आम्ही इंजिनिअर बनवले, पाकिस्ताननं दहशतवादी : सुषमा स्वराज UN मध्ये कडाडल्या

सुषमा स्वराज Image copyright HTTP://WEBTV.UN.ORG

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी शनिवारी संयुक्त राष्ट्रांच्या आम सभेत भाषण केलं. यावेळी त्यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला.

स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतातील सरकारांनी विकासाचा मार्ग जपला. त्यासाठी संस्थांची निर्मिती केली. पाकिस्ताननं जगाला जिहादी, दहशतवादी दिले, असं त्या म्हणाल्या.

भारत आजच्या घडीला सुपरपॉवर म्हणून ओळखला जातो तर पाकिस्तान दहशतवादी राष्ट्र म्हणून ओळखलं जातं, अशा तीव्र शब्दांत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र अधिवेशनात पाकिस्तानवर टीकास्त्र सोडले.

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांनी भारतावर विविध आरोप केले होते.

काय म्हणाल्या स्वराज?

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज संयुक्त राष्ट्र अधिवेशनात बोलताना.
  • पाकिस्तानचे पंतप्रधान बोलत असताना जग म्हणत होतं, कोण बोलतंय बघा.
  • ज्या देशात सामान्यांवर अन्याय होतो, मूलभूत मानवी हक्कांचं उल्लंघन होतं, तो देश आम्हाला माणुसकीचे धडे देत होता. आम्ही विविध प्रश्न सोडवण्याचा प्रश्न करत असताना पाकिस्तान सातत्याने आम्हाला त्रास देत होता.
  • आम्ही आयआयटी, आयआयएम, एम्स, इस्रोसारख्या संस्थांची निर्मिती केली. पाकिस्ताननं जगाला काय दिलं- लष्कर ए तय्यबा, अल कायदा, हक्कानी नेटवर्क, हिझबुल मुजाहिद्दीन, दहशतवाद्यांचे कॅम्प.
  • भारतात सरकार कुठलंही असलं तरी देशाचा विकास हेच प्राधान्य होतं. पाकिस्तान दहशतवाद्यांचं आगार झालं. आम्ही डॉक्टर तयार केले, अभियंते तयार केले. डॉक्टरांनी जीव वाचवण्याचं मोलाचं काम केलं. अभियंत्यांनी देश उभारण्यात योगदान दिलं.
  • पाकिस्ताननं जिहादी आणि दहशतवादी तयार केले. जिहादी केवळ निरपराध भारतीयांचा जीव घेत नाहीत तर जगभरातील निरपराध माणसांचा जीव घेत आहेत. पाकिस्तान दहशतवादावर पैसा खर्च करतोय. त्यांनी आपल्या माणसांवर हा पैसा खर्च करावा.
Image copyright Getty Images
  • भारत आणि पाकिस्तान यांना एकाचवेळी स्वातंत्र्य मिळालं. आजच्या घडीला भारत सुपरपॉवर म्हणून ओळखला जातो तर दहशतवाद्यांचा देश अशी पाकिस्तानची ओळख आहे.
  • दोन्ही देशांदरम्यान संवादाची वीण असावी यासाठी आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह बायलॅटरल डायलॉग नावाचा उपक्रम सुरू केला. या कार्यक्रमाचं नाव अतिशय विचार करून देण्यात आलं. दोन्ही देशांच्या संवादात तिसरं कुणी असू नये हा त्यामागचा विचार होता. पाकिस्ताननं अमानुषपणाची हद्द ओलांडत लोकांचा जीव घेणं उद्दिष्ट असणाऱ्या संघटनांना साथ दिली.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांती आणि दोस्ती तत्त्वांनुसार पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात केला. मात्र पाकिस्ताननं आपला खरा चेहरा दाखवला. सिमला करार तसंच अन्य तहांच्या वेळी पाकिस्ताननं नियमांचं उल्लंघन केलं आहे.
  • भारत प्रदीर्घ काळ दहशतवादाची शिकार ठरला आहे. हा अत्यंत गंभीर प्रश्न असल्याचं आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मांडलं होतं. मात्र त्यावेळी आमचं म्हणणं कोणीही गांभीर्यानं घेतलं नाही.
  • आता अख्ख्या जगावर दहशतवादाचं सावट आहे. दहशतवाद हे जागतिक प्रश्न झाला आहे. दहशतवादाला रोखणं हे संयुक्त राष्ट्रांच्या मूलभूत उद्दिष्टांपैकी एक आहे. भाषणं, ठराव, मसुदे होतात त्यांचं तंतोतंत पालन करणंही आवश्यक आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)