मोरोक्कोतल्या या मशिदीत वीज तयार होते

सोलार सेल पॅनेल Image copyright GERMAN CORPORATION FOR INTERNATIONAL COOPERATION

टाडमामेट हे गाव मोरोक्कोमधील मर्राकेच शहरापासून जवळच आहे. पण हे गाव अतिशय वेगळं आहे. हाय अॅटलास माऊंटनच्या कुशीत वसलेली 400 जणांची ही वसाहत.

बार्ली, बटाटे, सफरचंदाची शेती हे इथल्या लोकांच्या उत्पन्नाचं प्रमुख साधन. अनेक जणांकडे कारदेखील नाही. स्मार्टफोन नाहीत किंवा इंटरनेटही नाही. इतकंच काय हिवाळ्याच्या दिवसात तर या भागात वीजही नसते.

पण आता परिस्थिती बदलली आहे. याचं कारण आहे या गावची मशीद. ही मशीद गावाची ऊर्जेची गरज भागवते. गेल्या वर्षी टाडमामेट हे गाव चर्चेत आलं होतं. सौर ऊर्जेवर चालणारी मोरोक्कोतली पहिली मशीद होण्याचा बहुमान या गावातल्या मशिदीला मिळाला.

या मशिदीच्या छतावर 'फोटोव्होलाइक सोलर पॅनेल' बसवण्यात आले आहेत. केवळ मशीद आणि बाजूला राहणाऱ्या इमामांचं घरचं नव्हे तर गावातील अनेक घरं या मशिदीमुळं उजळतात.

जर्मन सरकारच्या सहकार्यानं मोरोक्कोमध्ये एक प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी जर्मन कॉर्पोरेशन फॉर इंटरनॅशनल को-ऑपरेशनतर्फे केली जात आहे.

"सकारात्मक ऊर्जा असणारी ही मोरोक्कोतली पहिलीच मशीद आहे," असं जर्मन कॉर्पोरेशन फॉर इंटरनॅशनल को-ऑपरेशनचे अधिकारी यान-क्रिस्टोफ कुंट्झ अभिमानानं सांगतात.

51 हजार मशिदींमध्ये राबवला जाणार प्रकल्प

टाडमामेट मशीद अनोखी आहे. तीन वर्षांपूर्वी 'ग्रीन मॉस्क' हा प्रकल्प मोरोक्कन सरकारतर्फे सुरू करण्यात आला होता. या मशिदीप्रमाणेच इतर मशिदीही सौर ऊर्जेवर चालवण्याचा सरकारचा विचार आहे. मोरोक्कोत अंदाजे 51,000 मशिदी आहेत.

Image copyright GERMAN CORPORATION FOR INTERNATIONAL COOPERATION
प्रतिमा मथळा या मशिदीत शाळेतील मुलं अभ्यासाठी येतात.

मशिदीमध्ये सर्वाधिक वीज प्रकाशाव्यवस्थेसाठी वापरली जाते. दैनंदिन वापरासाठी तसंच स्वच्छतेसाठी विजेचा वापर होतो, असं कुंट्झ म्हणतात. मोरक्को हा मुस्लीम देश आहे. त्यामुळं इथं मशिदींना सामाजिक जीवनात महत्त्वाचं स्थान आहे.

ही मशीद गावातील सर्वात मोठी सार्वजनिक वास्तू आहे. गावातील शाळेची सध्या दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळं मशिदीतील जागेत लहान मुलांची शाळा भरते.

"केवळ शाळेच्याच वेळी नव्हे तर मुलं केव्हाही अभ्यासासाठी या ठिकाणी येतात," असं स्थानिक नेते इब्राहिम इब्दस्लाम म्हणतात.

तौली केबिरा या गावच्या रहिवाशी आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी मशिदीसाठी जागा दान केली होती. त्या सांगतात, "अजूनही मला ते दिवस आठवतात जेव्हा लोक मेणबत्तीच्या उजेडात प्रार्थना करत असत."

"वारा आला की मेणबत्त्या विझत असत आणि सगळीकडं अंधार पसरत असे. मशिदीतल्या ऊर्जेवरच गावातल्या रस्त्त्यांवरचे दिवे चालतात. याआधी जेव्हा अंधार पडत असे तेव्हा गावातली सर्व कामं ठप्प होत असत."

Image copyright GERMAN CORPORATION FOR INTERNATIONAL COOPERATION
प्रतिमा मथळा गावकऱ्यांनी मशिदीच्या उभारणीसाठी श्रमदान केलं आहे.

आता परिस्थिती बदलली आहे. सध्या विहिरीतील पाणी हे हातानं काढलं जातं. पण भविष्यात विजेची मोटर बसवून पाणी उपसण्याचा विचार आहे. हा पंप देखील सौर ऊर्जेवर चालेल.

मशिदीमध्ये सोलार वाटर हिटर आहे. तसंच विजेची बचत व्हावी म्हणून एलईडी लाइट बसवण्यात आले आहेत.

गावातल्या घरांमध्ये गरम पाण्याची व्यवस्था नाही. पण मशिदीच्या बाजूला बाथरुम आहेत. त्या ठिकाणी येऊन लोक गरम पाण्यानं आंघोळ करू शकता.

त्यामुळे आत इतर गावातल्या लोकांनाही त्यांच्या घरी सौर ऊर्जेचा वापर करायचा आहे.

सौर ऊर्जेचा वापर करण्याची अनेक गावकऱ्यांची इच्छा आहे. पण सोलार पॅनेल महाग आहेत. त्यामुळं वैयक्तिक वापरासाठी सौर ऊर्जेचा वापर अजून शक्य नाही.

मोरोक्को सरकारनं सुरू केलेल्या ग्रीन मॉस्क मोहीमेमुळं लोकांमध्ये अपांरपरिक ऊर्जेच्या वापराविषयी जनजागृती होत आहे. सोलार पॅनेल बसवण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. पण एकदा का गुंतवणूक केली की नंतर मोठा खर्च येत नाही.

Image copyright GERMAN CORPORATION FOR INTERNATIONAL COOPERATION
प्रतिमा मथळा गावातील अनेक घरांना ही मशीद वीजपुरवठा करते.

या गावात एक जुनी मशीद होती. त्या मशिदीच्या जागी ही नवी मशीद नव्यानं बांधण्यात आली आहे. जुन्या मशिदीच्या विजेचा खर्च सर्व गावातले लोक मिळून देत असत. पण आता काही खर्च होत नाही.

मोरोक्कोला हवामान बदलाची झळ

पॅरीस करारानुसार 2030 पर्यंत मोरक्कोनं 34 टक्क्यांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचं आपलं उद्दिष्ट ठेवलं आहे. गेल्या वर्षी देशातल्या 100 मशिदींमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ग्रीन मॉस्क योजनेची अंमलबजावणी करण्यात आली.

मर्राकेच शहरातील दोन मोठ्या मशिदींचाही यात समावेश आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये देशातील विजेची गरज दुपटीनं वाढली आहे. देशाला लागणारं 97 टक्के तेल, नैसर्गिक वायू आणि कोळसा आयात केला जातो.

मोरोक्कोत वर्षाला 3000 तास सूर्यप्रकाश मिळू शकतो. तसंच जल आणि वायू या पासून ऊर्जा निर्माण करण्यासाठी देखील देशात उत्तम परिस्थिती आहे. 2030 पर्यंत अपारंपरिक ऊर्जेची टक्केवारी 53 टक्क्यांपर्यंत नेण्याचं मोरोक्कोचं उद्दिष्ट आहे.

फक्त गावकऱ्यांना वीजपुरवठा करण्यापर्यंतच ग्रीन मॉस्कचे फायदे मर्यादित नाहीत. जनजागृतीच्या दृष्टीनं देखील या मशिदीचं गावात महत्त्व आहे.

हवामान बदलाच्या झळा या गावालाही सोसाव्या लागत आहेत. गेल्या काही वर्षांपासून मोरोक्कोमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मोरोक्कोमध्ये सध्या सौरउर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

"शेतीसाठी पाण्याचा तुटवडा नेहमी भासतो. आम्ही आधी दर आठवड्याला पाणी देत होतो पण आता आम्ही महिन्यातून एकदाच पीकांना पाणी देतो."

"भविष्यात ही परिस्थिती आणखी भीषण होऊ शकते. पण मशिदीत बसवण्यात आलेल्या नव्या तंत्रज्ञानामुळं मला भविष्याबद्दल आशा निर्माण झाली आहे. अपारंपरिक ऊर्जेचा वापर केल्यास नक्कीच सुधारणा होतील," असं कुंट्झ म्हणतात.

जनजागृती करण्याच्या दृष्टीनं देखील ही योजना महत्त्वपूर्ण आहे. लोकांना प्रेझेंटेशन देणे, कार्यशाळा घेणं या कामांसाठी मशिदींचा वापर केला जात आहे.

इमाम आणि धार्मिक नेते अपारंपरिक ऊर्जेचं महत्त्व पटवून देतात. मूल्यशिक्षण आणि ऊर्जेचा स्वच्छ स्रोत वापरणं या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे शिकवता येतात असं ते म्हणतात.

अपारंपरिक ऊर्जेच्या स्रोतांचा वापर घरात देखील करायला हवा असं कुंट्झ म्हणतात. नव्या ऊर्जेच्या स्रोतांचा वापर केल्यामुळं नवे रोजगारही निर्माण होऊ शकतात.

ग्रीन मॉस्क प्रकल्प यशस्वी होण्यासाठी अनेक जण झटत आहेत. सौर पॅनेल कसे बसवायचे आणि त्यांची निगा कशी राखायची हे सर्वजण शिकत आहेत.

टाडमामेटमधल्या लोकांना काही नवी कौशल्यं देखील शिकायला मिळाली आहेत. कारण ही मशीद गावकऱ्यांनीच बांधली आहे.

गावातील बहुसंख्य घरं दगड आणि काँक्रिटची बनली आहेत. पण मशिदीसाठी मातीच्या विटा वापरण्यात आल्या आहेत. या विटांमुळे उन्हाळा आणि हिवाळा दोन्ही ऋतुंमध्ये इमारतीचं तापमान संतुलित राहतं.

ही मशीद बांधण्यासाठी ओवाफदी यांनी श्रमदान केलं. "बांधकामासंदर्भात नव्या तंत्रज्ञानाची चर्चा मी नेहमी ऐकली होती. पण, यावर काम करण्याची संधी पहिल्यांदाच मिळाली." हा एक पूर्णपणे नवा अनुभव होता असं ओवाफदी यांनी म्हटलं.

या मशिदीच्या बांधकामासाठी श्रमदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. हे प्रमाणपत्र नोकरी शोधणं सोपं जाईल असं श्रमदात्यांच म्हणण आहे.

तुम्हा हा व्हीडिओ पाहिला का ?

पाहा व्हीडिओ : मोदी आणि राहुलसोबत 'दिल की बात'

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)