एका अंध मुलीची साद : माझ्या भावनांचं काय? मला प्रेम हवं

इलस्ट्रेशन

मी बघू शकत नाही म्हणून काय झालं? प्रेमाची गरज आणि प्रेमात पडण्याची आस तर सगळ्यांनाच असते. मलासुद्धा आहे. जितकी तुम्हांला आहे अगदी तितकीच. पण त्या भावनेचा माझा अनुभव जरा वेगळा आहे.

खरंतर लहानपणी मी तुमच्यासारखीच बघू शकत होते. एका छोट्या शहरातल्या 'नॉर्मल' शाळेत जात होते. पण तेव्हा मी लहान होते आणि मुलांशी माझा फक्त मैत्रीपुरताच संबंध होता.

नववीत असतांना अचानक माझी दृष्टी कमी होत गेली... आणि वर्षभरातच ती पूर्णपणे गेली.

मग घरच्यांनी मला दिल्लीतील 'अंध शाळेत' पाठवले. तिथे माझा 'नॉर्मल' मुलांशी काहीही संपर्क नव्हता.

मग कॉलेज मध्ये आली. पुन्हा नेहमीच्याच जगात. एका तरूण मुलीसारखी अनेक स्वप्नं आणि भरपूर प्रश्न घेऊन.

मला सुंदर दिसायचं होतं पण मुलांपासून थोडं अंतर सुद्धा ठेवायचे होते. याचा माझ्या अंध असण्याशी काहीही संबंध नव्हता. फक्त एक मुलगी म्हणून माझ्या काही इच्छा होत्या - जी सगळ्या मुलांसाठी 'डिजायरेबल' तर असावी पण एकासाठीच 'अव्हेलेबल' असेल.

पण अंधांसाठीच्या शाळेमध्ये गेल्यामुळे माझा नेहमीच्या जगाशी संपर्क तुटला होता. जोवर माझी दृष्टी शाबूत होती तोवर मला मुलांच्या डोळ्यांतून त्यांची मानसिकता कळत होती. पण आता मुलांमध्ये वावरतांना माझा आत्मविश्वास कमी होत होता.

कॅंटीन, क्लास किंवा लायब्ररीला जातांना मला मदत मागतांना जीवावर यायचं. पण इलाज नव्हता.

हात पकडणं तर नेहमीचंच होतं, इतकं की पहिल्यांदा हात पकडल्यावर येणारे अवघडलेपण किंवा उत्साह ही नव्हता. पण प्रेमाची आस होती.

मग मला तो मुलगा भेटला... किंवा असं म्हणा की त्यानेच मला शोधलं.

तो अंध नाही पण त्याला खूपच कमी दिसतं.... 'पार्शली साईटेड' म्हणता येईल. म्हणजे तो मला बघू शकतो.

तो माझा युनिवर्सिटी मधला सीनियर होता, आणि याच नात्याने काही मित्रांनी आमची भेट करवून दिली. नंतर त्याने सांगितलं की आमच्या पहिल्या भेटीतच मला गर्लफ्रेंड बनवण्याचं त्याने ठरवलं होतं.

हे सगळं आधी मला माहिती नव्हतं. आधी फक्त मैत्री होती. तो माझी खूप काळजी घ्यायचा. कधी कॉफी, कधी पुस्तकं घ्यायला तर कधी सोबत जाण्याच्या बहाण्याने तो मला भेटायचा.

मग आम्ही कोणतेही कारण नसतांना भेटू लागलो. मग फक्त भेटायचं म्हणून भेटू लागलो.

मी मेट्रोने जायचे तर तो मला मेट्रो स्टेशन बाहेर भेटायला यायचा. मग आम्ही दिल्ली विद्यापीठाच्या रिज भागात जायचो. गर्दीच्या दिल्लीत या जंगली परिसरात आमच्यासारख्या जोडप्यांना हवाहवासा एकांत मिळायचा.

मैत्रीचं रुपांतर प्रेमात होण्यासाठी, त्याच्यावर विश्वास निर्माण होण्यासाठी एक वर्षाचा काळ गेला. पण इतकं झाल्यावर सुद्धा जेव्हा जेव्हा आम्ही बाहेर भेटायचो तेव्हा माझं मन भरत नव्हतं.

प्रत्येक वेळी असं वाटायचं की, कोणीतरी आपल्याला बघतंय, आपल्याला ओळखणारं, आपल्या कुटुंबातलंच कोणीतरी.

जे लोक बघू शकतात त्यांच्यासाठी हे किती सोपं असतं. आसपास एक नजर टाकली तरी लगेच कळतं.

माझ्या बॉयफ्रेंडचं सतत लक्ष असायचं, पण मी बघू शकत नसल्याने मला कायम 'एक्सपोज्ड' वाटायचे, सतत पकडले जाण्याची भीती वाटायची. आणि त्या क्षणांची मजा या भीतीमुळे घेता येत नव्हती.

पण भेटणं काही कमी होइना. प्रेमच तसं होतं ना. काहीच नसण्यापेक्षा तरी हे बरंच होतं.

शेवटी माझ्या बॉयफ्रेंडला हॉस्टेल मिळालं. मग तिथे भेटू लागल्यावर मला जास्त सुरक्षित वाटू लागलं.

ही कोणतीही काल्पनिक कथा नाही. कारण आयुष्याचं वास्तव हे या कहाण्यांपेक्षा वेगळं असतं.

नंतर काही मित्रांकडून कळलं की त्याची आणखी एका मुलीशी माझ्याइतकीच जवळीक होती. मी त्याला विचारलं तर तो खोटं बोलला.

माझ्यासाठी सत्य पडताळणे खूपच अवघड होते. ना मी त्याचा फोन तपासू शकत होते ना हॉस्टेल मधली त्याची खोली.

मग एक दिवस मला त्याचे सोशल मीडियावरचे एक चॅट सापडले जे तो डिलीट करायला विसरला होता. माझ्या कॉम्प्युटरचे स्क्रीन रिडिंग सॉफ्टवेअर वापरून मी ते वाचले तेव्हा मला कळलं... त्याने माझा विश्वासघात केला आहे.

फसवणूकीने त्रास होतोच, पण हा तर माझ्या अपंगत्वाचाच फायदा घेऊन केलेला विश्वासघात होता. त्याने मला धोका देऊन मला कमकुवत बनवले होते. माझ्या भावनांचा, आत्मविश्वासाचा चुराडा केला होता.

मी दिल्ली विद्यापीठाची गोल्ड मेडलिस्ट आहे. राष्ट्रीय स्तरावरची अॅथलिट आहे आणि माझ्या हॉस्टेलची प्रेसिडेंट सुद्धा. माझे मित्रमैत्रिणी मला म्हणाले, "अंध असूनसुद्धा इतकं कमावलं आहेस. एक बॉयफ्रेंड नसेल तर काय फरक पडतो?"

पण फरक पडतो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात प्रेमाचा एक हळवा कोपरा असतो.

बाकी सर्व होतं तरी ही एक वेगळी इच्छा होती. आणि त्याशिवाय मला अपूर्ण वाटत होते. या अपुर्णत्वातच मला दुसरा बॉयफ्रेंड मिळाला.

तो 'नॉर्मल' आहे. तो इतरांसारखा बघू शकतो. कदाचित याच गोष्टीमुळे मी त्याच्याकडे आकर्षित झाली.

पण याच कारणामुळे तो मला नीट समजून घेऊ शकत नाही. तो माझी मला हवी तशी काळजी घेत नाही.

हात पकडून मला पार्टीला तर घेऊन जातो पण मी तिथल्या गप्पांचा मी भाग होत नाही. एखाद्या कोपऱ्यात एका वस्तूसारखी मी तिथे असते.

तो समजदार आहे, माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे आणि अभ्यासातसुद्धा हुशार आहे. पण ते प्रेम आहे की सहानुभूती हेच मला कळत नाही.

मला पुन्हा एकदा नात्यांमध्ये अपंगत्वाचा भास होतो आहे. मला असं वाटतंय की मी बघू शकत नाही म्हणून मला आयुष्यात खरं प्रेम कधीही मिळणार नाही.

पण हे नातं मी तोडू शकत नाही, कारण डोळ्यांनी दिसत नसलं तरी माझं मन तुमच्यासारखंच कोणाच्यातरी प्रेमासाठी आसुसलेलं आहे.

(बीबीसी प्रतिनिधी दिव्या आर्य यांनी घेतलेल्या मुलाखतीवर आधारित एका 'अंध' मुलीची कहाणी.)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)