विधान परिषद निवडणूक निकाल: बावनकुळे, खंडेलवाल विजयी

विधान परिषद निवडणुका निकाल, चंद्रशेखर बावनकुळे, वसंत खंडेलवाल

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन,

चंद्रशेखर बावनकुळे

विधान परिषद निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे तर अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात वसंत खंडेलवाल विजयी ठरले आहेत.

विधानपरिषदेच्या एकूण 6 जागांवर निवडणुका आयोगानं जाहीर केल्या होत्या. त्यातील मुंबईतल्या दोन जागा, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबार या चार जागांवर बिनविरोध निवडणुका झाल्या, तर अकोला-वाशिम बुलडाणा आणि नागपूरमध्ये मतदान झालं.

अकोला-वाशिम-बुलडाण्यात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया विरूद्ध भाजपचे वसंत खंडेलवाल असा सामना रंगला आहे, तर नागपुरात भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंसमोर काँग्रेसचा उमेदवार होता. मात्र आयत्यावेळी समीकरण बदललं.

नागपूरच्या जागेवर भाजपनं चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाला पसंती दिली. विधानसभा निवडणुकीवेळी मंत्री राहिलेल्या बावनकुळे यांना तिकीट नाकारल्याची बरीच चर्चा झाली होती. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना पक्षाने तिकीट दिलं.

काँग्रेसनं थेट पक्षाचा नगरसेवक फोडून त्यांना उमेदवारी दिल्यानं भाजपनं आपले नगरसेवक सहलीवर पाठवले. मतदान फुटू नये म्हणून भाजपकून सतर्कता बाळगण्यात आली होती.

मात्र, मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रक काढत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. या गोंधळाचा फायदा उठवत बावनकुळे यांनी बाजी मारली.

बावनकुळे यांना 362 मतं मिळाली. मंगेश देशमुख यांना 186 मतं मिळाली. छोटू भोयर यांना अवघं एक मत मिळालं. 5 मत अवैध ठरली.

बावनकुळे यांचा विजय ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. नागपूर तसंच अकोल्यात भाजप उमेदवारांचा विजय हा महाविकास आघाडीसाठी धक्का मानला जात आहे. नागपुरात काँग्रेसला आयत्यावेळी उमेदवार मागे घ्यावा लागला. अकोल्यात शिवसेनेच्या आमदाराचा पराभव झाला.

अकोल्यात खंडेलवाल विजयी

अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली. यामध्ये भाजपचे वसंत खंडेलवाल विजयी झाले. वसंत खंडेलवाल हे नितीन गडकरी समर्थक आहेत.

फोटो स्रोत, MLS.ORG.IN

फोटो कॅप्शन,

विधिमंडळ

गोपिकिशन बाजोरिया गेली तीन टर्म आमदार होते. त्यांचा पराभव हा शिवसेनेसाठी आणि पर्यायाने महाविकास आघाडीसाठी धक्का मानला जात आहे.

खंडेलवाल यांना 443 तर बाजोरिया यांना 334 मतं मिळाली. 31 मतं बाद झाली. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर चित्र स्पष्ट झालं आहे.

मी निवडून आलो त्यापेक्षाही जास्त आनंद बावनकुळेंच्या विजयाने झाला- फडणवीस

"मी स्वत: निवडून आलो त्यापेक्षा जास्त आनंद चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयाने झाला आहे. महाविकास आघाडीला चपराक लागली आहे. वसंत खंडेलवाल यांनीही अकोल्यात निर्णायक विजय मिळवला आहे. नेव्हर गो बॅकवाला कमबॅक आहे. कार्यकर्त्यांचा मनोधैर्य उंचावणारा विजय आहे", असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

राजू भोयर यांच्यासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले, "राजू भोयर काँग्रेसमध्ये गेले ही पहिली चूक. काँग्रेसमध्ये त्यांची जी अवस्था ती सगळ्यांसमोर आहे".

"नागपूर आणि अकोल्यात महाविकास आघाडीचीही मतं मिळाली. चंद्रशेखर बावनकुळेंचा विजय हा आगामी काळातील भाजपच्या विजयाची नांदी आहे. विधान परिषदेच्या सहापैकी चार जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र आले तरी भाजपचा पराभव करू शकत नाही", असं फडणवीस यांनी सांगितलं.

कोल्हापूरमध्ये सतेज पाटील बिनविरोध

विधान परिषदेच्या कोल्हापूरमधील जागेवरून काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

अमल महाडिक यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्यानं कोल्हापुरात रंगू पाहणारा 'पाटील विरुद्ध महाडिक' गटातील सामना तूर्तास टळला आहे.

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन,

सतेज पाटील

दुसरीकडे, मुंबईतील विधान परिषदेच्या दोन जागाही बिनविरोध झाल्यात. मुंबईत काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या सुरेश कोपरकरांनी माघार घेतली आहे. त्यामुळे भाजपचे राजहंस सिंग आणि शिवसेनेचे सुनील शिंदे हे बिनविरोध विधान परिषदेत जातील.

धुळे नंदुरबारमध्ये भाजपकडून माजी मंत्री अमरिश पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीतर्फे गौरव वाणी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र काँग्रेस चे गौरव वाणी यांनी अर्ज मागे घेतला तसेच शाम सनेर,भुपेश पटेल, आणि दीपक दिघे यांनीही अर्ज मागे घेतले.

मुंबईच्या दोन, धुळे-नंदुरबार, वाशिम - बुलढाणा - अकोला, कोल्हापूर आणि नागपूर या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून होणारी ही निवडणूक आहे.

मुंबईत दोन्ही 'भाई' मैदानाबाहेर?

मुंबईतल्या दोन जागांसाठी शिवसेनेकडून माजी मंत्री रामदास कदम यांना डच्चू देऊन सुनील शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रामदास कदम यांना उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेटमध्ये स्थान मिळालं नसल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती.

त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी अनिल परब यांच्या विरोधातील काही रसद रामदास कदम यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना पुरवल्याचे आरोप झाले.

फोटो स्रोत, BHAI JAGTAP/FACEBOOK

फोटो कॅप्शन,

आमदार भाई जगताप

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

त्यासंदर्भातल्या ऑडियो क्लिपस् ही व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाराज असल्याचंही बोललं जात होतं. हेच प्रकरण रामदास कदम यांना भोवलं असून यामुळे कदमांना उमेदवारी नाकारल्याच्या चर्चा आहेत.

सुनील शिंदे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं.

त्यावेळी विद्यमान आमदार असलेल्या सुनील शिंदेंना आदित्य ठाकरेंसाठी वरळीची जागा सोडावी लागली होती. त्यादरम्यान सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता.

मुंबई महापालिकेत 227 जागांपैकी 103 जागा या शिवसेनेच्या आहेत. 83 जागा या भाजपच्या आहेत. एका उमेदवारासाठी साधारण 75-77 मतांचा कोटा असू शकतो.

त्यामुळे कॉंग्रेसकडे तितकी मतं नसल्यामुळे कॉंग्रेसने ही जागा न लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाई जगताप यांना काही काळ तरी विधीमंडळातून दूर राहून मुंबई अध्यक्षपद सांभाळावं लागेल.

भाजपकडून राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजहंस सिंह हे कॉंग्रेसचे माजी आमदार होते. 2017 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राजहंस सिंह या उत्तर भारतीय चेहर्‍याला संधी दिली असल्याचं बोललं जातंय. मुंबईच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधून होणारी ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)