळाला? गेल्या दहा वर्षांत काँग्रेसचा 90 टक्के निवडणुकीत पराभव झाला आहे. काँग्रेस नेतृत्वाने पराभवाची जबाबदारी स्वीकारायला हवी," असंही प्रशांत किशोर म्हणाले.

5) लावालावी करणं हेच संजय राऊत यांचं काम - नारायण राणे

संजय राऊत हे शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे? असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत हे लावालावीचं काम करतात, असाही आरोप राणेंनी केला. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, FACEBOOK/NARAYAN RANE

"दिल्लीत पवार साहेबांच्याच कार्यालयात ते असतात. पक्षाशी त्यांची निष्ठा नाही. ते पक्षाशी प्रामाणिक नाहीत. ते आव आणायचं काम करत आहेत. ते दाखवतात तसे ते नाहीत," असं नारायण राणे हे संजय राऊत यांना उद्देशून म्हणाले.

यावेळी नारायण राणेंनी महाविकास आघाडी सरकारवरही टीका केली.

राणे म्हणाले, "राज्यातील आताचं हे सरकार चालत नाहीय. एसटी कामगारांचा प्रश्न हे सरकार सोडवू शकत नाही. राज्याचा विकास रखडला आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)