अर्थविकासाच्या वादात जेटलींची सिन्हांवर टीका : 'ते तर 80व्या वर्षीही उमेदवार'

जयंत सिन्हा, यशवंत सिन्हा Image copyright AFP

सिन्हा पितापुत्रांच्या लेखी खडाजंगीत गुरुवारी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी नवी खेळी केली.

यशवंत सिन्हा यांनी विद्यमान अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर एका लेखाद्वारे हल्ला चढवला होता. त्याला उत्तर देत जेटलींनी गुरुवारी सांयकाळी "India@70, Modi@3.5" या पुस्तकाच्या विमोचनाच्या वेळी यशवंत सिन्हांवर टोला लगावला.

ते बोलले, "India@70, Modi@3.5, Applicant @80", अर्थात 'भारताची 70 वर्षं, मोदी सरकारची 3.5 वर्षं, आणि 80व्या वर्षी नोकरीसाठी अर्जकर्ता".

अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री राहिलेले यशवंत सिन्हा यांनी बुधवारी 'इंडियन एक्स्प्रेस'मध्ये एक लेखातून केंद्र सरकारच्या अर्थधोरणांवर जोरदार टीका केली होती.

देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मोदी सरकारच्या धोरणांना जबाबदार ठरवत सिन्हांनी त्याचं खापर जेटलींवर फोडलं.

त्या आधी सिन्हांचे पुत्र आणि मोदी सरकारमधील नागरी विमान वाहतूकमंत्री जयंत सिन्हा यांनीही गुरुवारी या टीकेला उत्तर दिलं होतं.

जेटलींच्या '80व्या वर्षी नोकरीसाठी अर्जकर्ता' या टीकेला उत्तर देत यशवंत सिन्हा म्हणाले, "जर मी नोकरी शोधत असतो तर जेटली तिथं अर्थमंत्री नसते."

Image copyright Kirtish Bhatt

लेखाला लेखातूनच उत्तर

यशवंत सिन्हा यांचे पुत्र आणि विद्यमान मंत्री जयंत सिन्हा यांनी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात New economy for new India - नव्या भारताची नवी अर्थव्यवस्था या शीर्षकाखाली हा लेख लिहिला आहे. या लेखातून त्यांनी टीकेला उत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे.

Image copyright AFP

या लेखात जयंत यांनी लिहिलं आहे की, "खुली, पारदर्शी आणि इनोव्हेशन्सवर आधारित अर्थव्यवस्थेसाठी काही मूलभूत बदल केले आहेत."

बुधवारी 'इंडियन एक्सप्रेस'मध्ये लिहिलेल्या लेखात यशवंत सिन्हांनी लिहिलं होतं की, देशाची अर्थव्यवस्था गर्तेत जाते आहे. भाजपात अनेक लोकांना ही गोष्ट माहिती आहे, पण भीतीपोटी कोणी काही बोलत नाही.

'I need to speak up now' (मला आता बोलायलाच हवं) या लेखात त्यांनी लिहिलं होतं, "देशाच्या अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेची स्थिती बिघडवली आहे. अजूनही मी बोललो नाही तर माझ्या राष्ट्रीय कर्तव्याप्रती अन्याय होईल."

पितापुत्राची जुगलबंदी

यशवंत सिन्हा लिहितात, "आज अर्थव्यवस्थेची काय परिस्थिती आहे? खासगी गुंतवणूक कमी होते आहे. औद्योगिक उत्पादन कमी होतं आहे. सेवा आणि बांधकाम क्षेत्रात मंदी आहे. निर्यात धोक्यात आहे. नोटबंदी असफल झाली आहे. जीएसटीमुळे अनेकांचं नुकसान झालं आहे. नवीन संधीचं कुठेही नाव नाही. प्रत्येक तिमाहीत वाढीचा दर कमी होतांना दिसतो आहे."

Image copyright INDIAN EXPRESS

काँग्रेसने लगेच या परिस्थितीचा फायदा उचलत या भूमिकेची री ओढली आणि भाजप सरकारवर ताशेरे ओढले.

जयंत यांचं प्रत्युत्तर

आता जयंत सिन्हा यांनी या लेखाला प्रत्युत्तर दिलं आहे. ते लिहितात, "भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हानांबाबत भरपूर लेख आले आहेत. दुर्दैवाने त्यात अनेक संकुचित तथ्यांवर निष्कर्ष काढले आहेत. त्याचवेळी अर्थव्यवस्था बदलणाऱ्या मूलभूत सुधारणांकडे दुर्लक्ष केलं आहे.

ते पुढे लिहितात, "एक दोन तिमाहींचे निकाल, आकडेवारीवरून मूलभूत सुधारणांनी होणारे दूरगामी फायदे दिसत नाहीत. नव्या भारताच्या निर्माणासाठी हे आवश्यक आहे. तसंच अरब देशांपेक्षा जास्त कामगारांना संधी द्यायची असेल तर या सुधारणा गरजेच्या आहेत."

यशवंत सिन्हा यांनी नोटबंदीच्या निर्णयावर आणि जीसटी लागू करण्याच्या पद्धतीवर अनेक प्रश्न उभे केले होते. जयंत यांनी त्याला उत्तर दिलं आहे. ते म्हणतात, "जीएसटी, नोटबंदी, डिजिटल पेमेंटमुळे अर्थव्यवस्थेचं चित्र पालटणार आहे."

Image copyright ToI

जयंत यांच्या मते, "कराच्या जाळ्याबाहेरचे व्यवहार आता अधिकृतरित्या होतात. विविध मंत्रालयाची धोरणं आता नियमबद्ध पद्धतीनं ठरतात. नैसर्गिक साधनसंपत्ती आणि परवाने पारदर्शी लिलाव पद्धतीने होतात".

सरकारच्या धोरणांची स्तुती

मोदी सरकारच्या धोरणांची स्तुती करतांना जयंत यांनी 'जन धन- आधार-मोबाईल' (JAM) योजनेची देखील माहिती दिली. तसंच थेट लाभहस्तांतरण योजनेची स्तुती केली. 2018 पर्यंत भारताच्या प्रत्येक गावात कशी वीज येईल याची माहिती दिली.

Image copyright AFP

शेवटी ते लिहितात, "आता प्रत्येक भारतीयाकडे एक बेसिक सेफ्टी नेट असेल ज्यात वीज, रोजगार, हाउसिंग, स्वच्छतागृह, गॅस, विमा संरक्षण, छोटे कर्ज, आणि रस्ते याची शाश्वती असेल".

सोशल मिडीयावर बुधवारी यशवंत सिन्हा ट्रेण्डिंग होत होते. गुरुवारी त्यांची जागा जयंत यांनी घेतली आहे.

काँग्रेसचा पलटवार

जयंत यांच्या लेखावर काँग्रेसने पलटवार करण्याची एकही संधी सोडली नाही. यूपीए सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले पी. चिदंबरम यांनी अनेक ट्विटस केले आहेत. ते म्हणतात, 'टाइम्स ऑफ इंडिया' मधला जयंत सिन्हा यांचा लेख 'पीआयबी'च्या प्रेस रिलीजसारखा वाटतो आहे. प्रशासकीय बदल म्हणजे धोरणात्मक सुधारणा नाहीत.'

Image copyright Twitter
Image copyright Twitter

ते पुढे म्हणतात, "जर जयंत सिन्हा खरं बोलत असतील तर गेल्या पाच तिमाहींमध्ये वाढीचा दर इतका कमी का आहे? ते खरे असतील तर खासगी गुंतवणुकीत वाढ का होत नाही, तसंच क्रेडिट ग्रोथ निगेटिव्ह का आहे?"

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी देखील पितापुत्राच्या वादात हात धुवून घेतले आहे. त्यांनी ट्विट केलं आहे की, "डायनेस्टी इज नॅस्टी. ही काय बकवास आहे? वडिलांनी लिहिलेल्या लेखावर मुलाच्या लेखाचा उतारा द्यावा लागला."

Image copyright Twitter
Image copyright Twitter

इतर लोकसुद्धा जयंत सिन्हांच्या लेखावर प्रतिक्रिया देत आहेत. निहाल अहमद लिहितात, "भारतीय राजकारणातला वंशवाद बघा, आर्थिक मुद्दयावर मुलगा बापावर पलटवार करतो आहे."

सुहेल सेठ लिहितात, "गंमतीशीर आहे सगळं. एक दिवस वडील लिहितात, मग मुलगा दुसऱ्या दिवशी. मुलानं वडिलांना समोरासमोर बोलून समजावलं असतं तर आम्हाला इतकं सगळं वाचावं लागलं नसतं!"

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)