अँगेला मर्केल: 2021 मध्ये घेणार राजकीय संन्यास, बर्लिनमध्ये केली घोषणा

फोटो स्रोत, Getty Images
अँगेला मर्केल यांची ओळख युरोपियन युनियनच्या प्रभावी नेत्या आहेत.
अँगेला मर्केल यांनी 2021 मध्ये जर्मनीच्या चान्सलरपदावरून तसंच राजकारणातून संन्यास घेणार असल्याची घोषणा केली आहे.
बर्लिनमध्ये सोमवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली आहे. जर्मनीत नुकत्याच झालेल्या प्रांतीय निवडणुकांमध्ये त्यांच्या ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन या पक्षाची हार झाली आहे. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत असल्याचं अँगेला यांनी म्हटलं आहे.
डिसेंबरमध्ये त्यांच्या पक्षाच्या होणाऱ्या अधिवेशनात नेतेपदासाठी दावा करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 2000 साला पासून पक्षाची धुरा त्यांच्या हातात आहे.
चान्सलरपदाची सलग चौथी कारकिर्द संपल्यानंतर कुठलही राजकीय पद स्वीकारणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
अँगेला मर्केल यांचे जुने प्रतिस्पर्धी फेड्रीक मर्झ यांनी याआधीच त्यांची येत्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.
जर्मनीमध्ये अलीकडच्या काळात अतिउजव्या पक्षांचं प्रस्थ वाढत असल्याचं सोमर आलं आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अँगेला मर्केल यांची चौथ्यांदा जर्मनीच्या चान्सलरपदी निवड झाली होती.
मर्केल यांचा आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे
1) अँगेला मर्केल यांचा जन्म 17 जुलै 1954 ला हँबर्गमध्ये झाला. त्यांचे वडील पूर्व जर्मनीतल्या एका गावात पास्टर म्हणजे ख्रिस्ती धर्मगुरू होते.
2) बर्लिनबाहेर ग्रामीण भागात त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनी फिजिक्समध्ये डॉक्टरेट मिळवली आहे.
3) 2015 साली सीरियातल्या निर्वासितांसाठी देशाच्या सीमा खुल्या करण्याच्या त्यांच्या निर्णयाचे बरेच पडसाद उमटले होते.
4) जर मला शक्य झालं असतं तर मी घड्याळाचे काटे उलटं फिरवून 8 लाख90 हजार शरणार्थींसाठी चांगली तयारी केली असती, यातील बहुतांश सीरियातील नाहीत, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.
5) अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अँगेला मर्केल यांचा उल्लेख माझ्या निकटच्या आंतरराष्ट्रीय सहकारी असा केला होता.
6) युरोप आणि इतरत्रही लोकानुनय वाढत असताना युरोप खंडात सहिष्णू लोकशाहीच्या सर्वोत्तम रक्षक म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं.
फोटो स्रोत, German Government
अँगेला मर्केल यांचं जर्मन सरकारमधील पहिलं पद महिला आणि युवा मंत्री म्हणून जबाबदारी होती
7) पूर्व बर्लिनमध्ये संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या एका संस्थेत त्या केमिस्ट म्हणून काम करत होत्या. 1977 मध्ये त्यांच लग्न उलरिच मर्केल यांच्याशी झालं. पण 4 वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला.
8) 1989 ला त्या पूर्व जर्मनीतील लोकशाही चळवळीत सहभागी झाल्या होत्या. बर्लिनची भिंत कोसळल्यानंतर जर्मन सरकारमध्ये त्यांना प्रवक्त्या म्हणून संधी मिळाली.
9) 1990 ला जर्मनीचं एकीकरण होण्यापूर्वी त्या सीडीयूमध्ये सहभागी झाल्या. पुढच्या वर्षी त्यांची नेमणूक महिला आणि युवा मंत्री म्हणून झाली.
10) 1999 तत्कालिन पक्षप्रमुख हॅल्मट कोल यांना पक्ष निधीतल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर 2000 ला मर्कल यांची नियुक्ती ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियनच्या (CDU) नेत्या म्हणून झाली.
11) 2005 ला त्या जर्मनीच्या पहिल्या महिला चान्सलर झाल्या.
12) 1998 ला त्यांनी प्रा. योकीम सॉएर यांच्याशी लग्न केलं.
फोटो स्रोत, Reuters
जर्मनीच्या पहिल्या महिला चान्सलर होण्याचा मान अँगेला मर्केल यांना मिळाला.
13) युरोपमधील आर्थिक संकटात त्यांनी कठोर प्रशासकाची भूमिका निभावली. आर्थिक शिस्त, खर्चात कपात, दक्षता अशी धोरणे त्यांनी स्वीकारली.
14) युरोपियन युनियनने युरोला विश्वासार्हता मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांत त्यांचा मोठा वाटा आहे.
15) जर्मनीमधील बेरोजगारीचे कमी प्रमाण, सशक्त निर्यात यामुळे जर्मनीमध्ये त्यांच्या बद्दलचं जनमत चांगलं बनलं आहे. 'कठीण काळातील सुरक्षित हात' असं त्यांच वर्णन केलं जातं.
16) संयुक्त राष्ट्रांनी त्यांचा सत्कार केला असून, टाईम मासिकानेही 'पर्सन ऑफ द ईअर'ने त्यांचा सन्मान केला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)