मोहम्मद अली जिन्नांच्या पंथावरून का झाला होता वाद?

पाकिस्तान, मोहम्मद अली जिन्ना Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जिन्ना यांची प्रतिमा

पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांनी कोणत्या इस्लामचा अंगीकार केला होता? जिन्ना शिया आहेत का सुन्नी यावरून त्यांच्या निधनावेळी वाद झाला होता.

जिन्ना यांच्या आयुष्यात धर्माला काहीच स्थान नव्हतं. मात्र अभ्यासकांच्या मते ते इस्माइली होते. इस्माइली पंथाचे लोक आगा खाँ यांचे विचार मानतात.

1948 मध्ये सप्टेंबर महिन्यातच जिन्ना यांचं निधन झालं. तेव्हा त्यांच्या पार्थिवाचं दफन शिया पंथानुसार करायचं की सुन्नी पंथानुसार यावरून प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती.

मात्र तशी वेळच आली नाही. कारण ते शिया पंथाचे अनुयायी होते याबाबत कोणाच्याही मनात संभ्रम नव्हता.

निधनानंतर शिया-सुन्नी वाद

पाकिस्तानचे इतिहासकार मुबारक अली यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली.

"जिन्ना यांच्या पार्थिवाच्या दफनाविधीला मौलवी म्हणून मुस्लिम लीगशी संलग्न शब्बीर अहमद उस्मानी उपस्थित होते. कायद-ए-आजम अर्थात जिन्ना यांचे दफनविधी सुन्नी पंथानुसार व्हावेत असा त्यांनी आग्रह केला."

"वातावरण संवेदनशील असल्यानं जिन्ना यांचा दफनविधी शिया आणि सुन्नी अशा दोन्ही पंथानुसार करण्यात आला".

मुबारक अली पुढे सांगतात, "जिन्ना यांनी इस्माइली ऐवजी शिया पंथाचा स्वीकार केला होता. इस्माइली 6 तर शिया पंथ 12 इमामांना मानतात. माझ्या वैयक्तिक मतानुसार जिन्ना धार्मिक स्वरुपाचे व्यक्ती नव्हते."

"मात्र त्यांच्या व्यक्तिमत्वात अहंकार खूप होता. इस्माइली पंथाचे समर्थक आगा खाँ यांना ते मानत. मात्र जिन्नांना ते इमाम म्हणून मान्य नव्हते. यासाठी त्यांनी शिया पंथाचा स्वीकार केला."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जिन्ना यांचे संग्रहित छायाचित्र

धर्माची दखल नाही

जिन्ना यांच्या संदर्भातील रोचक प्रसंग मुबारक अली यांनी सांगितला.

"जिन्ना यांच्या पत्नी एकदा त्यांच्यासाठी जेवण घेऊन आल्या. त्यावेळी उपस्थित लोकांनी त्यांची फिरकी घेत त्यांना विचारलं, जिन्ना आता 12 इमामांना मानतात हे तुम्हाला ठाऊक आहे ना?"

त्यावर मुळच्या पारसी असलेल्या जिन्ना यांच्या पत्नीनं सांगितलं, "जिन्नासाहेब ज्यावेळी ज्या पंथाचे पाईक असतात तोच पंथ मी मानते."

मुबारक अली यांच्या मते जिन्ना यांच्या आयुष्यात धर्माला काहीच स्थान नव्हतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा लॉर्ड माउंटबॅटन सोबत भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिन्ना

शिया आणि अहमदियांनी बनवला पाकिस्तान

भारतातील प्रसिद्ध इतिहासकार हरबंश मुखिया यांनी जिन्ना इस्माइली पंथाचे पाईक असल्याचं सांगितलं. "जन्माचा संदर्भ सोडला तर त्यांच्या आयुष्यात धर्माला काहीच स्थान नव्हतं."

हरबंश म्हणाले, "इस्लामचा पवित्र ग्रंथ अर्थात कुराण जिन्ना यांनी वाचलं नव्हतं. ते सिगारेट ओढत असत, दारू पित असत आणि डुकराचं मांसही खात असत. इस्लाम धर्मानुसार या तिन्ही गोष्टी निषिद्ध आहेत. जिन्ना आचारविचारानं मुसलमान वाटायचे नाहीत. पण, ते मुसलमानांचे नेते होते."

पाकिस्तानच्या संदर्भातील दोन अनोख्या घटनांचा उल्लेख हरबंश यांनी केला. "पाकिस्तानची सीमा काय असेल यावर अहमदिया पंथाच्या व्यक्तीनं शिक्कामोर्तब केलं. आजही पाकिस्तानमध्ये अहमदिया पंथाला बिगरमुस्लिम मानलं जातं. पाकिस्तानचे प्रणेते जिन्ना शिया पंथाचे पाईक होते. आजच्या घडीला पाकिस्तानात दोन्ही पंथांचं अस्तित्व डळमळीत आहे."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा फाळणीत दोन राष्ट्रांची निर्मिती झाली. एकीकडे महात्मा गांधी राष्ट्रपिता झाले तर मोहम्मद अली जिन्ना पाकिस्तानचे संस्थापक झाले.

जिन्ना काहीच लपवून ठेवत नव्हते

हरबंश यांच्या मते "जिन्ना अखंड भारताचा भाग होते तेव्हा त्यांचा पंथ शिया की सुन्नी हा मुद्दा उपस्थित झाला नाही. कारण, त्यावेळी हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी परिस्थिती होती. मुसलमानांचे नेते असल्यानं जिन्ना यांना पाठिंबा मिळाला."

हरबंश पुढे सांगतात "पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर अनेक वर्ष शिया-सुन्नी वाद निर्माण झाला नाही. 1958-59 साली पहिल्यांदा या वादाची ठिणगी पडली. जिन्ना कधीच छुप्या पद्धतीनं जगत नसत. मद्यपान असो की डुकराच्या मांसाचं सेवन असो त्यांनी कुठलीही गोष्ट लपवली नाही."

"14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तानची निर्मिती झाली त्यावेळी रमजानचा महिना सुरू होता. तेव्हा या आनंदाच्याक्षणी दुपारच्या वेळात शाही मेजवानीचं आयोजन व्हावं अशी जिन्ना यांची इच्छा होती.

त्यावेळी रमजानच्या महिन्यात दुपारच्या मेजवानीचं आयोजन कसं करता येईल? असं लोकांनी विचारलं. जिन्ना हे असं वेगळं व्यक्तिमत्व होतं!"

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

या वृत्तावर अधिक