अमेरिकेच्या दबावानंतरही इराणनं केली क्षेपणास्त्र चाचणी

हसन रुहानी Image copyright AFP
प्रतिमा मथळा हसन रुहानी

इराणनं मध्यम पल्ल्याचा मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवर त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये भाषण करतांना इराणवर टीका केली होती. त्यानंतर इराणनं ही चाचणी घेतली आहे.

खोरामशर नावाच्या या क्षेपणास्त्राची मारक क्षमता तब्बल 2000 किमी आहे. शुक्रवारी इराणची राजधानी तेहरानमध्ये झालेल्या लष्करी संचलनात ते प्रदर्शित करण्यात आलं होतं.

"इराण त्यांच्या लष्करी सामर्थ्यात मोठी वाढ करेल, पण ते प्रतिबंधात्मक असेल," असं राष्ट्राध्यक्ष हसन रूहानी यांनी शुक्रवारी जाहीर केलं आहे.

अमेरिकेनं जुलैमध्ये इराणवर नव्यानं काही निर्बंध घातले आहेत. इराणनं 2015 मध्ये अमेरिका आणि इतर 6 देशांबरोबर केलेल्या कराराचा हा भंग असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे.

इराणनं 2015 मध्ये त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला आवर घालण्याची तयारी दर्शवली होती. त्याबदल्यात अमेरिका आणि इतर देशांनी त्यांच्यावर घातलेले निर्बंध उठवावेत, असा करार करण्यात आला होता.

दरम्यान, कुठल्याही कराराचा भंग केला नसल्याची प्रतिक्रीया इराणनं दिली आहे. तसंच हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यासाठी तयार केलं नसल्याचं इराणनं सांगितलं आहे.

(बीबीसीमराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)