पन्नालाल महातो: दिल्लीत नोकरी शोधण्यासाठी आलेला तरुण ते ‘मानव तस्करीचा किंग’

  • रवि प्रकाश
  • रांचीहून, बीबीसी हिंदीसाठी
पन्नालाल महातो

झारखंडच्या मुरहू परिसरात गनालोया गावचे रहिवासी असलेल्या पन्नालाल महातो याचं वय 2002 साली केवळ 19 वर्षे होतं.

सर्वसामान्य तरूणांप्रमाणेच त्याने कामाच्या शोधासाठी दिल्लीचा रस्ता धरला. त्यावेळी त्याच्या गावातून राजधानी रांचीकडे येण्यास 4 ते 5 तास लागायचे.

खुंटी परिसरातील लोल मुरहूपर्यंत पायी येत. त्यानंतर एखादी टेंपो किंवा जीपमध्ये इतर प्रवाशांसोबत दाटीवाटीने बसून पुढचा प्रवास करावा लागत असे. ही वाहनं त्याला पुढे रांचीच्या बिरसा चौकापर्यंत सोडत असत.

गनालोया के चैता गंझू यांचा चिरंजीव असलेल्या पन्नालाल महातोची दिल्लीत नोकरी करण्याची इच्छा होती.

तिथं 2-3 हजार रुपये प्रतिमहिना पगार मिळाला तरी पुरेसा आहे, असा महातोचा त्यावेळी विचार होता. पण 2019 मध्ये झारखंड पोलिसांनी महातोला अटक केली, त्यावेळी त्याच्याकडे फॉर्च्युनर गाडी होती.

आता अंमलबजावणी संचालयाने (ED) केलेल्या दाव्यानुसार, पन्नालाल महातोने आतापर्यंत झारखंडमधून सुमारे 5 हजार जणांची मानवी तस्करी (ह्यूमन ट्रॅफिकिंग) केल्याची कबुली दिली आहे.

इतकंच नव्हे, तर आपल्याकडे असलेली 4 ते 5 कोटींची संपत्ती आपण मानवी तस्करीच्या माध्यमातूनच कमावली असल्याचं महातोने मान्य केलं.

खुंटी

महातोचा कबुलीजबाब आणि आतापर्यंत केलेल्या तपासाच्या आधारे रांचीच्या विशेष न्यायालयात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाऊंड्रिंग अॅक्ट (PMLA) - 2002 अंतर्गत तक्रार (प्रोझिक्यूशन कंप्लेन्ट) दाखल केली आहे. याला एक प्रकारे आरोपपत्रच मानलं जातं.

या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं ED ने म्हटलं आहे. म्हणजे, कोर्टात दाखल केलेल्या प्रॉझिक्यूशन कंप्लेन्टला प्राथमिक आरोपपत्र मानलं जाऊ शकतं.

यामध्ये पन्नालाल महातो याच्यासोबत त्याची पत्नी सुनीता कुमारी, भाऊ शिवशंकर गंझू, सहकारी गोपाल उरांव आणि त्यांच्याशी संबंधित सहा प्लेसमेंट कंपन्यांविरुद्ध हा आरोप लावण्यात आलेला आहे. वरील सर्वजण आता तुरुंगात आहेत.

ED ने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांची 3.36 कोटींची संपत्ती जप्त केली होती.

मानव तस्करीचा किंग

ED ने दिलेल्या माहितीनुसार, "पन्नालाल महातोने आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून झारखंडमधील गरीब आणि साध्या-भोळ्या लोकांना दिल्लीत चांगली नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवलं. त्यानंतर त्यांची इतर राज्यांमध्ये मानवी तस्करी केली. द इंटरस्टेट मायग्रंट वर्कमेन (रेग्यूलेशन ऑफ एंप्लॉयमेंट अँड कंडीशन्स ऑफ सर्व्हिस) कायदा - 1979 याचंही उल्लंघन केलं."

पन्नालाल महातो

"कामाला पाठवलेल्या मजुरांना चुकीची वागणूक दिली जात होती. त्यांना घरी परतण्याची परवानगी नसायची. लोकांच्या इच्छेविरुद्ध त्यांना कामास जुंपलं जायचं. त्यांच्या प्लेसमेंट एजन्सीसुद्धा दिल्लीच्या प्रायव्हेट प्लेसमेंट एजन्सी (रेग्यूलेशन) ऑर्डर - 2014 अंतर्गत नोंदणीकृतही नव्हत्या."

पन्नालाल महातो हाच मानव तस्करीचा किंग होता, असं ED ने आपल्या प्रॉझिक्यूशन कंप्लेन्टमध्ये म्हटलं आहे.

पन्नालाल महातोविरुद्ध दाखल गुन्हे

पन्नालाल महातोविरुद्ध खुंटीच्या मानव तस्करीविरोधी पथकाने 19 जुलै 2019 रोजी दाखल केलेल्या FIR नंतर ED ने ही कारवाई केली आहे.

याच प्रकरणाचा तपास नंतर राष्ट्रीय तपास संस्थेनेही (NIA) केला.

पन्नालाल महातोविरुद्ध झारखंड तसंच दिल्लीच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये मानव तस्करीशी संबंधित अनेक गुन्हे दाखल आहेत. काही प्रकरणात कोर्टातून त्याला दिलासाही मिळालेला आहे.

नोव्हेंबर 2018 मध्ये झारखंड पोलिसांच्या विशेष शाखेचे अपर पोलीस महासंचालक (ADG) अनुराग गुप्ता यांनी तत्कालीन पोलीस महासंचालक (DGP) डी. के. पांडेय यांना एक पत्र लिहून महातोवर दाखल गुन्ह्यांची यादी त्यांना सोपवली होती.

आपल्या पत्रात त्यांनी पन्नालालच्या संपत्तीसह सहकाऱ्यांच्या नावाचाही उल्लेख केला होता.

त्यांनी कारवाईची मागणी केल्यानंतर जुलै 2019 मध्ये पन्नालाल महातो याला खुंटी येथून अटक करण्यात आली.

पूर्वीही झाली होती अटक

पन्नालाल महातो आणि त्याची पत्नी सुनीता कुमारी यांना पोलिसांनी ऑक्टोबर 2014 मध्येही अटक केली होती.

तेव्हा झारखंड आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाने दिल्लीच्या शकूरपूर परिसरातील राहत्या घरातून दोघांना अटक केली होती.

गनालोया

त्यांच्या अटकेच्या काही दिवस आधी दिल्ली पोलिसांच्या एका पथकाने पन्नालाल महातोच्या त्याच घरातून झारखंडचे तत्कालीन मंत्री योगेंद्र साव यांनाही अटक केली होती.

त्यावेळी हजारीबाग जिल्हा पोलिसांत दाखल एका गुन्ह्यात ते फरार होते. याच कारणामुळे नंतर त्यांना मंत्रिमंडळातून राजीनामाही द्यावा लागला होता.

या कारवाईदरम्यान पन्नालाल महातो हे त्याच घरात होते. पण झारखंड पोलिसांकडून तोपर्यंत कोणतीही सूचना मिळालेली नसल्यामुळे दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली नव्हती.

नंतर झारखंड पोलिसांकडून इनपूट मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याठिकाणी पुन्हा धाड टाकून पन्नालाल आणि त्याची पत्नी सुनीता यांना अटक केली.

पुढे दोघांनाही झारखंडला रवाना करण्यात आलं. तिथं त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं होतं.

पण या प्रकरणात जामीन मिळवून दोघे बाहेर आले. त्यानंतर आपल्या मानव तस्करीच्या व्यवसायात पुन्हा कार्यरत झाले.

तस्कर बनण्याची कहाणी

झारखंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2002 मध्ये पहिल्यांदा दिल्लीला गेलेल्या पन्नालाल महातोने तिथंच एका प्लेसमेंट एजन्सीमध्ये नोकरी सुरू केली.

2003 साली पुन्हा झारखंडला परतून आपल्या गावातील 4 मुलींना नोकरी देण्याच्या आमिषाने दिल्लीला नेलं.

कदाचित हा त्याचा पहिला गुन्हा होता. त्यानंतर महातोने आपली स्वतःची प्लेसमेंट एजन्सी उघडली.

दरम्यान त्याची भेट आपल्यापेक्षा वयाने मोठी असलेल्या सुनीता हिच्याशी झाली. दोघांच्या ओळखीचं रुपांतर प्रेमात होऊन त्यांनी 2006 साली लग्न करण्याचा निर्णय घेतला.

काही कारणामुळे सुनीता आई बनू शकत नव्हती. त्यामुळे पुढे सुनीताच्याच संमतीने तिची चुलत बहीण लखमनी हिच्याशीही पन्नालालने विवाह केला. यानंतर सगळे दिल्लीत एकाच घरात राहायचे.

मात्र पन्नालालची दुसरी पत्नी लखमनी देवाचा प्लेसमेंट एजन्सीशी काहीच संबंध नव्हता. ती फक्त आपल्या मुलाबाळांना सांभाळण्यात मग्न होती. ती अजूनही दिल्लीतच राहते.

ISWOTY

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)