मारिया चक्रीवादळ : कॅरेबियन बेटांचं अपरिमित नुकसान

चक्रीवादळ, कॅरेबियन

फोटो स्रोत, NASA

फोटो कॅप्शन,

मारिया चक्रीवादळाचा रोख कॅरेबियन बेटांच्या दिशेने आहे.

इरमाच्या तडाख्यानंतर आता मारिया चक्रीवादळामुळं डॉमिनिकाचे अपरिमित हानी झाली आहे. आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत, अशी प्रतिक्रिया डॉमिनिकाचे पंतप्रधान रूझवेल्ट स्केरिट यांनी दिली आहे.

हे वादळ आता पुढे प्योर्तो रिकोच्या दिशेने फोफावत आहे. 35 लाख लोकांनी आधीच स्थलांतर केलं आहे.

कॅरिबियन बेटांवर धडकण्यापूर्वी मारिया चक्रीवादळाने रौद्र रूप धारण केलं. या चक्रीवादळाची गणना पाचव्या प्रवर्गात करण्यात आली आहे.

डॉमिनिकाच्या पंतप्रधानांनी चक्रीवादळामुळं त्यांच्या निवासस्थानाच्या छताच्या नुकसानीचे फोटो शेअर केले आहेत.

इरमानंतर कॅरेबियन बेटांना धडकलेलं हे सलग दुसरं मोठं चक्रिवादळ आहे.

फोटो कॅप्शन,

मारिया चक्रीवादळानं डॉमिनिका बेटावर हैदोस घातला.

1) विनाशाच्या दृष्टीनं या चक्रीवादळाची पाचव्या प्रवर्गात गणना करण्यात आली आहे. या चक्रीवादळाचा वेग ताशी 160 मैल इतका आहे.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

2) मारिया चक्रीवादळाचा मार्ग इरमाप्रमाणेच आहे.

3) ग्याडलोप, माँटसेराट, सेंट किट्स अँड नेव्हिस यांच्यासह प्युअर्तो रिको, अमेरिकेचा व्हर्जिन बेट परिसर या मारिया चक्रीवादळाच्या तडाख्यात.

4) अमेरिकेच्या राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्रानं अवघ्या काही तासांत मारिया चक्रीवादळाची तीव्रता दोनवरून चार आणि चारवरून पाच असल्याचं जाहीर केलं आहे.

5) गेल्या 85 वर्षात पहिल्यांदाच प्युअर्तो रिकोला चक्रीवादळाचा थेट फटका बसणार आहे. प्युअर्तो रिकोच्या सरकारनं चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आणीबाणी जाहीर केली आहे.

6) मारिया चक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी अमेरिकेने अतिरिक्त विमानांची व्यवस्था केली आहे.

7) जीवघेण्या अशा या चक्रीवादळामुळे पाण्याची पातळी सहा ते नऊ फुटांनी वाढण्याची शक्यता आहे.

8) मारिया चक्रीवादळाचा परिणाम म्हणून संभाव्य धोकाक्षेत्रात 10 ते 15 इंच असा जोरदार पाऊस होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

9) दरवर्षी जून ते नोव्हेंबर या कालावधीत कॅरेबियन बेटांना चक्रीवादळाचा तडाखा बसतो. जोरदार वारे, प्रचंड पाऊस आणि पूर असा या चक्रीवादळाचा परिणाम असतो.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)