रोहिंग्या महिलांची कहाणी : मृत्यू किंवा बलात्कार!

फोटो स्रोत, DAN KITWOOD
बांगलादेशात पोहचलेलं रोहिंग्या कुटुंब
म्यानमारची सीमा ओलांडून बांगलादेशात निर्वासित झालेल्या रोहिंग्या महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे.
म्यानमारच्या लष्करानं काही महिलांवर बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप निर्वासित रोहिंग्या कुटुंबांनी केला आहे.
या महिला उपचार करून घेण्यासाठी पुढे येत आहेत. पण, त्यांना त्याची लाज वाटत आहे असं बांगलादेशातील काही डॉक्टरांच म्हणण आहे.
बीबीसी बांगला सेवेच्या प्रतिनिधी फरहाना परवीन यांनी या महिलांच्या व्यथा लोकांसमोर आणल्या आहे. पीडित महिलांची नावं या रिपोर्टमध्ये बदलण्यात आली आहेत.
तीन दिवसांपूर्वीच हजरा बेगम सीमा ओलांडून बांगलादेशच्या कॉक्स बाजार जिल्ह्यातल्या उकीयामध्ये पोहोचली.
म्यानमारच्या लष्करानं त्यांच्या घराला वेढा टाकला होता. तिथून कसातरी पळ काढण्यात ती यशस्वी झाली. पण, ज्यांना ते शक्य झालं नाही ते एकतर मारले गेले किंवा तिच्यासारखं लैंगिक अत्याचाराला बळी पडले.
फोटो स्रोत, DAN KITWOOD
वैद्यकीय उपचार नाकारले
"माझ्यावर बलात्कार झाल्यानंतर मी तिथून स्वतःची सुटका करू शकले. पण, अशा अनेक मुली आहेत ज्यांच्यावर बलात्कार झाल्यानंतर त्यांचा खून करण्यात आला," हजरा बेगम सांगत होती.
बलात्कारानंतर तिनं लष्कराकडे वैद्यकीय उपचारांसाठी विनंती केली. पण, तिला झिडकारून लावण्यात आलं.
तिनं बीबीसीला सांगितलं. "माझ्या सारख्या काही पीडित महिलांनी गर्भधारणा रोखणारी औषधं मागितली. पण, ती सुद्धा नाकारली. कुणीही आमचं ऐकलं नाही."
25 ऑगस्टनंतर बांगलादेशात मोठ्या संख्येनं रोहिंग्या शरणार्थी आले आहेत. त्यांचा आरोप आहे की पुरुषांचे खून केले गेले तर महिलांवर लैंगिक अत्याचार.
रेहाना बेगमनं आपल्या लहान बाळासह सीमा ओलांडली. पण, तिची पंधरा वर्षांची मुलगी बेपत्ता आहे.
"मला भीती वाटते की लष्करानं माझ्या मुलीला पकडलं असेल. मला अजूनही तिच्याबद्दल काहीच कळालेलं नाही." असं तिनं सांगितलं.
दोन आठवड्यांपूर्वी म्यानमारमधून पळून आलेल्या मोहम्मद इलियासनं महिलांवर बलात्कार होतांना स्वतः डोळ्यानं पाहिल्याचं बीबीसीला सांगितलं.
मोहम्मद सांगतो "तिच्या कडेवर एक बाळ होतं. नंतर मी पाच मृतदेहांसह तिचं अर्धजळीत शरीर पाहिलं,"
बांगलादेशातील आरोग्य केंद्र
समाजिक दडपण
कॉक्स बाजारमध्ये आता आता बांगलादेशी डॉक्टर आणि आंतरराष्ट्रीय संस्थांतर्फे रोहिंग्या महिला आणि मुलांना प्राथमिक आरोग्य सेवा दिल्या जात आहेत.
समाजाच्या भीतीमुळे अनेक महिला बलात्कार झाल्याचं लपवत आहेत. त्यामुळे अशा महिलांना योग्य उपचार देण्यात अडचणी येत असल्याचं डॉक्टरांचं म्हणण आहे.
उखियामधले बांगलादेशी सरकारी डॉक्टर मेझबाहुद्दीन अहमद यांना आतापर्यंत बलात्कारच्या 18 प्रकरणांबद्दल माहिती मिळाली आहे.
पण, खात्रीशीर आकडेवारी सांगता येत नसल्याचं त्यांच म्हणण आहे. अशा प्रकरणांची संख्या जास्त असण्याची शक्यता त्यांना वाटते.
त्यांच्या मते आरोग्य कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार ही संख्या जास्त असू शकते
''मी 6 महिलांशी बोललो. ज्यांच्या मांडीवर मुलं होती. म्यानमार लष्करानं अत्याचार केल्याचं त्या म्हणाल्या." असं डॉक्टर अहमद यांनी सांगितलं.
बांगलादेशी आरोग्य कर्मचारी प्रत्येक कॅम्पमध्ये जाऊन चौकशी करत आहेत. जेणेकरून महिलांना योग्य ते उपचार मिळू शकतील. वैद्यकीय उपचारासोबतच पीडित महिलांचं समुपदेशन सुद्धा केलं जात आहे.
बलात्कार पीडितांना वेळेवर योग्य ते उपचार मिळाले नाहीत तर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. पण, पीडितांची संख्या किती आहे याची माहिती मिळवणं आव्हानात्मक असल्याचं आरोग्य सेवक सांगतात.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)