लिफ्टने कसा बदलला जगाचा चेहरामोहरा?

लिफ्ट Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा लिफ्टने केवळ शहरांमध्येच नव्हे तर सामाजिक बदलही घडवून आणले.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अर्थात पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हटलं की बस, ट्रेन, मेट्रो, मोनो, विमानं या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर तरळतात. पण या यादीत लिफ्टचा समावेश नसतो.

घर असो वा ऑफिस, तिथं पोहोचण्याचा अविभाज्य घटक असलेली लिफ्ट दररोज शेकडो माणसांना अपेक्षित ठिकाणी नेते. पण प्रवासाच्या बाकी प्रकारांच्या तुलनेत लिफ्ट फारच उपेक्षित राहून जाते.

बलाढ्य चीनमध्ये दरवर्षी सहा लाखांहून अधिक लिफ्ट्स बसवल्या जातात. जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग बुर्ज खलिफा तीन लाखाहून अधिक क्षेत्रफळावर पसरलं आहे. लिफ्ट्स नसत्या तर 50-60 छोट्या इमारती उभाराव्या लागल्या असत्या.

ही प्रत्येक बिल्डिंग, त्यात काम करणारी माणसं, गाड्या हे सगळं एकत्रित केलं तर प्रचंड गर्दी होऊन गोंधळ उडाला असता. अवाढव्य आकाराच्या या बिल्डिंगमध्ये हजारो माणसं सहजपणे काम करू शकतात.

याचं श्रेय लिफ्टला जातं. कारण एवढी माणसं लिफ्ट असल्यामुळेच ऑफिसपर्यंत जाऊ येऊ शकतात.

लिफ्टची सुरुवात

प्राचीन ग्रीसमध्ये आर्किमिडीजने लिफ्ट तयार केली होती. 1743 मध्ये पंधरावा लुईस प्रेयसीला लपून भेटायला जाण्यासाठी लिफ्टचा वापर करत असे.

Image copyright ROBERT FRIED / ALAMY STOCK PHOTO
प्रतिमा मथळा व्हरसेल्समधील राजाचं बेडरुम त्याच्या प्रेयसीशी एका गुप्त लिफ्टद्वारे जोडलेलं होतं.

हंगेरी, चीन, इजिप्त या देशांतल्या लिफ्ट्स चालवण्यात प्राण्यांची मदत घेतली जात असे. त्यानंतर वाफेच्या मदतीने लिफ्ट्स बळकट झाल्या.

इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीचे शिलेदार मॅथ्यू बोल्टन आणि जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. या शक्तिशाली इंजिनांद्वारे खाणींमधल्या लिफ्ट्स चालत असत.

सुरक्षेची भीती

या लिफ्ट्स आपलं काम व्यवस्थित करत, पण खूप उंचीवर जाताना लोकांना भीती वाटायची. लिफ्टमधून वर जाताना काहीतरी घोळ होईल, असं अनेकांना वाटत असे.

लिफ्ट बंद पडली तर दोन मजल्यांमध्ये अंधारात आपण अडकू, असं वाटणं साहजिक होतं. मग ही भीती बाळगणारे अनेकजण पाच-सहा मजले पायऱ्या चढून जायचे.

उंच बिल्डिंगमध्ये लिफ्टने वर जाणं धोक्याचं वाटायचं. लिफ्ट तयार करणं पुरेस नव्हतं तर लिफ्टने जाणं सुरक्षित आहे, हे लोकांना समजावून देणं आवश्यक होतं.

एलिशा ओटिस यांना त्याचं श्रेय जातं. 1853 मध्ये न्यूयॉर्कमध्ये झालेल्या वर्ल्ड फेअरमध्ये एलिशा मोठ्या समूहासमोर एका तराफ्यासारख्या वस्तूवर उभे राहिले.

ते आता पडणार, अशी भीती समोरच्या जनतेला वाटत होती. समोरच्या लोकांच्या चेहऱ्यावर अनामिक भीती दाटली होती.

एलिशाच्या मागे एक माणूस कुऱ्हाड घेऊन उभा होता. त्याने एक दोर तोडला आणि एलिशा उभा असलेला तराफा खाली येऊ लागला.

एलिशा पडणार या भीतीने लोक ओरडू लागले. पण तेव्हाच एलिशा आत्मविश्वासाने म्हणाला, "लोकहो, घाबरू नका. मी पडणार नाही."

Image copyright Alamy
प्रतिमा मथळा लिफ्टच्या सुरक्षेचं प्रात्यक्षिक दाखवताना एलिशा ओटिस

थोड्याच वेळात एलिशा पूर्णपणे खाली उतरला.

या घटनेनं शहराचं चित्रच पालटलं. लिफ्ट्स असलेल्या गगनचुंबी इमारती ही या शहराची ओळख झाली. ब्रेक अर्थात नियंत्रण असलेल्या लिफ्ट्समुळे न्यूयॉर्कचं रुपडं पालटलं.

सामाजिक चित्र बदललं

पूर्वीच्या काळी बहुमजली घरांमध्ये नोकर मंडळी वरच्या मजल्यांवर राहायची. दिवसभर श्रम केल्यानंतर जा-ये करण्याने त्यांची दमछाक व्हायची.

पण घराचे मालक तळमजल्यावर आरामात राहायचे.

लिफ्टचा पर्याय समोर आल्यानंतर घरांची सामाजिक रचनाच बदलली. पेंटहाऊसच्या वरच्या मजल्यांवर मालक राहू लागले आणि सहाय्यक मंडळींची तळमजल्यावर रवानगी झाली.

Image copyright PUNIT PARANJPE / Getty Images
प्रतिमा मथळा भारतातही लिफ्टमुळेच अनेक शहरांचा विकास शक्य झाला.

स्टील आणि सिमेंट काँक्रिटच्या शोधामुळे लिफ्टच्या वापराला चालना मिळाली. वर जा-ये करण्यासाठी लिफ्ट हा सुरक्षित पर्याय आहे, हे पटल्यानंतर उंचच उंच इमारतींचं पेव फुटलं.

गजबजलेल्या परिसरात भूमिगत रेल्वेचं जाळं असायचं. जमिनीखालच्या स्टेशनपर्यंत जाण्यायेण्यासाठी मोठ्या आकाराच्या लिफ्ट वापरल्या जायच्या.

उपयुक्त लिफ्टमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळाली. भव्य आकाराच्या लिफ्ट असलेल्या इमारती आणि भूमिगत रेल्वेचं जाळं ही आजच्या मॅनहटन परिसराची ओळख आहे.

गगनचुंबी इमारती असल्यामुळे भूमिगत रेल्वेचं जाळं पसरू शकलं. या दोन्ही व्यवस्था लिफ्टसारख्या यंत्रणेमुळे कार्यान्वित असतात याकडे आपलं दुर्लक्ष झालं.

आकाशाशी नातं जोडणाऱ्या गगनचुंबी इमारती आणि जमिनीच्या उदरात धावणाऱ्या भूमिगत रेल्वे यांना जोडणारा दुवा लिफ्ट हा आहे.

मॅनहटन परिसरातली 80 टक्के माणसं भूमिगत रेल्वेनेच प्रवास करतात. उर्वरित माणसं बाइकने जातात किंवा पायी जातात.

छोटा चमत्कार

सिंगापूरपासून सिडनीपर्यंत गगनचुंबी इमारतींचा ट्रेंड जगात सगळीकडे रुढ झाला. खूप पैसे देऊन विकत घेऊन किंवा प्रचंड भाडं देऊन माणसं या इमारतीमध्ये राहणं पसंत करतात.

इथं प्रतिभावान आणि कल्पक लोकं राबतात, असा समज आहे. म्हणूनच या शहरांमध्ये असंख्य पेटंट्सची नोंद होते.

अनेक स्टार्टअप याच परिसरात सुरू होतात. इथलं राहणीमान सधन आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा गगनचुंबी इमारतींमध्ये लिफ्टची रचना गुंतागुंतीची असते.

ग्रामीण किंवा निमशहरी भागाच्या तुलनेत हा भाग आटपाट नगरासारखा आहे. इथं दरडोई ऊर्जेचा वापर कमी आहे. लिफ्टच्या शोधाशिवाय हा महत्त्वपूर्ण सामाजिक बदल प्रत्यक्षात येऊ शकला नसता.

सुधारणा, बदल, क्रांती यांची दखल इतिहासात घेतली जाते. मानवी समाजाच्या उन्नती प्रक्रियेच्या लिखाणात लिफ्टचा उल्लेख नाममात्र राहतो. इतकं मोठं योगदान असूनही लिफ्टला महत्त्वपूर्ण वाहतूक पर्यायांमध्ये बढती मिळत नाही.

बस किंवा ट्रेनला उशीर होण्याची लोकांना सवय झाली आहे, पण लिफ्ट यायला काही सेकंद जरी उशीर झाला तर लोकं अस्वस्थ होतात.

नाविन्य आणि उन्नती

प्रसिद्धीची अपेक्षा न करता अविरतपणे सेवा देणारी लिफ्ट बहुतांशीवेळी दुर्लक्षित राहते.

न्यूयॉर्कर मासिकात निक पॉमगार्टन म्हणतात, लिफ्ट एका प्रकारे टेलेपोर्टेशनचं साधन आहे, जे आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जातं. आपण लिफ्टमध्ये प्रवेश करतो.

एक सूक्ष्म धक्का जाणवतो आणि आपण वर सरकू लागल्याचं लक्षात येतं. दार उघडतं आणि आपण वेगळ्याच विश्वात शिरतो. एलईडी स्क्रीन आणि आकड्यांची बटणं नसती तर आपण कुठे आहोत आणि नक्की कुठे जातोय, हे समजलंच नसतं.

लिफ्ट या वस्तूला आपण गृहीत धरतो पण काळानुरुप त्यात बदल झाले आहेत.

उंचच उंच इमारती या हे या लिफ्ट तंत्रज्ञानासाठी मोठं आव्हान आहे. सुपर टाइट रोप अर्थात प्रचंड शक्ती आणि क्षमतेच्या तारांच्या बळावर गगनचुंबी इमारतीत लिफ्ट कार्यरत असते.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरातील एम्पायर स्टेट ही जगभरातल्या प्रसिद्ध गगनचुंबी इमारतींपैकी एक.

अत्याधुनिक संगणकीय प्रणालींद्वारे एकाचवेळी दोन गाड्यांची ने-आण केली जाऊ शकते. अनेकदा सोपी युक्तीच नामी ठरते.

लिफ्टच्या रांगेत प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी लॉबीमध्ये मोठ्या आकाराचे आरसे बसवलेले असतात. आरशात स्वत:चं रुप पाहण्यात प्रत्येकजण दंग होतो आणि वाट पाहण्याचा कंटाळा दूर होतो.

लिफ्ट ऊर्जा संवर्धक असतात कारण त्यांची रचना पर्यावरणस्नेही असते. तंत्रज्ञानानुसार त्यात अर्थातच सुधारणा होऊ शकते.

न्यूयॉर्क शहरातील एम्पायर स्टेट ही जगभरातल्या प्रसिद्ध गगनचुंबी इमारतींपैकी एक. या इमारतीमधून कार्बन उत्सर्जन कमी व्हावं यासाठी 500 मिलियन डॉलर इतकी प्रचंड रक्कम खर्चून एक प्रकल्प राबवण्यात आला.

या प्रकल्पाअंतर्गत एम्पायर स्टेटच्या लिफ्टच्या वीज वापरात मूलभूत बदल करण्यात आले. माणसांना त्यांच्या मजल्यावर सोडून लिफ्ट खाली जाते किंवा रिकामी लिफ्ट वर जाते तेव्हा शिल्लक राहणारी ऊर्जा इमारतीला पुरवण्यात येते.

पण एम्पायर स्टेट इमारत नेहमीपासूनच ऊर्जेचं संवर्धन करत होती. कारण या इमारतीखालीच रेल्वेस्टेशन आहे. स्टेशनसाठी उपलब्ध ऊर्जा यंत्रणेचा फायदा एम्पायर स्टेटला होतो आणि इमारतीचं वैयक्तिक ऊर्जासंवर्धन होतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा तंत्रज्ञानाचं आधुनिकीकरण होण्यापूर्वी अशा लिफ्ट्स वापरल्या जात.

पर्यावरण क्षेत्रात कार्यरत 'रॉकी माऊंटन इन्स्टिट्यूट'ने एम्पायर स्टेटमधल्या लिफ्ट ऊर्जायंत्रणेत बदल केले. पर्यावरणपूरक वास्तू कशी असावी, याचं उत्तम उदाहरण या इन्स्टिट्यूटचं कार्यालय आहे.

या कंपनीचे संस्थापक अमोरी लोव्हिन्स यांचं स्मारक या वास्तूमध्ये आहे. हे ऑफिस एका पर्वतराजीत आहे.

कंपनीपासून सर्वांत जवळचं स्टेशन 300 किलोमीटरवर आहे. आणि कंपनीत काम करणारी माणसं सायकल, बस किंवा इलेक्ट्रॉनिक कार वापरून ऑफिसला जातात.

अनेक बैठका टेलिकॉन्फरन्सिंद्वारे होतात. अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या खिडक्या, पाण्याचा पुनर्वापर होणारी यंत्रणा, ऊर्जेचं संवर्धन करणारी मशिन्स, अशा अनोख्या गोष्टी या कंपनीत आहेत.

पण ऊर्जासंवर्धनाचं सगळ्यांत मोठ्ठं उदाहरण असलेली लिफ्ट आपण दररोज वापरतो. आणि त्यांना कधीच योग्य तो मान मिळत नाही.

लिफ्टची अवस्था नाही चिरा नाही पणती अशी असते.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)