एअर कंडिशनर : एक कूल अविष्कार ज्यानं बदललं जग

ए. सी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ए. सी.च्या शोधामुळं आतील तापमान नियंत्रणात आणता आलं.

फक्त एक बटन दाबल्यावर हवामान उबदार किंवा थंड करता आलं तर?

किती सोयीचं होईल ना? कुठलाच दुष्काळ नाही, पूर नाही, उष्णतेची लाट नाही किंवा रस्त्यावर साचलेला बर्फ नाही. वाळवंटात पाऊस आणता येईल, पीकं कधीही नष्ट होणार नाही.

मनुष्यानं तशी बरीच प्रगती केली आहे, पण हवामानावर अजूनही ताबा मिळवता आला नाही आहे. ते कधी जमणारही का? कुणास ठाऊक.

पण घरातलं हवामान मात्र नक्कीच नियंत्रणात आणणं शक्य झालं आहे, ते एअर कंडिशनर, अर्थात एसी मुळं.

एसीच्या शोधानंतर बरेच अपेक्षित आणि काही अनपेक्षित बदलही झाले. घरातील हवामान नियंत्रणात आणण्यासाठी झालेल्या शोधांचा प्रवास मात्र रंजकच असा आहे.

आदीम काळात माणसाने आग लावण्याची कला अवगत केल्यानंतर स्वतःला उबदार ठेवणं शक्य झालं. पण कडक उन्हाळ्यात वातावरण थंड कसं करायचं, हे मोठं आव्हानच होतं.

प्रतिमा मथळा जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकणाऱ्या संशोधनात ए. सी. चा समावेश करावा लागतो.

रोमन सम्राट एल्गाबुलूस यांनी गुलाम पाठवून पर्वतातून बर्फ आणला होता. हा बर्फ बागेत ठेवला जायचा, ज्यावरून वाहणारी हवा राजमहालात थंडावा घेऊन जायची. पण हा काही सर्वत्र वापरता येईल, असा उपाय नव्हता.

19 व्या शतकापर्यंत तरी परिस्थिती अशीच होती.

आर्द्रता कमी कशी करायची?

बोस्टनचे व्यापारी फेड्रीक ट्युडर यांनी न्यू इंग्लंडमधून बर्फाच्या लाद्या लाकडाच्या भुश्यात घालून उष्ण प्रदेशात नेण्यास सुरुवात केली.

1902 मध्ये हवा वातानुकूलित करण्यास सुरुवात झाली, पण याचा माणसांच्या सुखसोईंशी काही संबंध नव्हता.

प्रतिमा मथळा बोस्टन येथील व्यापारी फेड्रीक ट्युडर यांनी न्यू इंग्लंडमधून लाकडाच्या भुश्यात घालून बर्फाच्या लाद्या उष्म प्रदेशात नेण्यास सुरुवात केली.

न्यूयॉर्कची सॅकेट अँड विल्हेम्स लिथोग्राफींग आणि प्रिंटींग कंपनी आर्द्रतेनं त्रासली होती. एकाच कागदावर चार रंग एकेक करून छापले जायचे, आणि मध्येच आर्द्रता बदलली की शाई पसरायची, ज्यानं छपाई बिघडायची.

मग बफेलो फोर्ज कंपनीकडे प्रेसमधली आर्द्रता नियंत्रणात ठेवण्यासाठी एक यंत्रणा तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. तिथले इंजिनियर विलिस कॅरिअर यांनी मग कंप्रेस्ड अमोनिया भरलेल्या पाईपच्या कॉईल भोवती हवा फिरवण्याची योजना केली. प्रेसमधली आर्द्रता 55 टक्के ठेवण्यात यश आलं.

पुढे जाऊन या कंपनीनं हे तंत्रज्ञान जिलेट रेझर, पीठाच्या गिरण्यांसारख्या अन्य कंपन्यांनाही दिलं.

तेव्हा औद्योगिक कंपन्यांना निर्मितीत असलेल्या वस्तूंना आर्द्रतेपासून वाचवायला हे तंत्रज्ञान फारच उपयोगी होतं. पण कर्मचाऱ्यांसाठीही ते वातानुकूलित ठिकाण सोयीचं झालं.

Image copyright NEW YORK PUBLIC LIBRARY
प्रतिमा मथळा सॅकेट आणि विलहेल्मस या कंपनीने आर्द्रतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याची जबाबदारी एका कंपनीकडे दिली होती.

एसीनं उद्योग वाढले

मानवी सुखसोईसाठी हे तंत्रज्ञान वापरण्याचे प्रयत्न मग कॅरिअर यांनी सुरू केले. त्या काळात उन्हाळ्यात थिएटर बंदच ठेवावी लागायची.

1880 मध्ये न्यूयॉर्कच्या मॅडीसन स्क्वेअर थिएटरमध्ये आठ फूट उंचीच्या पंख्याद्वारे बर्फावरून प्रेक्षकांवर थंड हवा सोडली जायची. यासाठी दररोज चार टन बर्फ लागत होता.

पण ही हवा ओलसर आणि धुळीनं भरलेली असायची. शिवाय, त्या काळात सरोवरांचं प्रदूषण होऊ लागल्याने त्या पाण्याचा बर्फ विरघळून दुर्गंध यायचा.

या सर्वांशी तुलना करता कॅरिअर यांचे 'वेदरमेकर' जास्त सोईस्कर होतं.

Image copyright CARRIER
प्रतिमा मथळा कॅरीअर यांनी या तंत्रज्ञानाची क्षमता ओळखली होती.

1920 मध्ये एका थिएटरमध्ये प्रेक्षकांनी प्रथमच गारवा अनुभवला. सिनेमाच्या बरोबरीनंच हा थंडावा महत्त्वाचा ठरू लागला. हॉलीवूडच्या समर ब्लॉकबस्टरमध्ये अशा प्रकारे कॅरीअरची मोठा वाटा होता. शॉपिंग मॉलच्या वाढीमागे एसीचा मोठा हात होता.

Image copyright Carrier
प्रतिमा मथळा कॅरीअर यांनी सॅकेट अँड विल्हेम्स कंपनीसाठी बनवलेलं डिझाईन

आणि हा अविष्कार फक्त सोयीचा न राहता तंत्रज्ञान क्षेत्रातही बऱ्याच क्रांती आणू लागला. कम्प्युटर, सिलिकॉन चिपची निर्मितीत याचा वापर आवश्यक ठरू लागला.

आधी उष्ण हवेच्या ठिकाणी थंड बिल्डिंग बांधण्यासाठी जाड भिंती, उंच छत, कोर्टयार्ड अशा योजना कराव्या लागत. तेव्हा पूर्णत: काचेच्या इमारती शक्यच नव्हत्या. एसी शिवाय दुबई आणि सिंगापूर या शहरांचा आजच्या स्वरूपाची कल्पनाही अशक्यच.

क्रांतिकारी तंत्रज्ञान

20व्या शतकाच्या मध्यानंतर फ्लोरिडा ते कॅलिफोर्निया या अमेरिकेचा सनबेल्ट मध्ये घरबांधणी 28 टक्क्यांवरून 40 टक्क्यांवर पोहोचली.

याचे मग राजकीय परिणामही होते. अनेक निवृत्त नागरिकांनी उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रस्थान केलं. त्यामुळं या प्रांताचं राजकारणही बदलून गेलं.

Image copyright Alamy
प्रतिमा मथळा न्यूयॉर्कस् मॅडीसन स्केअर थिएटरमध्ये बर्फावरून सोडलेली हवा थिएटरमध्येसोडली जात असे.

लेखक स्टीव्हन जॉन्सन यांनी रोनाल्ड रिगन यांच्या विजयाला एसी जबाबदार असल्याचा दावा केला होता, हे विशेष. रिगन 1980 मध्ये सत्तेत आले. तेव्हा जगातले 50 टक्के एसी अमेरिकेत होते.

चीनसारख्या देशात एसींची मागणी प्रचंड वाढली. भारत, ब्राझिल, इंडोनेशिया मध्येही एसींची मागणी वाढतच आहे. जगातील 30 मोठ्या शहरांपैकी 11 शहरं उष्ण पट्ट्यात असल्यानं एसींची मागणी वाढणार आहे.

पण एसीचे फायदेही अनेक आहेत.

उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू त्यामुळे कमी होऊ शकतील. एका संशोधनानुसार परीक्षा हॉलमधलं तापमान जर 21-22 सेल्सियसच्या पुढे गेलं, तर विद्यार्थ्यांची कामगिरी गणितात खालावत जाते.

एसी सुरू असेल तर अमेरिकेन प्रशासनातील टायपिस्ट 24 टक्के अधिक काम करतात, असंही एक अभ्यास सांगतो.

Image copyright Alamy
प्रतिमा मथळा एसीच्या शोधामुळं अमेरिकेतील उष्ण पट्ट्यातील घरांच्या रचनेत मोठे बदल झाले.

कटू सत्य

विल्यम नॉर्डस यांनी जगाची विभागणी अक्षांश आणि रेखाशांत केली. त्यानंतर प्रत्येक देशातील तापमान, लोकसंख्या आणि उत्पादकता अशी मांडणी केली. त्यातून ज्या देशांतील सरासरी तापमान जास्त असते तिथल्या लोकांची कार्यक्षमता कमी असते, असा निष्कर्ष त्यांनी काढला.

तर जेफ्री हील आणि जिसुंग पार्क यांचा अभ्यास सांगतो की, ज्या वर्षी उष्ण देशांत तापमान सरासरीहून अधिक असतं, तेव्हां उत्पादकता कमी असते. मानवी उत्पादकता 18 ते 22 सेल्सियस तापमानात सर्वाधिक असते, असा त्यांचा दावा आहे.

पण कटू सत्य हे आहे की आपण जेव्हा आतील तापमान कमी करतो, तेव्हा बाहेरचं तापमान वाढवतो.

फिनिक्स आणि एरिझोना यांच्या अभ्यासानुसार एसीमधून बाहेर पडणाऱ्या गरम हवेमुळे रात्रीचं तापमान दोन अंशांनी वाढतं. शिवाय, एसी चालवण्यासाठी भरपूर वीज लागते आणि ही वीज निर्माण करायला कोळसा किंवा गॅस लागतो.

आणि एसीमध्ये वापरले जाणारे वायू प्रदूषणकारक आहेतच. एसीचे तंत्रज्ञान अधिकाधिक क्लीन आणि ग्रीन होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण 2050 पर्यंत उर्जेच्या मागणीत आठ पट वाढ होणार आहे. ही बातमी हवामान बदलाच्या दृष्टीनं नक्कीच चांगली नाही.

म्हणूनच बाहेरचंही तापमान नियंत्रणात ठेवणारं तंत्रज्ञान त्वरीत शोधण्याची गरज भासत आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)