डायनासोर आज अस्तिवात असते, तर कशी असती आपली जीवसृष्टी?

  • जॉन पिकरेल
  • लेखक
फोटो कॅप्शन,

अशनी कोसळल्यानंतर पृथ्वीच्या पाठीवरील 75% सजीव नष्ट झाले.

तो असा महाप्रलय होता, ज्याची कधीच कोणी कल्पना करू शकत नाही. 6.6 कोटी वर्षांपूर्वी 15 किलोमीटर रुंदीचा अशनी पृथ्वीवर कोसळला.

हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या बाँबपेक्षा 10 अब्ज जास्त तीव्रतेचा हा आघात होता.

या आघातानं निर्माण झालेल्या किरणोत्सारी आगीच्या गोळ्यांनं शेकडो मैलांवरचं सर्व काही जाळून टाकलं होतं. या स्फोटानं निर्माण झालेल्या त्सुनामींनी अर्धी पृथ्वी गिळंकृत केली.

पृथ्वीचं अवघं वातावरणही होरपळलं होतं. जमिनीवरचा 25 किलोपेक्षा जास्त वजनाचा कोणाताही प्राणी जिवंत राहिला नव्हता.

पृथ्वीच्या पाठीवरचे 75 टक्के सजीव नष्ट झाले होते. सहाजिकच उडू न शकणाऱ्या डायानासोरची जगण्याची काहीच शाश्वती नव्हती.

फक्त लहान आकारांचे, पंख असणारे आणि त्यामुळे उडू शकणारे डायनासोर या आपत्तीतून वाचू शकले, त्यांना आपण आज पक्षी म्हणून ओळखतो.

अशनी दुसरीकडे पडला असता तर...

समजा इतिहासानं वेगळं वळण घेतलं असतं तर काय झालं असतं? जर अशनीची धडक चुकली असती किंवा काही मिनिटं आधी ही धडक झाली असती तर काय झालं असतं?

'बीबीसी'नं नुकतीच 'द डे द डायनोसोर डाईड' ही डॉक्युमेंट्री बनवली.

यात सहभागी तज्ज्ञांनी या शक्यतांवर चर्चा केल्या.

फोटो कॅप्शन,

सुरुवातीच्या काळातील सस्तन प्राण्यांना अधिक शत्रूंशी लढावं लागलं असतं.

'युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास'मधील भूगर्भशास्त्रज्ञ सीन गुलिक यांच्यासह इतर तज्ज्ञांनी यावर अभ्यासपूर्ण मतं व्यक्त केली.

समजा हा अशनी काही क्षण आधी किंवा काही क्षण नंतर पृथ्वीवर धडकला असता, तर काय झालं असतं?

या स्थितीत हा अशनी मेक्सिकोतील युकाटन द्वीपपकल्पावर न धडकता एकतर पॅसिपिक महासागरात किंवा अटलांटिक महासागरात कोसळला असता.

तसं झालं असतं, तर थोडा आघात कमी झाला असता. या आघातानंतर जी सल्फरयुक्त राळ पृथ्वीच्या हवेत फेकली गेली ती कमी काळ हवेत राहिली असती.

या राळेनं पुढची कित्येक वर्षं आसमांत भरून टाकला होता.

पण समजा यातलं काही उलट घडलं असतं, तरीही प्रलय घडला असता आणि सजीव नष्ट झाले असते. पण काही मोठे डायनासोर जगू शकले असते.

या पर्यायी परिस्थितीवर चिंतन करताना शास्त्रज्ञांतही उत्साह संचारला होता.

नव्या डायनासोरची उत्पत्ती झाली असती का?

डायनासोर आज अस्तित्वात असते तर? कोणत्या प्रकारच्या नव्या डायनासोरसची उत्पत्ती झाली असती?

सस्तन प्राणी डायनासोरच्या छायेत वाढले असते का? डायनासोरमध्ये माणसांसारखी बुद्धिमत्ता विकसित झाली असती का?

'डिस्ने'च्या 'द गुड डायनासोर' या सिनेमात दाखवल्यासारखं मनुष्यप्राणी विकसित झाला असता का? आणि तो डायनासोरच्या सोबतीने जगू शकला असता का?

काही संशोधक असं मानतात की अशनीची ही धडक झाली नसती तरीही डायनासोरस नष्ट झाले असते. कारण त्यांचं वर्चस्व संपत आलं होतं.

फोटो कॅप्शन,

महाकाय टेरोसोरसनी आकाशावर वर्चस्व ठेवलं असतं.

"मी थोडा वेगळा विचार मांडतो. हवामान थंड होत चालल्यानं डायनासोर नष्ट झाले असते," असं मत 'यूके'तल्या ब्रिस्टल युनिव्हर्सिटीतील पॅलिएंटॉलॉजिस्ट माईक बेंटन यांनी व्यक्त केलं.

"4 कोटी वर्षांपासून डायनासोर संपत चालले होते आणि सस्तन प्राण्यांनी त्यांची जागा घेतली असतीच," असं ते मानतात.

बेंटन यांनी 2016 ला एक रिसर्च पेपर लिहिला आहे. यात नष्ट झालेल्या प्रजातींची जागा घेण्याचा डायानासोरसचा वेग सस्तन प्राण्यांपेक्षा कमी असल्याची मांडणी त्यांनी केली होती.

काही तज्ज्ञांची मतं वेगळी आहेत.

अमेरिकेतल्या कॉलेज पार्क येथील 'युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड'मधील मांसभक्षी डायनसोरवरील अभ्यासक टॉम होल्ट्झ म्हणाले यांनी विषयावर चर्चा केली.

ते म्हणाले, "6.6 कोटी वर्षांपूर्वी काही प्रजाती नष्ट झाल्या असत्या कारण त्या काळात भारताच्या दख्खन पठारावर ज्वालामुखींचे प्रचंड उद्रेक झाले होते."

"तरीसुद्धा पॅलिओसिन आणि ईओसिन युगात डायनासोरच्या सर्वसाधारण जीवशास्त्रात फारसे बदल झाले नसते.

या युगातही क्रिटॅशिअस युगातील डायनसोर सहज जगू शकले असते," असं ते म्हणतात.

'युनिव्हर्सिटी ऑफ एडिंबरा'मधील प्रा. स्टिफन ब्रसेट यांच्या मते, बदलत्या हवामानात डायानासोर चांगल्यापैकी जगू शकले असते.

ते म्हणाले, "क्रिटॅशिअस युगाच्या अखेरीस डायनासोर बदलांना जुळवून घेऊ शकेल. नष्ट होणाऱ्या प्राण्याच्या गटांची लक्षणं त्यांच्यात दिसत नव्हती. उत्क्रांतीची बरीच शक्यता असलेला हा गट होता."

डायनासोरस जगले असते तर, त्यांच्या उत्क्रांतीत कोणत्या बाबींनी हातभार लावला असता?

फोटो कॅप्शन,

ट्रिसेरॅटॉप्सपासून गवताळ प्रदेशांत वेगाने धावू शकणाऱ्या डायनासोरची उत्पत्ती झाली असती.

त्यांच्यासमोर पहिलं मोठं आव्हान असतं, ते म्हणजे पर्यावरण बदलाचं. 5.5 कोटी वर्षांपूर्वी 'पॅलिओसिन ईओसिन थर्मल मॅक्झिम' ही घटना घडली होती.

डायनासोरची उत्क्रांती?

यात जगाचं तापमान आजच्या तापमानपेक्षा 8 अंश सेल्सियसनं जास्त होतं आणि वर्षा वनांनी पूर्ण पृथ्वी व्यापली होती.

बहुधा या परिस्थितीत उंच मानेचे 'सोरोपॉड्स' वेगाने वाढले असते. त्यांचं प्रजनन कमी वयात झालं असतं.

युरोपच्या बेटांवर क्रिटेशिअस युगाच्या शेवटच्या कालखंडात बुटक्या 'सोरोपॉडस'ची नोंद आहे.

यांचा आकार एखाद्या गाईपेक्षा किंचित मोठा होता.

दक्षिण अमेरिकेतील मध्य क्रिटेशिअस कालखंडातील टिटॅनोसोर (131 फूट लांबी) या कालखंडापर्यंत संपले होते.

क्रिटेशिअस युगाच्या अखेरीस सुरू झालेली आणखी एक घटना म्हणजे सपुष्प वनस्पतींचा वाढत चालेला विस्तार होय.

ज्युरासिक कालखंडात नेचे आणि जिम्नोस्पर्म वर्गीय वनस्पतींचं वर्चस्व होतं. या वनस्पती सकस नव्हत्या.

अशा वनस्पती खाण्यासाठी आणि पचवण्यासाठी लागणारा वेळ आणि पोटाचा आकार मोठाच हवा होता. त्यामुळंच 'सोरोपॉड्स'चा आकार इतका अवाढव्य असावा.

फोटो कॅप्शन,

सपुष्प वनस्पतींवर जगणारे डायनासोरस नंतरच्या काळात आकाराने लहान झाले असते का?

"आजच्या सारखीच जर वनस्पतींची उत्पत्ती झाली असती तर शाकाहारी डायनासोर्सना सपुष्प वनस्पतींवर जगावं लागलं असतं,"

हे मत आहे, न्यू जर्सी येथील स्टॉक्टन युनिव्हर्सिटीतील पॅलिएंटॉलॉजिस्ट मॅट बोनान यांच.

डायनासोरसचा आकार घटला असता का?

सपुष्प वनस्पती पचवण्यासाठी सोप्या असल्याने डायनसोरचा आकार घटला असता. मेसोझोईक हे महाकाय डायनासोर लुप्त झाले असते.

सपुष्प वनस्पतींच्या जोडीने फळे आली. त्यांची उत्क्रांती सस्तन प्राणी आणि पक्षांच्या जोडीनंच झाली.

या साधनसंपत्तीचा लाभ घेण्यासाठी माकडांसारख्या डायनासोरची उत्पत्ती झाली असती, जशी प्रायमेटसीची उत्पत्ती झाली तसंच.

अनेक पक्षी फळं खातात. तसंच नॉन बर्ड डायनासोर फलाहारी बनले असते, असं बोनान म्हणाले.

ब्रसेट म्हणतात, "लहान आकारांचे पंख असणारे डायनासोर प्रायमेटसच्या मार्गाने गेले असते. काही जणांनी परागकण एका फुलाकडून दुसऱ्या फुलांवर नेले असते."

गवताळ प्रदेशांच्या निर्मितीनं काय बदललं?

आणखी एक महत्त्वाची घटन घडली ती 34 दशलक्ष वर्षांपूर्वी. ईओसीन आणि ओलिगोसिन या युगांच्या सीमेवर दक्षिण अमेरिका आणि अंट्राक्टिका अलग झाले.

यातून 'अंटार्क्टिक आईस कॅप'ची निर्मिती झाली. यामुळं जग थंड आणि कोरडं झालं.

फोटो कॅप्शन,

जर डायनासोरस असते तर त्यांना उत्क्रांतीचा लाभ झाला असता, असे काही संशोधकांना वाटतं

ओलिगोसिन आणि नंतर मायोसिन युगात पृथ्वीवर गवताळ प्रदेशांची निर्मिती झाली.

होल्ट्झ म्हणाले, "या काळात शिडशिडीत पायांचे आणि वेगाने धावणारे शाकाहारी प्राणी मोठ्या संख्येनं वाढले."

ते म्हणाले, "पूर्वी जंगलात लपता येत होतं, उडी मारू स्वतःचा बचाव करता येत होता. परंतु गवताळ कुरणांवर लपण्यासाठी जागा नव्हती."

इतिहासातील या काळात चराऊ प्राण्यांची आणि त्यांची शिकार करणाऱ्यांची संख्या वाढली.

साऊदॅम्प्टनमधील पृष्ठवंशीय पॅलिएंटोलॉजिस्ट डॅरेन नॅश म्हणाले, "यास्थितीत धावणारे, गवत खाणारे डायानासोर ट्रिसेरॅटॉप्स, हायप्सिलोफोडॉन या डायनासोरचे वंशज असते."

सस्तन प्राण्यांना विकसित होण्यात बराच वेळ लागला. त्यांच्याशी तुलना करता डायानासोरला उत्पत्तीचा लाभ झाला असता. गवताळ प्रदेशांशी त्यांनी फार वेगाने जुळवून घेतलं असतं.

1000 दातांचा डायनासोर

डकबिल्ड हॅड्रोसोर या डायनासोरला 1000 दात होते. तर घोड्याला फक्त 40 दात आहेत.

डायनासोरना सस्तन प्राण्यांपेक्षा चांगली दृष्टी असती. रंगांच्या वाढीव दृष्टीमुळं शत्रू ओळखण्यात ते अधिक सक्षम असते. जमिनीवरील गवत खाता येण्यासाठी मानेची आणि तोंडाची रचना विकसित झाली असती.

"गेल्या 26 लाख वर्षांतील विविध हिमयुगांचाही सामना डायनासोरना करावा लागला असता. पण आपल्याला माहीत आहे की क्रिटेशिअस युगातील डायनासोरस आर्कटिक्ट सर्कलच्यावरही होते," ते म्हणाले.

फोटो कॅप्शन,

टायरन्नोसरस कदाचित या काळातही असते. पण त्यांच्यासाठी संरक्षित क्षेत्रात ते असते.

ते म्हणाले, "या परिस्थितीत डायनासोरसच्या शरीरावर घनदाट आयाळ आणि पंख असते," असे नॅश म्हणाले."

"अशा प्रकारच्या आयाळ असलेल्या ट्रायनासोरस किंवा ड्रोमेनासोर यांना विकसित होणं कठीण गेलं नसतं," असे मत कॅनडातील रॉयल ऑन्टॅरिओ म्युझियममधील डायनोसोरसच्या तज्ज्ञ व्हिक्टोरिया आरबर यांनी व्यक्त केले.

नॅचरल हिस्ट्री म्युझियममधील पॅलिएंटालॉजिस्ट पॉल बॅरेट म्हणाले, " अॅडाप्टेशन म्हणजेच अनुकूलन ही एक सहाजिक प्रक्रिया आहे. जमिनीखाली राहणे, हे स्वभाविक अनुकूलन आहे. साप आणि सरड्यांत हे पाहता येतं."

जमिनीखाली राहणारे डायनासोर असते तर?

"डायनासोरसमध्ये हे अॅडाप्टेशन (अनुकूलन) मात्र झालं नाही. त्यांना अधिक संधी मिळाली असती तर जमिनीखाली राहू शकणारे डायनासोरही विकसित झाले असते," असं ते म्हणाले.

महासागर हा एक असा प्रांत आहे जिथे डायनासोर जास्त पोचले नाहीत. स्पिनोसोर ही एक अशी प्रजाती आहे की, नदीच्या सानिध्यात राहत असे. तर अँकिलोसोरस हे डायनासोर समुद्रकिनारी राहात असत.

हे डायनासोर सस्तन व्हेल ज्या पद्धतीने गेले त्या मार्गानं जात समुद्राला आपलंसं केलं असतं का?

बहुधा समुद्रातील सरपटणारे जीव एक्थेसोर किंवा प्लेसिओसरसारखं अंडी घालण्यासाठी ते एकतर काठावर तरी आले असते किंवा कालांतराने त्यांनी समुद्रातच थेट पिलांना जन्म दिला असता.

फोटो कॅप्शन,

डायनासोरस पाहण्यासाठी आपल्याला कदाचित संग्रहालयात जावं लागलं नसतं.

पण जमिनीवर डायानोसोर, आकाशात टरेसोर आणि समुद्रात एक्थेसोर, मोसॅसोर अशी परिस्थिती राहिली असती तर पक्षी आणि सस्तन प्राण्यांचं भविष्य असतं तरी कसं?

सस्तन आणि पक्षी कसं जगले असते?

क्रिटेशस युगात पक्ष्यांनी वैविध्य मिळवलं होतं. होल्ट्झ यांच्या मते, टेरेसोर विविधता वाढली होती. यामध्ये अॅझडारकिडाई या महाकाय दात नसलेल्या टेरेसोरचाही समावेश होता.

यातील काहींच्या पंखांचीच लांबी तब्बल 40 फूट इतकी होती.

अॅझडारकिडाई उडू शकत होते का, या बद्दल मतमतांतरे आहेत.

ज्या प्रकारे मॅडगास्कर, न्यूझीलंड अशा बेटांवर या टेरेसोरसचे राज्य असतं. जे राज्य आपल्या कालचक्रात उडू न शकणारे मोठे पक्षी डोडो आणि मौआ यांचं होतं.

नेश म्हणतात, "जी विविधता आज पक्ष्यांत आहे, ती सारी विविधता डायनासोरमध्ये असती."

"पण सस्तन प्राण्यांची कथा वेगळी आहे. 160 दशलक्ष वर्षांपूर्वी त्यांच अस्तित्व होतं. पण ते फारसे दखलपात्र नसलेले लहान जीव होते. ते विविधतापूर्ण पण काही ठराविक भागांपूरते मर्यादित होते."

नेश म्हणाले, जेव्हा अशनीची धडक झाली, तेव्हा त्यावेळी प्रस्थापित असणारे डायनासोर नष्ट झाले आणि सस्तन प्राण्यांना मुक्त होण्याची संधी मिळाली."

काही जण या मताशी सहमत नाहीत.

मोठ्या सस्तन प्राण्यांना फार संधी मिळाली नसती पण उंदीर, लहान मासंभक्षक, झाडावर चडू शकणारे प्रायमेट्स, पॉसमसारखे प्राणी मोठ्या संख्येने असते, असं काहींचं मत आहे.

विविध प्रकारचे माकड झाडावर झूलत असताना आणि त्यांच्या आजूबाजूला डायनसोर फिरत असताना 'होमिनाईड'शी साधर्म्य असणाऱ्या जीवाची उत्पत्ती झाली असती का?

फोटो कॅप्शन,

अल्बर्टा बॅडलॅंड इथं डायनासोरसचे अवशेष सापडले आहेत.

नेश म्हणतात, "काही सस्तन प्राण्याची उत्क्रांती अशनीच्या घटनेपूर्वीच झाली होती. या परिस्थितीतही काही प्रायमेटस असते, कदाचित काही प्रकारचे मानवही असते."

ते म्हणाले, "आपली उत्क्रांती ही महाकाय सस्तन प्राण्यांनी भरलेल्या जगात झाली, हे लक्षात घेतलं तर ते अगदीच वाजवी वाटतं."

मानवाची उत्पत्ती कशी झाली असती?

या शक्यतेशी होल्ट्झही सहमत आहेत.

ते म्हणतात "झाडांवर राहणारे काही प्रायमेट्स विकसित झाले असते. ते त्या अधिवासांत गेले असते आणि त्या पर्यायी जगाचे ते कथित मानव झाले असते."

"नाहीतरी आपल्या पूर्वजांना सॅबरटूथ (मोठे सुळ्यांचा नष्ट झालेला मर्जार कुळातील प्राणी) आणि महाकाय काळविटांशी संघर्ष केला आहेच," असे ते म्हणाले.

"या स्थितीत यांना ड्रोमेसौरस आणि अॅबेलोसोरस या डायनासोरसशी संघर्ष केला असता." असे ते म्हणतात.

"आणि मानवाला सुरक्षित निवारा बनवावा लागला असता," होल्टझ म्हणतात.

फोटो कॅप्शन,

बुद्धिमान डायनासोरसची उत्पत्ती झाली असती का, या बद्दल संशोधकांत मतमतांतरे आहेत.

ते म्हणाले, "आपले पूर्वज धोकादायक अशा मोठ्या प्राण्यांच्यासोबत राहिले आणि जगण्यासाठीचे हातखंडे वापरले."

ते म्हणाले, "मिसोझोईक यूग फारच धोकादायक होतं असं नाही. तिथं रोज रक्ताचे पाठ वाहत असत असा समज आहे."

"हे मोठे शिकारी विविध ठिकाणी विखुरलेले असत. त्यांच्यापासून दूर राहिलं की हे जग तसं सुरक्षित होतं," ते म्हणाले.

अशा परिस्थिमध्ये हुशार सस्तन प्राण्यांची शक्यता होती का? संवेदनशिल डायनासोरची उत्क्रांती झाली असती का?

बुद्धिमान डायनासोरसची उत्क्रांती शक्य होती?

1982 ला डेल रसेल यांनी एक रिसर्च पेपर सादर केला होता.

ओटावा येथील कॅनडियन म्युझियम ऑफ नेचरमध्ये ते कार्यरत होते. यात त्यांनी बुद्धिमान डायनासौराईडची उत्क्रांती झाली असती, अशी मांडणी केली आहे.

साय-फाय सिनेमातील परजीवींसारखे दिसणारे डायनासौराईडचे त्यांनी प्रारूप ही मांडलं होतं. हिरवी त्वचा आणि मोठे डोळे, अशा या प्रारूपचं रुपडं होतं.

त्यांनी मांडलेल्या सिद्धांतानुसार ट्रुडॉन या मासंभक्षी डायनासोरचा मेंदू असाधारणपणे मोठा होता.

त्याच्या वंश उत्पत्तीतून बुद्धिमान डायनासोरची उत्क्रांती झाली असती.

समस्या सोडवण्याची क्षमता असणारे आणि मेंदूची रचना किचकट असणाऱ्या डायनासोरची उत्क्रांती झाली असती, याच्याशी होल्ट्झ सहमत आहेत.

पण ते माणसांसारखे दिसू शकले असते, यावर मात्र त्यांचा विश्वास नाही.

"माणसाचा मार्गक्रम पूर्ण वेगळा होता, त्यांनी झाडांवर लटकण्यापासून प्रगती केली. डायनासोर दोन पायांवर चालत, पुढच्या पायांचे उपयोजन ही होतं," असे ते म्हणाले.

नॅश म्हणतात, "मला वाटत नाही मानवी बुद्धिमत्तेच्या जवळ जाईल असं काही विकसित झालं असतं. मोठ्या मेंदूचे आणि बुद्धिमान डायनासोर असते तरी ते डायनासोरसारखेच दिसले असते."

गृहित धरा की डायनासोर मागील काही शेकडो वर्षे मानवासोबत जगले असते, तर ते आताच्या जगात अस्तित्वात असते का? याच उत्तर होय, असं आहे.

फोटो कॅप्शन,

माणसांची वाढती लोकसंख्या आणि शिकारीच्या तंत्राचा फटका डायनासोरला बसला असता.

या जगात डायनासोर्स कसे असते?

मानवाने मॅमॉथसारख्या महाकाय प्राण्यांच्या शिकारी केल्या. माणसाची वाढणारी लोकसंख्या आणि शिकारीच्या तंत्रज्ञानाचा फटका डायनासोरलाही बसला असता.

होल्टझ म्हणतात, "माणसाच्या जगभर विस्तारासोबत डायनासोरच्या विलुप्त होण्याची घटना घडू शकली असती."

पर्यायी कालचक्रात आताच्या काळात कदाचित सोरोपोडससारखे शाकाहारी आणि टिरेक्ससारखे मांसभक्षी अस्तित्वात असते.

ते त्यांच्यासाठी त्यांच्या आकाराला साजेल अशा संरक्षित वनांत असते.

ऑस्ट्रेलिया आणि अल्स्कात असलेल्या वैराण प्रदेशांत ते असते.

कबूतर, उंदीर यांच्यासारख काही लहान डायनासोरसनी शहरी वातावरणही स्वीकारलं असतं आणि मानवाच्या सहवासांत राहिले असते.

आपल्या भूतकाळात मोठे सस्तन प्राणी नष्ट झाले. पण हत्ती, गेंडे राहिलेच.

म्हणून कॅमेरा, दूर्बिण सज्ज ठेऊन डायनासोरच्या प्रतीक्षेतील 'ज्युरासिक पार्क' सिनेमासारखं 'डायनासोर सफारी'ची कल्पनाही तुम्ही करू शकता.

जॉन पिकरेल 'फ्लाईंग डायनासोर्स अॅंड वीर्अड डायनासोर्स' या पुस्तकाचे लेखक आहेत.

हे वाचलं का

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)