हरनाझ संधूः बॉडी शेमिंगवर मात करुन कशी बनली मिस युनिव्हर्स?

फोटो स्रोत, Getty Images
भारताला 21 वर्षांनंतर मिस युनिव्हर्सचा किताब मिळवून देणारी हरनाझ संधू पंजाबमधील मोहालीची आहे. तिचं मूळ गाव कोहाली गुरुदासपूर जिल्ह्यात आहे.
वयाच्या 17 व्या वर्षापासून हरनाझ सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. याआधी ती 'मिस दीवा 2021' हा किताबही जिंकली आहे.
2019 मध्ये तिने 'फेमिना मिस इंडिया पंजाब' ही स्पर्धा जिंकली होती आणि 2019मध्ये 'फेमिना मिस इंडिया' स्पर्धेत पहिल्या 12 जणींमध्ये स्थान मिळवलं होतं.
हरनाझची आई डॉ. रविंदर कौर यांच्याशी बीबीसीने चर्चा केली. रविंदर कौर यांनी हरनाझच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगितलं.
वडिलांनी परवानगी दिल्यावर केला भांगडा
रविंदर कौर म्हणाल्या, "सौंदर्यस्पर्धांमध्ये प्रवेश घेण्याला 2017मध्ये सुरुवात झाली. सेक्टर 42च्या सरकारी कॉलेजमध्ये हरनाझने प्रवेश घेतल्यावर झालेल्या फ्रेशर्स पार्टीमध्ये ती सेकंड रनरअप झाली. त्यानंतर तिने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि पुढे जात राहिली."
हरनाझ सध्या चंदिगढच्या सरकारी कॉलेज सेक्टर 42मधून पब्लिक अमिनिस्ट्रेशमध्ये एमए करत आहे.
हरनाझ संधूचे वडील प्रीतम सिंह संधु यांनी तिच्या यशाबदद्ल आनंद व्यक्त केला. इतके लोक शुभेच्छा देत आहे, मीडियाही येत आहे. हे पहिल्यांदाच अनुभवत आहे, हरनाझमुळे हे झालं असं ते सांगतात.
फोटो स्रोत, Getty Images
हरनाझ संधूचे कुटुंबीय
जेव्हा तिला अशा स्पर्धांमध्ये जाणाची परवानगी दिली होती तेव्हा घरातल्या सर्व मुलांनी दिवसभर भांगडा केला होता, असं ते सांगतात.
ते म्हणाले, "हरनाझने आधी आपल्या भावाला सांगितलं मग आईला सांगितलं. जाट कुटुंब असल्यामुळे मी परवानगी देणार नाही असं तिला वाटत होतं. म्हणून मला नंतर सांगितलं. मुलांवर भरवसा ठेवून त्यांना पुढे जाण्याची संधी दिली पाहिजे असं मला वाटलं. मी हो म्हटल्यावर त्यांनी दिवसभर घरात भांगडा केला होता."
बॉडी शेमिंगचे टोमणे
हरनाझची आई सांगते, की हरनाझ लहानपणापासून सर्वांशी नीट वागणारी, मृदूभाषी होती. त्यासाठी तिला शाळेतून प्रमाणपत्रंही मिळाली होती. हरनाझने सौंदर्यस्पर्धा जिंकल्या असल्या तरी तिला बॉडी शेमिंग सहन करावं लागत होतं.
अत्यंत बारीक असल्यामुळे लोक टोमणे मारायचे, असं तिनं मुलाखतींमध्ये सांगितलं होतं.
फोटो स्रोत, Getty Images
हरनाझ संधूचे कुटुंबीय
तिची आई रविंदर कौर यांनीही तिला सहन कराव्या लागणाऱ्या बॉडी शेमिंगबद्दल सांगितलं. पण कुटुंबीयांनी तिला आधार दिल्याचं त्या म्हणाल्या,
रविंदर सांगतात, "हरनाझ लहानपणी जाड होती. तिला भोपळा म्हणून चिडवत. मग ती बारीक झाली. पण मी तिला इच्छाशक्तीचं महत्त्व सांगितलं. जर इच्छाशक्ती मजबूत असेल तर कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. हे तुझं शरीर आहे, तू स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. बॉडी शेमिंग झाल्यावर ती त्रासिक व्हायची पण मी तिला प्रोत्साहन देत असे."
फोटो स्रोत, Getty Images
आम्हा दोघींचं नात आई-मुलगीपेक्षा मैत्रीचं आहे, मी स्वतः सिक्रेट्स तिला सांगते असं रविंदर सांगतात.
कुटुंबीय सांगतात
हरनाझला तिची आत्या आणि काकांची मदत झाल्याचंही रविंदर सांगतात.
तिची आत्या लकविंदर सिंग बीबीसी पंजाबीशी बोलताना आपण अत्यंत आनंदी आहोत असं सांगितलं. ती लहानपणापासून इथं यायची तेव्हा आत्या मी तुला मदत करते, कसं करायचं सांग असं म्हणायची.
हरनाझ तिच्या कुटुंबातली एकमेव मुलगी आहे.
फोटो स्रोत, Getty Images
हरनाझ संधू
तिचे काका जसविंदर सिंह सुद्धा आपला आनंद शब्दांमध्ये सांगता येणार नाही असं सांगतात. आमच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ज्याचा कधी विचारही केला नव्हता ते आमच्या मुलीने करुन दाखवलं असं ते सांगतात.
स्पर्धांमध्ये भाग घेतलेला असताना एकेक क्षण कठीण होता असं प्रीतम संधू सांगतात. त्यांचं सगळं कुटुंब टीव्हीला चिकटलेलं. सकाळी साडेपाचवाजल्यापासून सगळेजण टीव्ही पाहात होते.
तिची आई प्रार्थना करण्यासाठी गुरुद्वारेत गेली होती. या स्पर्धेसाठी तिची आई इस्रायलला जाऊ शकली नाही. सर्वजण त्यांना तुम्हीपण स्पर्धेच्या ठिकाणी आहात का असं विचारत होते. त्यावर त्या म्हणतात, "मी कधी अशा स्पर्धेला नाही गेले. गंमतीनं सांगायचं झालं तर मी ज्या लोकांना मतदान करते ते पराभूत झाले आहेत."
हरनाझने तिच्या मावशीकरवी आपण आनंदी असून आनंदामुळे रडू आल्याचंही रवींदर यांना कळवलं आहे. हरनाझला आपली जबाबदारी वाढल्याचं वाटत असल्याचं त्या सांगतात.
हरनाझला विचारलेले प्रश्नं आणि तिची उत्तरं
अंतिम राऊंडच्या वेळेस सगळ्या स्पर्धकांना विचारण्यात आलं होतं की, आजच्या काळात दबावाचा सामना करणाऱ्या तरुणांना दबावाला सामोरं जायला मदत मिळेल यासाठी काय संदेश द्याल?.
या प्रश्नाचं उत्तर देताना हरनाझ म्हणाली, "आजच्या काळातील तरुणांवर असलेला सर्वात मोठा दबाव हा त्यांच्या आत्मविश्वासाशी संबंधित आहे. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तेच तुम्हाला सुंदर बनवतं. स्वतःची इतरांशी तुलना करणं बंद करा.
"संपूर्ण जगामध्ये जे काही घडत आहे त्यावर बोलणंही अत्यंत गरजेचं आहे. बाहेर पडा. स्वतःसाठी भूमिका घ्या कारण तुम्हीच स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार आहात. तुम्हीच तुमचा आवाज आहात. माझा स्वतःवर विश्वास आहे, म्हणून मी आज इथे उभी आहे."
याआधी टॉप-5 च्या राऊंडमध्ये हरनाझला हवामान बदलाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.
अनेक लोकांना हवामान बदल म्हणजे थोतांड आहे असं वाटतं, तुम्ही त्यांना समजावण्यासाठी काय कराल?, असा प्रश्न विचारल्यावर हरनाजचं उत्तर होतं, "मी निसर्गाकडे पाहते तेव्हा त्याला किती अडचणींचा सामना करावा लागत आहे हे पाहून मला वाईट वाटतं. हे सर्व आपल्या बेजबाबदार वर्तनामुळं घडतं.
"हा काळ कमी बोलण्याचा आणि जास्त काम करण्याचा आहे, असं मला ठामपणे वाटतं. कारण आपलं प्रत्येक पाऊल निसर्गाला वाचवू शकतं किंवा नष्ट करू शकतं. खबरदारी घेणं किंवा संवर्धन करणं हे पश्चात्ताप किंवा नंतर सुधारणा करण्यापेक्षा अधिक चांगलं आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)