TET परीक्षेतील घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन

फोटो स्रोत, Pune Police
तुकाराम सुपे
पुणे पोलिसांकडून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. टीईटीच्या (शिक्षक पात्रता परीक्षा ) परीक्षेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
म्हाडाचा पेपर फुटण्यापूर्वी पुणे पोलिसांनी जी.ए. सॉफ्टवेअरच्या डॉ. प्रितिश देशमुख यांना अटक केली. त्यांच्याबरोबर आणखी दोघांना अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे 4 पेन ड्राईव्ह, टॅब, मोबाईल तसेच वेगवेगळ्या परिक्षार्थींचे 40 हून अधिक हॉल तिकीट आढळून आले होते. त्यामध्ये टीईटी परिक्षेला बसलेल्या काही परिक्षार्थींचे हॉल तिकीट होते.
त्यामुळे राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या परीक्षांची कार्यपद्धती काय होती, टीईटीचे पेपर कोणी तयार केले, त्या पेपरच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाकडे होती, या सगळ्याबाबतची चौकशी तुकाराम सुपे यांच्याकडे गुरुवारी (16 डिसेंबर) करण्यात आली. चौकशीमध्ये गैरव्यवहार आढळल्याने त्यांना अटक करण्यात आली.
दरम्यान, TET परीक्षेतील घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी शालेय शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
त्या म्हणाल्या, "वंदना कृष्णा समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. कायदेशीर चौकशीसाठी शिक्षण विभाग सहकार्य करेल. कोणाचाही सहभाग असला तरी त्यांची हयगय केली जाणार नाही."
पुणे पोलिसांनी काय म्हटलं?
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन तुकाराम सुपेंच्या अटकेबाबत माहिती दिली.
अमिताभ गुप्ता म्हणाले, "दोन पेपर फुटीचा तपस करताना म्हाडाची लिंक लागली. त्यातून काही लोकांना अटक केली. त्यात टीईटीच्या परीक्षेत घोटाळा असल्याचे समोर आले. त्यात गुन्हा दाखल करून तुकाराम सुपे यांना अटक केली. राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी फिर्याद दिली."
"सुपेंकडून 88 लाख रुपये रोख रक्कम आणि सोनं सापडलं. ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना पेपर लिहू नका. तसंच, पुनर्तपासणीला द्या असं सांगायचे," अशी माहिती गुप्तांनी सांगितलं.
विद्यार्थ्यांनी सुरुवातीला माहिती दिली, त्यातून लिंक शोधत सुपेंपर्यंत आलो आहोत, असंही गुप्ता म्हणाले.
जानेवारी 2020 मध्ये टीईटीची परीक्षा झाली होती.
काही दिवसांपूर्वी म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं होतं.
'म्हाडा' परीक्षा : पोलिसांनी तिघांना केली अटक, 18 डिसेंबरपर्यंत कोठडी
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडामध्ये विविध पदांच्या भरतीसाठी 12 डिसेंबरला परीक्षा नियोजित होती. मात्र, 'अपरिहार्य कारणामुळे' ही परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षार्थींनी मात्र परीक्षेचा पेपर फुटल्याची शक्यताही बोलून दाखवली.
म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय.
फोटो स्रोत, Twitter/Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाड
म्हाडाच्या परीक्षेविषयी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सविस्तर माहिती दिली.
तपासात काय आढळलं?
अमिताभ गुप्ता म्हणाले, "म्हाडाचा पेपर फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने तपास करत असताना क्राइम ब्रांचची पथके तयार करून संशयितांना औरंगाबाद, जालना, बीड, ठाणे, पुणे परिसरातुन ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली.
"टार्गेट करियर पॉईंट या संस्थेचे संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडमीचे संचालक कृष्णा जाधव यांच्याकडे म्हाडाच्या परीक्षेला बसलेल्या 3 विद्यार्थ्यांचे ओळख पत्र मिळाले होते. त्याचबरोबर पुण्यात राहणारे संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांनी म्हाडाच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या परीक्षार्थींना पेपर देण्याचे ठरवले होते."
ते पुढे म्हणाले, "पोलिसांनी अजय चव्हाण, कृष्णा जाधव आणि त्यांचे सहकारी अंकित चनखोरे यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली तेव्हा त्यांच्याकडे 3 विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र, कोरे चेक, आणि आरोग्य विभागाच्या क आणि ड परीक्षेला बसलेल्या काही विद्यार्थ्यांच्या नावाच्या याद्या मिळल्या.
"संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांचा मागोवा घेतला असता पोलिसांना त्यांच्या कारमध्ये म्हाडाची परीक्षा ज्या संस्थेच्या मार्फत घेण्यात येणार होती त्या जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचे संचालक प्रितीश देशमुख दिसून आले. देशमुख यांच्या झडतीमध्ये त्यांच्या लॅपटॉपमध्ये म्हाडाच्या परीक्षेचे पेपर मिळून आले. तसेच त्यांच्याकडे असलेल्या लिफाफ्यामध्ये पेन ड्राईव्ह मिळून आले. त्यामध्ये म्हाडा परीक्षेचे पेपर सेट असल्याचं आढळलं आहे.
पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता
"या प्रकरणी अंकुश हरकळ ( रा. बुलढाणा ), संतोष हरकळ ( सध्या रा. औरंगाबाद ) आणि डॉ. प्रीतीश देशमुख (रा. पुणे ) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना 18 डिसेंबर पर्यंत कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे."
दरम्यान, या सगळ्या प्रकाराविषयी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, "म्हाडाच्या परीक्षाप्रकरणी गोपनीयतेचा भंग झाला, अशी पोलिसांनी तक्रार घेतली आहे. पेपर फुटला की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. होतकरू विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही,अशी शंका आल्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
"हे पेपर फक्त एकाच व्यक्तीला माहिती होते आणि तीच व्यक्ती असं करत असेल, तर विश्वास कुणावर ठेवायचा, असा प्रश्न आहे. महाराष्ट्रात सगळ्या परीक्षांचे दलाल हे साधारण एकाच टोळीतले आहेत."
आव्हाड पुढे म्हणाले, "यानंतरच्या परीक्षेत म्हाडा स्वत: पेपर सेट करेल, स्वत: परीक्षा घेईल. परीक्षेसाठी घेतलेली फी परत करण्यात येईल, पुढच्या परीक्षेवेळी विद्यार्थ्यांनाकडून कोणतीही फी आकारली जाणार नाही."
प्रकरण काय?
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडामध्ये विविध पदांच्या भरतीसाठी आज (12 डिसेंबर) परीक्षा नियोजित होती.
मात्र जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर-फेसबुकवर रात्री 1.54 वाजता व्हीडिओ शेअर करत सांगितलं की, "सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून, काही अपरिहार्य कारणामुळे, तांत्रिक अडचणीमुळे उद्याची (12 डिसेंबर) होणारी म्हाडाची परीक्षा आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षा या जानेवारीत घेतल्या जातील. त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत."
आव्हाड पुढे म्हणाले, "ही माहिती एवढ्या रात्री यासाठी देतोय की, विद्यार्थ्यांनी सकाळी घराबाहेर पडून सेंटरवर जाऊ नये, त्यांना त्रास होऊ नये, त्यांनी गाव सोडू नये. परत एकदा आपली क्षमा मागतो."
परीक्षा अचानक रद्द केल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे. यापूर्वी आरोग्य भरतीच्या परीक्षेवेळीही असाच अचानक परीक्षा पुढे ढकलण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळातूनही या प्रकारावर टीका होतेय.
'हे लोक आमच्या आयुष्याशी खेळतायेत'
माळशिरस (सोलापूर) च्या कुरबावी येथील विशाल रुपनवर हे म्हाडाची परीक्षा देण्यासाठी पुण्यात आले होते.
ते बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "हे लोक आमच्या आयुष्यासोबत खेळत आहेत. कशावरच विश्वास उरला नाही. परीक्षा केंद्रावर जाईपर्यंत मनात धाकधुक असते. तिथं गेल्यावर पण परीक्षा रद्द होईल काय? पेपर फुटेल काय असे प्रश्न मनात येतात. आम्ही अभ्यास करायचा का यांच्या गोंधळाकडं लक्ष द्यायचं?
"अनेकांची वयमर्यादा निघून चाललीय. म्हाडाने 14 पोस्टसाठी वेगवेगळ्या परीक्षा घेण्याचं ठरवलं होतं. प्रत्येक परीक्षेसाठी 500 रुपये फी होती. मी 2 पोस्टसाठी 1 हजार रुपये भरले. माझ्या मित्रांनी 4 फॉर्मसाठी 2 हजार फी दिली. एवढे पैसे काय झाडाला लागतात का?"
फोटो स्रोत, Vishal Rupanwar
विशाल रुपनवर
ते पुढे सांगतात, "एसटी बंद आहे म्हणून काल (शनिवारी) मी टू-व्हीलरवर पुण्याला निघालो. दीडशे किलोमीटर प्रवास केला. गाडीत 500 रुपयांचं पेट्रोल टाकलं. पुण्यात भावाकडं राहिलो. रात्रभर अभ्यास करून पहाटे थोडं झोपावं म्हटलं तर आव्हाड साहेबांनी परीक्षा पुढं ढकलल्याचं कळलं.
"साहेब म्हणतात 'एवढ्या रात्री माहिती देतोय कारण मुलांनी सेंटर वर जाऊ नये. त्यांनी गाव सोडू नये आणि त्यांना त्रास होऊ नये.' म्हणजे परीक्षांची काही विश्वासार्हता राहिली की नाही? या सरकारला खरंच मुलांची काळजी आहे का?"
सोशल मीडियावरील काही निवडक प्रतिक्रिया
म्हाडाची परीक्षा वेळेवर पुढे ढकलल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.
प्रतिक के नामक युजरनं म्हटलंय की, "मी परराज्यात शिकायला असतो. पेपरसाठी 300-400 किमीचा प्रवास करून आलोय. बरेचजण अर्ध्या वाटेत असतील. निदान राजस्थानसारखं पुढील परीक्षेवेळी येण्या-जाण्याचा खर्च तरी द्या."
फोटो स्रोत, Twitter
अंकित धात्रक नामक युजरनं आरोग्य भरतीवेळी झालेल्या गोंधळाची आठवण जितेंद्र आव्हाड यांना करून दिलीय.
फोटो स्रोत, Twitter
विराज भामरे या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या महाराष्ट्र सचिवांनी जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. त्यांनी आव्हाडांना रिप्लाय देताना भरती परीक्षेच्या नियमांचा फोटो पोस्ट केला आहे आणि परीक्षा केंद्रावर आदल्या दिवशी उपस्थितीचे आदेश असल्याची आठवण करून दिलीय.
अमरसिंह गायकवाड नामक युजरनं म्हटलंय की, "गावापासून 300 किलोमीटरवरून आलोय, आणि आता परत जाणं खर्चिक आहे. थोडा विचार करावा, ही विनंती."
फोटो स्रोत, Twitter
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)