विराट कोहली : निवड समितीप्रमुखांच्या विधानानं गोंधळ वाढला

विराट कोहली

फोटो स्रोत, Reuters

विराट कोहलीचा टी-20 क्रिकेटचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांनी म्हटलं की, बीसीसीआय आणि निवडकर्त्यांनी विराट कोहलीला टी-20 टीमच्या कर्णधारपदावर कायम राहण्याचा आग्रह केला होता.

मात्र, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये टी-20 विश्वचषकाआधी विराटनं घोषणा केली होती की, विश्वचषकानंतर या फॉरमॅटमधील कर्णधारपद सोडून देईन.

चेतन शर्मा आता म्हणतायेत की, टी-20 विश्वचषक सुरू होण्याच्या आदल्या संध्याकाळी विराट कोहलीला त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, BCCI

फोटो कॅप्शन,

चेतन शर्मा

दक्षिण आफ्रिकेसाठी वन डे संघ घोषित करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत चेतन शर्मांनी ही माहिती दिली.

रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्यानं वन डे टीमचा कर्णधार केएल राहुल याला करण्यात आलंय.

'BCCIनं कर्णधारपदावरून काढण्याच्या फक्त दीड तास आधी सांगितलं'

वन डे सीरिजसाठी उपलब्ध नसण्याबद्दल आपण कधीच बोललो नसल्याचं भारतीय टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीने म्हटलं होतं.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

आपण वन डे सीरिजसाठी उपलब्ध असून याबाबतीतलं कोणतंही पत्र आपण BCCI ला पाठवलं नसल्याचं विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

विराट कोहलीने आपण वन डे सीरिजसाठी उपलब्ध नसल्याचं बीसीसीआयला सांगितल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये होत आहेत. पण अशी कोणतीही बाब नसल्याचं कोहलीने स्पष्ट केलंय.

वनडे कर्णधारपदाबद्दल आपल्यासोबत आधीपासून कोणतीही चर्चा सुरू नसल्याचंही विराटने म्हटलंय.

विराट कोहलीने सांगितलं, "मी वनडे कॅप्टन असणार नाही असं निवड समितीच्या पाचही सदस्यांनी ठरवल्याचं मला दीड तास आधी फोन करून सांगण्यात आलं. मी म्हटलं - ठीक आहे. यापूर्वी माझ्याशी याविषयी कोणतीही चर्चा झाली नव्हती."

कोहलीने टी -20 विश्वचषकाच्या आधीच टी20 चं कप्तानपद सोडण्याचं जाहीर केलं होतं. नंतर त्याच्याकडून वन डे टीमचं कर्णधारपदही काढून घेण्यात आलं.

आता वन डे आणि टी20 दोन्हींसाठी रोहित शर्मा भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन असेल. काही दिवसांपूर्वीच दुखापतीमुळे रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधून बाहेर पडला होता. त्याच्या जागी गुजरातच्या प्रियांक पांचालला टीममध्ये घेण्यात आलं.

रोहित शर्माच्या अनुपस्थितीवर विराट कोहलीने खेद व्यक्त करत म्हटलं, "रोहितच्या अनुभवाची आम्हाला कमतरता जाणवेल. पण आता नवीन खेळाडूंना संधी मिळेल."

'कोणतेही मतभेद नाहीत'

वनडे सीरिजसाठी उपलब्ध नसल्याचं विराट कोहलीने सांगितल्याचं ट्वीट माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी केलं होतं. रोहित शर्मा आणि विराटमध्ये तथाकथितरित्या मतभेद असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

फोटो स्रोत, STU FORSTER-ICC

पण रोहित शर्मासोबत आपले कोणतेही मतभेद नसून गेली दोन वर्ष आपण याबद्दल स्पष्टीकरणं देत असून अजूनही प्रयत्न करत असल्याचं विराट कोहलीने स्पष्ट केलंय.

अझरुद्दीन यांनी ट्वीट केलं होतं, "वनडे सीरिजसाठी उपलब्ध नसल्याचं विराट कोहलीने म्हटलंय. रोहित शर्मा पुढच्या टेस्ट मॅचेस खेळणार नाही. खेळातून ब्रेक घेणं नुकसान करणारं नसलं तरी असा निर्णय वेळ पाहून घ्यायला हवा. यामुळे मतभेदाच्या चर्चांना अजून जोर येईल."

अनुराग ठाकुर यांनी म्हटलंय, "खेळ सर्वात मोठा असतो आणि खेळापेक्षा मोठं कोणीही नाही. कोणत्या खेळात आणि कोणत्या खेळाडूंमध्ये काय सुरू आहे, याविषयी मला माहिती नाही. याविषयी संबंधित असोसिएशनच सांगू शकतील."

दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये खेलो इंडिया महिला हॉकी लीगचं उद्घाटन अनुराग ठाकूर यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.

रोहित आणि विराट सोबत खेळत नसल्याचं माजी क्रिकेटर कीर्ती आझाद यांनी मंगळवारी (14 डिसेंबर) म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

टी -20 चं कर्णधारपद सोडण्याचा आपला निर्णय बीसीसीआयने चांगल्या प्रकारे स्वीकारत हे चांगलं पाऊल असल्याचं बीसीसीआयने म्हटल्याचं विराट कोहलीने सांगितलं होतं. पण वनडेचं कर्णधारपद भूषवणं आपल्याला सुरू ठेवायचं असल्याचं आपण BCCI ला सांगितल्याचं विराटने म्हटलंय.

विराट कोहलीला वनडे क्रिकेटच्या कर्णधारपदावरून हटवण्याबद्दल काही दिवसांपूर्वी सौरव गांगुली यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं होतं, "याविषयीचा निर्णय बीसीसीआय आणि सिलेक्टर्सनी मिळून घेतलाय. खरंतर बीसीसीआयने विराट कोहलीला टी20चं कर्णधारपद सोडू नये, असं म्हटलं होतं. पण त्याने ते न ऐकल्याचं जाहीर आहे. म्हणूनच मग पांढऱ्या चेंडूने खेळल्या जाणाऱ्या वनडे आणि टी20 क्रिकेटसाठी दोन वेगवेगळे कर्णधार ठेवणं सिलेक्टर्सना योग्य वाटलं नाही."

भारत दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध 3 टेस्ट मॅचेसची सीरिज खेळणार आहे. पहिली टेस्ट 26 डिसेंबरला सेंच्युरियनमध्ये खेळली जाईल. दुसरी टेस्ट मॅच 3 जानेवारीला जोहान्सबर्ग तर तिसरी टेस्ट मॅच 11 जानेवारीला केपटाऊनमध्ये होईल.

भारताची टेस्ट टीम

विराट कोहली (कर्णधार), के. एल. राहुल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, प्रियांक पांचाल, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृद्धीमान साहा, आर. अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर आणि मोहम्मद सिराज

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)