भारतापेक्षा पाकिस्तानकडे जास्त अण्वस्त्रं!

अण्वस्त्र नष्ट करण्यासाठीचा जागतिक दिवस Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा 26 सप्टेंबर हा दिवस अण्वस्त्र नष्ट करण्यासाठी जागतिक दिवस म्हणून साजरा केला जातो.

26 सप्टेंबर हा दिवस 'जागतिक अण्वस्त्रं निर्मूलन दिन' म्हणून पाळला जातो. 2013 साली संयुक्त राष्ट्रांनी असा दिवस पाळला जावा याबाबतचा निर्णय घेतला.

या दिवसा निमित्त कोणत्या देशाकडे सर्वाधिक विनाशकारी शस्त्रं आहेत हे पाहू या.

अण्वस्त्रसाठ्याच्या बाबतीत अमेरिका आणि रशिया आघाडीवर आहेत.

रशियाकडे सर्वाधिक अण्वस्त्रं

अमेरिकेकडे 6,800 अण्वस्त्रं आहेत. एवढ्या अण्वस्त्रांचा वापर केला, तर पृथ्वी मानवाला राहण्याच्या लायकीची उरणार नाही. अमेरिकेकडची शस्त्रं ब्रिटनकडच्या शस्त्रांपेक्षा 31 पटींनी जास्त आहेत, तर चीनच्या तुलनेत 26 पट जास्त आहेत.

पण अमेरिकेतल्या 'आर्म्स कंट्रोल असोसिएशन'च्या अहवालानुसार, सध्या अण्वस्त्रांच्या बाबतीत रशिया अमेरिकेच्या पुढे आहे. रशियाकडे जवळपास 7,000 अण्वस्त्रं आहेत!

Image copyright AFP
प्रतिमा मथळा अमेरिकेचा लष्करी तळ

अमेरिका आणि रशिया दोन असे देश आहेत की, ज्यांच्याकडे अणुयुद्धाच्या गरजेपेक्षाही जास्त अण्वस्त्रं आहेत. जगातील अशा 15000 शस्त्रांपैकी 90 टक्के शस्त्रं या दोन देशांकडे आहेत. या यादीत 300 अण्वस्त्रांसह फ्रान्स तिसऱ्या क्रमांकावर आहे.

भारतापेक्षा पाकिस्तानकडे जास्त अण्वस्त्रं

भारताकडे 110 अण्वस्त्रं आहेत, तर पाकिस्तानकडे 140 अण्वस्त्रं आहेत. ब्रिटनच्या अण्वस्त्रांची संख्या 215 आहे तर चीनकडे 260 अण्वस्त्रं आहेत. उपलब्ध माहितीनुसार उत्तर कोरियाकडे अण्वस्त्रांची संख्या 10 आहे, तर इस्राईलकडे 80 अण्वस्त्रं आहेत.

2017 साली सर्वाधिक अण्वस्त्रं असलेल्या 9 देशांची नावं आणि त्यांच्याकडील अण्वस्त्रं
देश आवश्यकता वाटल्यास वापरण्यासाठी सज्ज अण्वस्त्रं साठ्यांतील अण्वस्त्रं नष्ट करण्याची गरज असलेली अण्वस्त्रं एकूण अण्वस्त्रं
रशिया 1,796 4,500 2,500 7,000
अमेरिका 1,367 4,000 2,800 6,800
फ्रांस 300 300
चीन 260 260
ब्रिटन 215 215
पाकिस्तान 140 140
भारत 110 110
इस्राईल 80 80
उत्तर कोरिया 10 10

अमेरिकेला राहचं आहे पुढे

2010 मध्ये प्रागमध्ये झालेल्या 'स्ट्रॅटेजिक आर्म्स रिडक्शन करारा'नुसार अमेरिका आणि रशिया यांना 2018 पर्यंत अण्वस्त्रांची संख्या समान करायची आहे. त्यानंतर दोन्ही देशांत 2020 ला नवा करार होईल.

'नाटो' करारानुसार अमेरिकेनं बेल्जियम, जर्मनी, इटली, नेदरलँड आणि तुर्कीमध्ये अण्वस्त्रं तैनात केली आहेत. कॅनडा, ब्रिटन आणि इजिप्तमध्येही अमेरिकेची अण्वस्त्रं होती. ती नंतर हलवण्यात आली. याशिवाय सैनिकी तळ तसंच युद्धनौकांवरही अण्वस्त्र तैनात करण्यात आली आहेत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा 1946 ला अमेरिकेनं नौसेनेच्या जहाजांवर अण्वस्त्रांचा परिणाम अभ्यासण्यासाठी 2 अणुचाचण्या घेतल्या होत्या.

निःशस्त्रीकरणाच्या संदर्भात संयुक्त राष्ट्रांचं मत आहे की, 'या शस्त्रांनी फक्त एक शहरं नष्ट होऊन लाखो लोक मारले जातात असं नाही, तर येणाऱ्या पिढ्या आणि पर्यावरणावरही परिणाम होतो.'

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)