काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं ही आहेत वैशिष्ट्य; नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं लोकार्पण

  • विक्रांत दुबे
  • बीबीसी हिंदीसाठी, वाराणसीहून
काशी

फोटो स्रोत, ANI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी विश्वनाथ धामचं बनारसमध्ये लोकार्पण झालं.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या लोकार्पणाला मोठ्या उत्सवाचं स्वरूप दिलं आहे. बनारस शहराला सजावट करण्यात आली आहे.

हा महोत्सव सुरू असताना उत्तर प्रदेशात निवडणुकांचा धुरळा उडालेला असेल. जाणकारांच्या मते मोदी आणि योगी सरकारचा प्रयत्न आहे की काशी विश्वनाथ धाम लोकार्पण सोहळ्यात निर्माण होणाऱ्या प्रतिमांना धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न असेल.

बनारसला देशासमोर धर्म आणि विकासाचं प्रारूप म्हणून सादर करण्याचा केंद्र तसंच राज्य सरकारचा प्रयत्न आहे. जेणेकरून याचा सकारात्मक परिणाम निवडणुकांमध्ये दिसून येईल. म्हणूनच सरकारी पातळीवरून या कार्यक्रमाला भव्य रूप देण्यात आलं आहे.

अहिल्याबाई होळकर यांनी केला होता जिर्णोद्धार

अहिल्याबाई होळकर यांनी काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. यानंतर 350 वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराचा विस्तार आणि पुनरुद्धार याचं भूमिपजून 8 मार्च 2019 रोजी केलं होतं.

फोटो स्रोत, ANI

भूमिपूजनानंतर जवळपास दोन वर्ष आणि 8 महिन्यांनंतर स्वप्नवत प्रकल्प 95 टक्के पूर्ण झाला आहे. या प्रकल्पासाठी 340 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. खर्चासंदर्भात अधिकृत पातळीवर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

संपूर्ण कॉरिडॉर 50,000 वर्ग मीटर परिसरात तयार करण्यात आला आहे. मुख्य दरवाजा गंगा नदीच्या दिशेने असून ललिता घाटाकडे जातो.

फोटो स्रोत, VIKRANT DUBEY

फोटो कॅप्शन,

काशी विश्वनाथ

विश्वनाथ कॉरिडॉर तीन भागांमध्ये विभागला गेला आहे. मंदिराचा मुख्य भाग लाल बलुआ दगडांनी तयार करण्यात आला आहे. यामध्ये 4 मोठी प्रवेशद्वारं तयार करण्यात आली आहेत. चारही बाजूंना प्रदक्षिणेसाठी मार्ग तयार करण्यात आला आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये?

या प्रदक्षिणा पथावर संगमरवराचे 22 शिलालेख उभारण्यात आले असून त्यावर काशीची महती मांडण्यात आली आहेत.

कॉरिडॉरमध्ये 24 भवनंही तयार करण्यात येत आहेत. या भवनांमध्ये मुख्य मंदिर परिसर, मंदिर चौक, मुमुक्षू भवन, भाविकांच्या सोयीसाठी सुविधा केंद्र, 4 शॉपिंग संकुलं, बहुविध हॉल, सिटी म्युझियम, वाराणसी गॅलरी, जलपान केंद्र, व्ह्यू कॅफे अशा असंख्य गोष्टी असणार आहेत.

धाम चमकदार करण्यासाठी 5000 विविध प्रकाराचे लाईट्स बसवण्यात आले आहेत. खास प्रकारचे हे लाईट्स दिवसा, दुपारी आणि रात्री रंग बदलत राहतील.

धामच्या उभारणीचं काम करणाऱ्या पीएसपी कंपनीचे सीएमडी पीएम पटेल यांनी सांगितलं की कॉरिडॉरच्या व्यवस्थेसाठी ज्या ज्या सुविधांची आवश्यकता आहे त्यांची काळजी घेण्यात आली आहे. संग्रहालय, गॅलरी, मुमुक्षू केंद्र, खाण्यापिण्याची व्यवस्था.

अध्यात्मिक पुस्तकं पाहायची असतील तर वैदिक केंद्रही तयार करण्यात आलं आहे.

काशीला उत्सवाचं स्वरुप

कॉरिडॉर लोकार्पणाच्या निमित्ताने काशीला उत्सवाचं स्वरुप आलं आहे. सरकारी भवन, नाकानाक्यांवर, चौकाचौकात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

लोकांनीही स्वत:ची घरं आणि कार्यालयं सजवली आहेत. ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज संध्याकाळी दिवाळीत असतं त्याप्रमाणे दिव्यांची रोषणाई करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, VIKRANT DUBEY

फोटो कॅप्शन,

बनारसमधील दृश्य

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

कॉरिडॉरपर्यंत जाणाऱ्या मार्गावरील प्रत्येक भवनाला गेरुई रंगाने सजवण्यात आलं आहे. या मार्गातील मशिदीलाही गेरुई रंग देण्यात आला तेव्हा या सजावटीत अडथळा निर्माण झाला होता. मुस्लीम समाजाने शांततेच्या मार्गाने आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर मशिदीला पुन्हा पांढरा रंग देण्यात आला. मुस्लीम समाजाने काशी विश्वनाथ धामाची निर्माण प्रक्रिया सकारात्मक पद्धतीने स्वीकारली. त्यांनी प्रशासनाचं कौतुकही केलं आहे.

सरकारी पातळीप्रमाणेच सर्वसामान्य माणसंही या लोकार्पणासाठी सज्ज झाल्याचं जाणवत आहे. "उत्सव आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉर अख्ख्या काशीसाठी सन्मानाची गोष्ट आहे. काशीमध्ये देवांची दिवाळी साजरी केली जाते. यंदा आम्ही शिव दिवाळी साजरी करत आहोत", असं रेस्टॉरंट आणि सिनेमा व्यावसायाशी निगडीत उद्योजक आलोक दुबे यांनी सांगितलं.

पश्चिम बंगालमधल्या खडगपूरहून बनारस फिरायला आलेल्या महेंद्र गुप्ता यांनी सांगितलं की आधी दोनदा येऊन गेलो आहे. पण आताचं वातावरण अविश्वसनीय आहे.

विश्वनाथ धामाविषयी ब्लॉग आणि व्हीडिओमध्ये वाचलं आणि ऐकलं आहे. इथलं वातावरण व्हीडिओत दिसतं त्यापेक्षा कैक पटींनी उत्साहाने भारलेलं आहे.

याआधी येत असे तेव्हा मंदिराच्या कळसाचं दर्शन घ्यायला अडचण होत असे, आता मंदिराच्या शिखरासह सगळ्या गोष्टी सहजपणे पाहता येतात.

विश्वनाथ मंदिरात अनेक वर्ष पुजारी म्हणून काम करणारे श्रीकांत मिश्र यांनी बीबीसीला सांगितलं की, "शिवभक्त अहिल्याबाई होळकर यांनी 350 वर्षांपूर्वी सध्याच्या श्री काशी विश्वनाथ मंदिराची निमिती केली होती. 2000 वर्ग मीटर वर पसरलेल्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांना अरुंद गल्ले आणि रस्त्यातून जावं लागत असे. देवळात खूपच कमी जागा होती. तिथपर्यंत पोहोचणं हे आजारी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी कठीण होऊन जात असे".

16 लाख लाडूंचा प्रसाद घरोघरी वाटले जाणार

लोकार्पणाच्या कार्यक्रमात देशभरातून 3000 पाहुणे सहभागी होणार आहेत. भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांसह आमदार, खासदारांना बोलावण्यात आलं आहे. देशभरातून येणार असलेल्या साधुसंतांच्या आदरातिथ्याची जबाबदारी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

बनारसमध्ये भव्य काशी- दिव्य काशी नावाचा एक महिन्याचा उत्सव साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमापासून बनारसमधील कोणाला वंचित राहायला लागू नये म्हणून 16 लाख लाडूंचा प्रसाद घरोघरी वाटला जाणार आहे. कार्यकर्त्यांकडे लाडूवाटपाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याच्याबरोबरीने लोकांना स्मरणिकाही देण्यात येणार आहे.

कॉरिडॉरच्या उभारणीत 400 घरं विस्थापित

काशी विश्वनाथ धामाच्या उभारणीसाठी 400 घरं आणि शेकडो मंदिरं अन्यत्र स्थानांतरित करण्यात आली. विश्वनाथ मंदिर लोकसंख्येची प्रचंड घनता असलेल्या असल्याकारणाने 400 मालमत्ता खरेदी करण्यात आल्या आणि 1400 नागरिकांना अन्यत्र हलवण्यात आलं.

2 वर्ष आणि 8 महिन्यात ड्रीम प्रोजेक्टचं काम 95 टक्के झालं आहे. कॉरिडॉरच्या उभारणीकरता 2,600 कामगार आणि 300 अभियंते तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत.

कॉरिडॉरच्या उभारणीसाठी 400 घरांवर ताबा मिळवण्यात आला. काशी खंडोक्त मंदिराच्या जीर्णोध्दाराचं काम सुरू करण्यात आलं आहे. यासाठी पूर्वेकडच्या सरस्वती गेट परिसरात 27 देवळांची मणिमाळा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये मंदिरं उभारली जाणार आहेत. हे काम कॉरिडॉरच्या दुसऱ्या टप्प्यात पूर्ण होणं अपेक्षित आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)