मुलं नाही म्हणून काय झालं, त्यानं जास्त काम का करावं?

अविवाहीत Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सिंगलिझम म्हणजे काय हो?

'हे काम तू प्लीज करून घेशील का? तुझ्या घरी बायका-पोरं नाही ना वाट पाहत आहेत?'

ऑफिसमध्ये अविवाहितांना जास्त कामासाठी कायमच असं का गृहित धरलं जातं?

जेनिस चॅक एकदा ऑफीसच्या लंचब्रेकमध्ये बाहेरगावाहून आलेल्या मैत्रिणीला सरप्राईज देण्यासाठी बाहेर गेली. परत येताना ती ट्रॅफिकमध्ये अडकली आणि तिला पाच मिनिटं उशीर झाला. यावरून तिला अनेक प्रश्न विचारले गेले.

"मला प्रश्न तर विचारले गेलेच. पण मला थांबवून जास्तीचं कामही करावं लागलं," जेनीस सांगते. "पण मला माहितीये की, मी जर माझ्या लहान मुलाला डॉक्टरकडे घेऊन गेली असती तर इतका मोठा प्रश्न निर्माण झाला नसता. इतकंच काय तर मी अर्ध्या दिवसाची सुट्टीही घेऊ शकले असते."

ही गोष्ट आहे 10 वर्षांपूर्वीची, जेव्हा जेनिस मेक्सिकोमध्ये एका कंपनीत HR म्हणून काम करत होती. पण ही वृत्ती अमेरिका आणि मेक्सिकोमधल्या आघाडीच्या 100 कंपन्यांमध्ये देखील होती, असं ती सांगते.

विशीत असल्यापासून ती या कंपन्यामध्ये काम करत आहे. अविवाहित असताना आणि पुढे मूलबाळ नसतांनाही तिला हे अनुभव नेहमीच आले.

ज्यांना मुलंबाळं होती त्यांना सुटीसाठी प्राधान्य मिळतं. त्याच वेळी अविवाहित किंवा मूलबाळ नसलेल्या लोकांना आपल्या वयोवृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठीदेखील वेळ मिळत नाही किंवा त्यांना अनेकदा दौऱ्यांवर पाठवलं जातं.

Image copyright JANICE CHAKA
प्रतिमा मथळा जेनिस चॅक

जेनिस सांगते, "लोक असं गृहित धरतात की तुम्ही सगळं काही सोडून येऊ शकता किंवा तुम्हाला कशाचीच काळजीच नाही."

ती पुढे सांगते, "खरंतर अविवाहित असतांना अधिक खर्च असतात, सगळी लहान-सहान कामं तुम्हाला स्वत: करावी लागतात आणि समजा काही आर्थिक अडचण आली तर हातभार लावायला कोणीही नसतं."

अविवाहित लोकांवर कामाच्या ठिकाणी कसा अन्याय होतो, याची सविस्तर आकडेवारी उपलब्ध नाही. तरी युकेमध्ये 28 ते 40 या वयोगटातल्या 25,000 अविवाहित लोकांचं एक सर्वेक्षण करण्यात आलं. त्यातल्या दोन तृतीयांश लोकांना असं वाटतं की त्यांच्याकडून जास्त कामाची अपेक्षा केली जाते. या समस्येवरच्या अभ्यासावर अनेक कर्मचारी आणि विश्लेषक अजूनही काम करत आहेत.

कामसू लोक

न्यूयॉर्क विद्यापीठात समाजशास्त्राचे प्राध्यापक एरिक क्लिननबर्ग यांनी युरोप आणि अमेरिकेतल्या अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्या असं लक्षात आलं की "अनेक लोकांची अशी धारणा असते अविवाहित लोक काम करण्यास अधिक तत्पर असतात."

क्लिननबर्ग पुढे सांगतात, "मी अशा अनेक लोकांना भेटलो आहे जे कायम तक्रार करतात की त्यांचे वरीष्ठ हे गृहित धरतात की ते रात्री उशिरा किंवा सुटीच्या दिवशीही कामासाठी उपलब्ध असतात... कारण त्यांना जोडीदार आणि मुलंबाळं नसतात."

"मी एका महिलेला भेटलो. ती म्हणाली की, तिला पगारवाढ नाकारली. कारण तिच्या वरिष्ठांना असं वाटलं तिला पैशांची तेवढी गरज नाही जितकी मुलंबाळं असलेल्या तिच्या सहकाऱ्यांना आहे."

Image copyright BELLADEPAULO.COM
प्रतिमा मथळा बेला डी पॉलो यांनी या प्रकाराला 'सिंगलीझम' असं नाव दिलं आहे

कॅलिफोर्निया विद्यापीठात मानसशास्त्राचे अध्यापक बेला डीपावलो यांनी या अविवाहीत लोकांवर होणाऱ्या भेदभावाला 'सिंगलिझम' नाव दिलं आहे. हे बॅचलर्स घरच्यांपासून दूर असल्यानं मित्र-मैत्रिणी हेच त्यांचं कुटुंब असतं. एकटेपणा जाणवणारे हे लोकं त्यामुळे समाजात मिसळण्यासाठी अधिक उत्सुक असतात.

कंपन्यांना आणि बॉसेसना ही बाब कधीच लक्षात येत नाही.

मग अशा परिस्थितीत अविवाहितांनी काय करावं?

ब्रिटनमधले व्यवसाय मार्गदर्शक डेव्हिड कार्टर यांच्याकडून हा पहिला सल्ला येतो : "आपल्या आयुष्यात एखाद्या परिस्थितीबद्दल कोणाशी उगाच चर्चा करू नये."

ते पुढे सांगतात, "या बॅचलर्सनी मिळून काहीतरी करावं, पार्ट्यांना जावं. यामुळे कंपन्यांना त्यांचं धोरण बदलायला मदत होईल, तसंच अविवाहित लोकांना देखील त्यांच्या समस्या सोडवण्यास मदत होईल."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक अविवाहीत पुरूषाला आहे, याचं भान सर्वांनी ठेवलं पाहीजे, असं फेसबूकच्या सीओओ शेरील सँडबर्ग सांगतात.

कार्टर यांनी ही समस्या सोडवण्यासाठी आणखी एक अभिनव संकल्पना अंमलात आणली. ते सांगतात की या लोकांनी एकमेकांशी आपापल्या शिफ्ट, कधी कधी कामांची अदलाबदल करून घ्यावी, जमेल तर कधी एकमेकांची मदतही करावी. अशी प्रत्येक मदत मिळाल्यावर तो कर्मचारी मदत करणाऱ्याला एक पॉईंट देईल आणि त्याचा एक पॉईंट कमी होईल.

ही थोडी अर्थशास्त्रातली क्रेडिट-डेबिटसारखी संकल्पना आहे. पण कुणाचेही पाचपेक्षा अधिक पॉईंट क्रे़डिट किंवा डेबिट होणार नाही, याची काळजी घेतली जावी. याप्रकारे जवळपास सगळ्यांनाच कामांचं वाटप योग्य प्रकारे होईल.

ते सांगतात, "रिकाम्या वेळात कोणी काय करावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पण मुद्दा आहे की प्रत्येकानं एका आठवड्यात 40 तास काम करावं आणि कोणावरच अन्याय होऊ नये."

कार्टर आपल्या सहकाऱ्यांना हवं त्या पद्धतीनं आणि हवं तिथून काम करण्याचं स्वातंत्र्य देतात. फक्त काम व्यवस्थित व्हायला हवं, यावर त्यांचा भर असतो.

पण ते सांगतात की त्यांची क्रेडिट-डेबिटची संकल्पना मोठ्या कंपन्यांमध्ये राबवणं थोडं कठीण आहे. असं असलं तरी ज्या कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना काम करण्याच्या पद्धतीत लवचिकता आणण्यास प्रोत्साहन देत नाहीत, त्यांना भविष्यात त्रास होऊ शकतो.

Image copyright Getty Images/Carl Court

डायनासोर नामशेष होण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेतलं नाही तर या कंपन्यासुद्धा डायनासोरसारख्या नामशेष होतील, यात शंका नाही.

फेसबुकच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शेरिल सॅंडबर्ग यांनी त्यांच्या प्रसिद्ध 'Lean In' या पुस्तकात अशीच काहीशी भूमिका घेतली आहे.

एका अविवाहित महिलेची हकिगत सांगताना त्या म्हणाल्या की, "एखाद्या पार्टीला जाणं हे लहान मुलाला सांभाळण्याइतकंच सबळ कारण असायला हवं. असं केल्यानंच तिच्या नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. कुटुंब सुरू होण्याची कदाचित ही सुरुवात होऊ शकेल."

अविवाहित व्यक्तींना सुद्धा आयुष्य जगण्याचा अधिकार आहे, असा सल्ला त्या मॅनेजर्सना देतात.

उद्योग क्षेत्रातले दिग्गज देखील हे मान्य करतात की सगळ्या लोकांना समप्रमाणात काम देणं अवघड आहे.

पूर्वाश्रमीचे उद्योजक आणि आता एका कंपनीत मोठ्या हुद्दयावर असलेले जोनस अलमिंग म्हणतात, "जे पालक आहेत आणि जे नाहीत त्यांच्या दृष्टिकोनात खूप फरक असतो. जर तुम्ही पालक असाल तर दैनंदिन जीवनातले प्राधान्यक्रम कसे बदलतात, हे तुम्ही समजू शकाल."

Image copyright Jonas Almeling
प्रतिमा मथळा जोनस अलमिंग

अलमिंग हे एका मुलाचे पालक आहेत.

ते सांगतात, "'मला फिरायला जायचं आहे,' असं जर मी सांगितलं तर कदाचित मला सुटी मिळणार नाही. पण 'मुलांना सांभाळायचं आहे,' असं म्हटल्यावर मात्र परिस्थिती कदाचित वेगळी असू शकेल".

"जगण्याची कोणतीही पद्धत निवडली तरी जो स्वत: दर्जेदार आयुष्य जगतो तो एक उत्तम कर्मचारी समजला जातो," असंही ते म्हणाले.

Image copyright Getty Images/WPA Pool

दहा वर्षांपूर्वी कुकिंग क्लास उघडल्यानंतर आज जेनिस चॅक एक यशस्वी उद्योग प्रशिक्षक, सल्लागार आणि पॉडकास्टर आहे. त्या मान्य करतात की त्यांना सुटी मागताना अपराधी वाटायचं जेव्हा दुसरीकडे त्यांचे सहकारी मुलांना सांभाळण्यासाठी सुटी मागायचे.

ऑफिसमधून निघताना कधी कधी त्या अतिरंजित कारणं द्यायच्या, कारण 'इतरांबद्दल ही बाई विचार करत नाही,' अशी प्रतिमा सहकाऱ्यांमध्ये तयार होण्याचीही त्यांना भीती असायची.

आता त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्र सोडलं आहे पण आपल्या क्लायंटला त्या या सगळ्या गोष्टी टाळायला सांगतात. "मुलं असो किंवा नसो, व्यावसायिक आणि खासगी आयुष्यातलं संतुलन राखताना तुम्हांला अपराधी वाटायला नको."

ती सांगते की, अगदी मुलाखतीपासूनच कंपनीच्या संस्कृतीचा आणि धोरणांचा नीट अभ्यास करावा.

एकदा नोकरी मिळाली की सोशल मीडियावर कामाच्या ठिकाणच्या लोकांना जोडणं टाळावं, या युक्तिवादाचं त्या समर्थन करतात. असं केल्यानं तुमच्या आयुष्याविषयी अनावश्यक गोष्टी इतरांना कळणार नाहीत.

"तेव्हा अशी एखादी कंपनी शोधा जी तु्म्हाला सुट्टी देते, पण कारणांविषयी फार खोलात जात नाही. तसंच अशी कंपनी निवडा जी तुम्हाला जास्त वेळ केल्यामुळे नाही तर स्मार्ट काम केल्यामुळे प्रमोशन देते."

हेही नक्की वाचा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)