अमेरिकेने लावले उत्तर कोरियावर नवीन निर्बंध

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप Image copyright q
प्रतिमा मथळा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी संयुक्त राष्ट्रात दिलेल्या भाषणात उत्तर कोरियावर टीका केली होती.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी उत्तर कोरियावर नवीन निर्बंध लावले आहेत.

"मानव जातीसाठी सर्वांत धोकादायक शस्त्र निर्माण करण्यासाठी उत्तर कोरियाला ज्या स्त्रोतांकडून फंडीग मिळते, त्यांना रोखण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले आहे," असं ट्रंप नवीन निर्बंध आणताना म्हणाले.

ट्रंप यांनी नुकत्याच संयुक्त राष्ट्रात दिलेलं भाषण महागात पडेल, असा इशारा उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग-उन यांनी दिला होता. कुत्र्याच्या भुंकण्याकडे लक्ष दे असं देखील कोरियानं म्हंटलं होतं.

जगभरातून टीका होत असतानाही उत्तर कोरियानं गेल्या काही आठवड्यांपासून सतत आण्विक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्याचं म्हंटलं आहे. उत्तर कोरियाच्या या भूमिकेमुळे तणाव वाढला आहे.

गुरुवारी जारी करण्यात आलेल्या या नविन आदेशानंतर अमेरिकेच्या कोषागाराला उत्तर कोरियाशी व्यापारिक संबध असणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचा अधिकार मिळाला आहे.

चीनच्या सेंट्रल बँकेनेही इतर बँकाना प्योंगयांगशी व्यवहार बंद करण्याच्या सुचना केल्या आहेत, अशी माहिती ट्रंप यांनी दिली. आण्विक चाचणीवरून संयुक्त राष्ट्र संघानं दोन आठवड्यांपूर्वीच उत्तर कोरियावर नव्याने निर्बंध आणले होते.

ट्रंपच्या या निर्णयानं उत्तर करियातील कापड, मत्स्य, माहिती तंत्रज्ञान आणि उत्पादन उद्योगांवर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, "आण्विक अस्त्र आणि क्षेपणास्त्र निर्मितीसाठी उत्तर कोरिया आंतरराष्ट्रीय वित्तीय निधीचा सातत्याने गैरवापर करत आहे."

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
डोनाल्ड ट्रंप यांनी क्षेपणास्त्र चाचणी करणाऱ्या उत्तर कोरियावर जोरदार टीका केली.

ट्रंप यांनी जोर देऊन सांगीतलं की, "हे निर्बंध फक्त एकाच देशावर लावण्यात आले असून तो देश उत्तर कोरिय आहे."

मंगळवारी संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनात बोलताना ट्रंप म्हणाले होते की, "उत्तर कोरियानं जर अमेरिका किंवा सहकारी देशांना धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचा समूळ नायनाट करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही."

कोरियाचे परराष्ट्रमंत्री री योंग-हो यांनी ट्रंप यांच्या या टीकेची तुलना कुत्र्यांच्या भुंकण्याशी केली होती. री योंग-हो हे शुक्रवारी संयुक्त राष्ट्रात भाषण करणार आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)