आर्टिफिशिअल इंटेलिजन्स : चेहऱ्यावरून लैंगिक कल ओळखणारं संशोधन वादात

एखाद्या व्यक्तीचा लैंगिक कल चेहऱ्यावरून ओळखता येण्याचे अल्गोरिदम विकसित केल्याचा दावा संशोधकांनी गेला आहे. Image copyright STANFORD UNIVERSITY
प्रतिमा मथळा चेहऱ्याच्या ठेवणीचे विश्लेषण करून त्यांचा लैंगिक कल ओळखता येईल, असा दावा संशोधकांनी केला आहे.

चेहराच्या ठेवणीवरून एखाद्या व्यक्तीचा लैंगिक कल कळू शकतो का? स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीतील काही संशोधकांनी तसा दावा केला आहे.

पण आर्टिफिशअल इंटेलिजन्सवर आधारित या फेस रिकग्निशन तंत्राच्या निर्मितीचा दावा करणारे संशोधक आणि एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर) हक्कांवर काम करणाऱ्या संस्था यांच्यात सध्या वाद सुरू आहे.

स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी या अल्गोरिदमची निर्मिती केली आहे. व्यक्तीच्या लैंगिक कलाशी संबंधित असणारी चेहरेपट्टीतील वैशिष्ट्यं, या सॉफ्टवेअरच्या लक्षात येतात, पण हे बारकावे मानवी निरीक्षणाच्या लक्षात येणारे नाहीत, असा या संशोधकांचा दावा आहे.

या अभ्यासावर 'धोकादायक' आणि 'जंक सायन्स' म्हणून टीका होत आहे. तर या संशोधकांनी ही टीका आततायी असल्याचं म्हटलं आहे.

डेटिंग साईटवरील फोटोंचा वापर

या संशोधकांनी 14000 अमेरिकन नागरिकांचे फोटो वापरून अल्गोरिदम विकसित केलं आहे. हे फोटो एका डेटिंग साईटमधून घेण्यात आले आहेत. या लोकांनी या साईट नोंदवलेला लैंगिक कल या अभ्यासासाठी वापरण्यात आला.

या अल्गोरिदममधून जन्मलेलं सॉफ्टवेअर समलिंगी आणि भिन्नलिंगी ओळखू शकतं, असा या संशोधकांचा दावा आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा LGBT हक्कांवर काम करणाऱ्या संस्थांनी या संशोधनावर आक्षेप नोंदवला आहे.

जेव्हा अल्गोरिदमला समलिंगी आणि भिन्नलिंगी पुरुषांचे एकेक फोटो दाखवण्यात आले, तेव्हा 81 टक्के वेळा अचूकपणे समलिंगी आणि भिन्नलिंगी पुरुष ओळखता आले. महिलांच्या बाबतीत ही अचूकता 71 टक्के होती.

या संशोधकांच्या मते, समलिंगी पुरुषांचे नाक लांब असते आणि जबडा निमुळता असतो, तर लेस्बियनचा जबडा रूंद असतो.

पण काही परिस्थितीत हा अल्गोरिदम नीट काम करू शकलेला नाही. या मॉडेलला जेव्हा 70 समलिंगी आणि 930 भिन्न लिंगी पुरुषांचे फोटो देऊन 100 समलिंगी पुरुष शोधण्यास सांगण्यात आले, त्यावेळी मात्र अल्गोरिदम यातील 23 समलिंगींना ओळखू शकले नाही.

'इकॉनिमिस्ट'मध्ये या संशोधनाचं वृत्त सर्वप्रथम प्रसिद्ध झालं होतं. यामध्ये या संशोधनात उणीवा असून, यात फक्त गौरवर्णीय अमेरिकन व्यक्तींवर लक्ष केंद्रित केल्याचं म्हटलं आहे.

एलजीबीटी संघटनांची टीका

या संशोधनावर एलजीबीटींच्या हक्कांवर काम करणाऱ्या संस्थांनी टीका केली आहे.

'हे संशोधन म्हणजे सायन्स किंवा बातमी नाही. हे संशोधन म्हणजे डेटिंग साईटवरील ब्युटी स्टँडर्ड आहेत. यात एलजीबीटीतील बराच समुदाय नाही. विविध वर्ण, ट्रान्सजेंडर, वयस्कर, तसेच डेटिंग साईटवर फोटो न टाकणारे यांचा यात विचार करण्यात आलेला नाही,' अशी टीका जीएलएएडी या संस्थेचे मुख्य डिजिटल ऑफिसर जिम हॅलोरान यांनी केली आहे.

या अभ्यासातून निर्माण होणाऱ्या परिणामांचा विचार झालेला नाही. हे संशोधन भिन्नलिंगी आणि समलिंगी या दोन्हीं विरोधात शस्त्र म्हणून वापरलं जाऊ शकतं, अशी टीका त्यांनी केली आहे.

प्रतिमा मथळा हे संशोधन जर हेरगिरी करणाऱ्या संस्थांच्या हाती पडलं तर काय होईल याची एलजीबीटीच्या हक्कांवर काम करणाऱ्या संस्थांना वाटते.

'द ह्युमन राईट कॅंपेन' या संस्थेने संबंधित युनिव्हर्सिटीला या विषयासंदर्भातील आपली चिंता कळवली असल्याचं म्हटलं आहे.

'स्टॅनफर्ड विद्यापीठाने या संशोधनापासून स्वतःला बाजूला केलं पाहिजे. जे संशोधन लक्षावधी लोकांचे जीवन असुरक्षित करू शकतं, जे संशोधन त्रुटीपूर्ण आहे, अशा संशोधनांशी या विद्यापीठानं स्वतःचं नाव जोडू नये,' असं मत या संस्थेचे रिसर्च डायरेक्टर अॅशलॅंड जॉन्सन यांनी व्यक्त केलं आहे.

संशोधकांची प्रतिक्रिया

या अभ्यासावर काम करणाऱ्या दोन संशोधकांनी टीकांना उत्तर दिलं आहे. 'आमचे निष्कर्ष चुकीचे असू शकतात. पण शास्त्रीय निष्कर्ष फक्त शास्त्रीय माहिती आणि शास्त्रीय पडताळणीवर फेटाळता येतात. हे काम वकील आणि जनसंपर्क व्यवस्थापक यांचं नाही,' अशी प्रतिक्रिया प्रा. मायकल कोसिन्स्की आणि यीलून वॅंग यांनी दिली.

जर आमचे निष्कर्ष खरे असतील तर या संघटना आणि प्रतिनिधींची ही प्रतिक्रिया ते ज्यांचं प्रतिनिधित्व करतात, त्यांचंच नुकसान करणारी ठरतील, असंही ते म्हणाले.

यापूर्वी झालेले चेहरेपट्टी आणि व्यक्तिमत्त्व यांचा संबंध जोडू पाहणारे शोध पुढील टप्प्यात टिकू शकले नसल्याची उदाहरणं आहेत. यात चेहऱ्याचा आकार आणि आक्रमकता या संदर्भातील संशोधनाचाही सहभाग आहे.

तटस्थ तज्ज्ञांचं मत

'बीबीसी'ने तटस्थ तज्ज्ञ म्हणून युनिव्हर्सिटी ऑफ ग्लास्गो येथील फेस रिसर्च लॅबचे प्रा. बेनडीक्ट जोन्स यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, "या अल्गोरिदमची तांत्रिक माहिती उपलब्ध झाली पाहिजे. जोपर्यंत शास्त्रज्ञांचा समुदाय आणि समाज यांना नव्या संशोधनांना पडताळण्याची संधी मिळत नाही तोपर्यंत नवीन संशोधनं काळजीपूर्वक हाताळायला हवीत."

चेहऱ्यातील ठेवणीतील बदलापेक्षा हे वेगळं आहे. गे किंवा स्ट्रेट व्यक्ती स्वतःला वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतात त्याचे परिणाम हे चेहऱ्यातील सूक्ष्म फरक असू शकतात, असंही ते म्हणाले.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)