राष्ट्रप्रमुख होण्यासाठी किम जाँग उन यांनी प्लॅस्टिक सर्जरी केली होती?

उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, अण्वस्त्रं, Image copyright AFP
प्रतिमा मथळा उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन.

उत्तर कोरियामध्ये किम जाँग उन यांची सत्ता आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांच्या देशाबाहेरील माध्यमांवर कठोर निर्बंध आहेत. त्यामुळे या ठिकाणी काय घडतं याविषयी सर्वांनाच कुतूहल आहे.

उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जाँग उन यांच्या भोवती देखील एक गूढतेचं वलय आहे. 'बीबीसी वर्ल्ड न्यूज'नं गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांच्याविषयी माहिती गोळा केली आहे.

किम जाँग उन यांचा खरा जन्मदिन कोणता याची माहिती कुणाकडेच नाही. पण 2010 पासून 8 जानेवारीला राष्ट्रीय सुटी असते.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा देशाचे प्रमुख झाल्यापासून किम जाँग उन यांना अनेक पदं देण्यात आली आहेत.

"उत्तर कोरियावर किम जाँग उन यांचे आजोबा किम ईल संग यांचा प्रभाव आहे. जर आपण त्यांच्या प्रमाणे दिसलो तर सर्वोच्च नेता होण्यास काही अडचण येणार नाही, असं त्यांना वाटलं यामुळेच त्यांनी आपली प्लॅस्टिक सर्जरी केली," असा एक अंदाज उत्तर कोरियाविषयीचे तज्ज्ञ लावतात.

17 डिसेंबर 2011 रोजी उत्तर कोरियाचे तत्कालीन नेते आणि किम जाँग उन यांचे वडील किम जाँग इल यांचं निधन झालं. त्यांनी मृत्युपूर्वी किम जाँग उन यांना आपला उत्तराधिकारी म्हणून निवडलं होतं.

किम जाँग इल यांच्या निधनाला पंधरवाडा होण्याआधीच किम यांना पक्षाचे प्रमुख, देशाचे सर्वोच्च नेता आणि सैन्यदलाचे प्रमुख म्हणून घोषित करण्यात आलं.

2013 मध्ये जेव्हा लष्करी उठावाची तयारी केल्याचा आरोप करून किम यांनी त्यांचे काका चँग-साँग-थाक यांना मृत्यूदंड दिला तेव्हा ते चर्चेत आले होते.

2016 मध्ये किम यांनी हायड्रोजन बॉम्बची भूमीगत चाचणी केल्याचं म्हटलं जातं. सत्तेत आल्यापासून त्यांनी घेतलेली ही दुसरी चाचणी होती.

'मॉर्निंग स्टार किंग'

किम जाँग उन हे किम जाँग इल आणि त्यांची तिसरी पत्नी को याँग हूई यांचं शेवटचं अपत्य.

ते नेमके केव्हा जन्मले हे माहीत नाही. 1983 किंवा 1984 च्या सुरुवातीला ते जन्मले असावेत. वडिलांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याकडे कधीच पाहिलं गेलं नाही.

विश्लेषकांना वाटत असे की, त्यांचा सावत्र भाऊ किम जाँग नाम आणि मोठा भाऊ किम जोंग चोल हे सर्वोच्च नेते होतील.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा किम जाँग उन यांचं शिक्षण स्वित्झर्लंडमध्ये झालं.

पण, 2001 मध्ये जपाननं किम जाँग नाम यांना देशाबाहेर हाकललं. तर मोठा भाऊ किम जोंग चोल यांचा स्वभाव मुळमुळीत होता. त्यामुळे किम जाँग उन यांचा सर्वोच्च पदासाठी विचार करण्यात आला असावा, असं विश्लेषक सांगतात.

किम जाँग उन यांना सर्वोच्च पद बहाल झाल्यानंतर विश्लेषकांनी त्यांना उगवता तारा असं संबोधायला सुरुवात केली.

आपल्या भावाप्रमाणेच किम यांनी स्वित्झर्लंडमध्ये शिक्षण पूर्ण केलं. पण, त्याचवेळी त्यांनी पाश्चिमात्य प्रभावाखाली येणं टाळलं.

शाळा संपली की थेट घरी परतायचं आणि उत्तर कोरियाच्या राजदुतांसोबत जेवण घ्यायचं, असा त्यांचा नेहमीचा कार्यक्रम असायचा. प्याँगयांगमध्ये परतल्यानंतर किम ईल संग सैन्य विद्यापीठात त्यांनी प्रशिक्षण घेतल्याचं म्हटलं जातं.

किम यांची आई किम जाँग इल यांची सर्वांत आवडती पत्नी होती. त्यांनी कायम आपल्या मुलाचं नाव उत्तराधिकारी म्हणून पुढे केलं. एवढंच नव्हे तर त्यांनी नेहमी किम जाँग उन यांना 'मॉर्निंग स्टार किंग' म्हणायची.

आपल्या आजोबांसोबत असलेलं साम्य

के. जी. फुजिमोटे या टोपणनावानं "आय वॉज किम-जाँग-इल्ज शेफ" (मी किम जाँग इल यांचा शेफ होतो) हे पुस्तक लिहिणाऱ्या व्यक्तीनं किम जाँग उन हे त्यांच्या वडिलांचा आवडता मुलगा असल्याचा उल्लेख त्यात केला आहे. 2013 मध्ये हे पुस्तक आलं होतं.

किम जाँग इल यांनी 2010 मध्ये चीनचा दौरा केला होता. या दौऱ्यात किम जाँग उन हे त्यांच्यासोबत होते असा दावा दक्षिण कोरियाच्या एका वृत्तवाहिनीनं केला होता.

उत्तर कोरियाचे संस्थापक किम ईल संग यांच्याबरोबर अनेक गोष्टीत असलेल्या साम्यामुळेच किंग जाँग उन यांना उत्तराधिकारी मानलं गेल्याचं काही अहवालात सांगण्यात आलं आहे.

तर सत्ता मिळवण्यासाठी किम जाँग उन यांनी प्लॅस्टिक सर्जरी केली असावी, असं म्हणण्यापर्यंत काही विश्लेषकांची मजल गेली.

Image copyright KCNA
प्रतिमा मथळा किम जाँग उन बॉलिस्टिक मिसाईलच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आनंद साजरा करताना.

किम ईल संग यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात 15 एप्रिल 2012 रोजी किम जाँग उन यांनी पहिलं सार्वजनिक भाषण केलं. त्यावेळी 'सैन्य प्रथम' हा सिध्दांत त्यांनी मांडला.

2012 मध्ये किम यांना सैन्यदलाच्या मार्शलपदी नियुक्त करण्यात आलं. त्याआधी सैन्यदलाचे प्रमुख री योंग हो यांना लष्कर प्रमुख पदावरून हटवण्यात आलं.

एप्रिल 2012 मध्ये उत्तर कोरियानं अंतराळात उपग्रह सोडला होता, पण त्यांचा हा प्रयोग फसला होता. दुसऱ्या प्रयत्नात उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण झालं होतं. मात्र तो उपग्रह नव्हता तर क्षेपणास्त्र होतं असं दक्षिण कोरिया, जपान आणि अमेरिकेने म्हटलं होतं.

उत्तर कोरियानं 2009 च्या तुलनेत तब्बल दुप्पट क्षमतेची तिसरी अणुचाचणी 2013 मध्ये घेतली.

किम यांची पत्नी

किम यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फारशी माहिती कोणालाच नव्हती. मात्र कालांतराने एका टीव्ही फुटेजमध्ये एक महिला किम यांच्यासोबत एका सोहळ्यात दिसली.

जुलै 2012 मध्ये उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमानं किम हे विवाहित असून त्यांनी कॉम्रेड रि सोल जु यांच्याशी विवाह केल्याचं जाहीर केलं.

री यांच्याविषयी फार थोडी माहिती आहे. मात्र त्यांची स्टाईलीश हेअरस्टईल आणि पश्चिमी पध्दतीचे पोषाख बघून त्या उच्चभ्रू घराण्यातल्या असाव्यात असा अंदाज तिथं बांधला गेला.

किम यांच्या आधीचे शासक आपल्या खासगी आयुष्याबद्दल कमालीची गुप्तता बाळगत. पण किम यांनी त्यांच्या पत्नीला जनतेसमोर येऊ दिलं.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा डेनिस रॉडमनच्या मते, किम आणि री यांना एक मुलगी आहे.

किम आणि री यांच्या विवाहासंदर्भातली विस्तृत माहिती अजूनही अस्पष्ट आहे. असं म्हटलं जातं री या गायिका होत्या. एका कार्यक्रमादरम्यान किम यांनी त्यांना पाहिलं आणि ते त्यांच्या प्रेमात पडले.

री या काही काही सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावतात. अॅम्युजमेंट पार्क आणि डिस्ने कार्टूनवर आधारित शोमध्ये त्या उपस्थित होत्या.

डेनीस रोडमन या गार्डियनच्या पत्रकारानं 2013 आणि 2014 मध्ये किम यांची भेट घेतली होती. किम आणि री यांना एक मुलगी आहे असं त्यांनी म्हटलं होतं.

अमेरिका आणि उत्तर कोरियातली 'बाचाबाची'

अमेरिकेत आणि उत्तर कोरियात गेल्या कित्येक वर्षांपासून तणावाचं वातावरण आहे. पण डोनाल्ड ट्रंप यांनी राष्ट्राध्यक्ष पद स्वीकारल्यापासून दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या शाब्दिक चकमकीत वाढ झाली आहे. माझ्या टेबलवर अणुबॉम्बचं बटन आहे असं किम जोंग उन यांनी म्हटलं होतं.

तर त्यावर प्रत्युत्तर म्हणून ट्रंप म्हणाले होते माझ्याही टेबलवर अणुबाँबचं बटन आहे आणि ते खूप मोठं आहे. तर याआधी ट्रंप यांनी किम यांना रॉकेटमॅन म्हटलं होतं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)