पूर्ण चेहरा झाकणाऱ्या नकाबवर ऑस्ट्रियामध्ये बंदी

फोटो स्रोत, Getty Images
ऑस्ट्रियात महिलांना नकाब परिधान करण्यावर बंदी घालणारा कायदा लागू करण्यात आला आहे.
ऑस्ट्रियात महिलांना सार्वजनिक ठिकाणी पूर्णतः चेहरा झाकणारा नकाब परिधान करणं आता अशक्य ठरणार आहे.
नकाब बंदी घालणारा कायदा रविवारी ऑस्ट्रियाच्या संसदेत मंजूर झाला आहे.
तिथल्या सरकारनं सामाजिक मूल्यांचा हवाला देत स्पष्ट केलं की, नव्या कायद्यानुसार महिलांना त्यांचा चेहरा कोणत्याही परिस्थितीत झाकता येणार नाही.
या महिना अखेरीस ऑस्ट्रियात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांना डोळ्या समोर ठेऊन हा कायदा मंजूर केल्याचं बोललं जात आहे.
हा कायदा मंजूर झाल्यानं याचा फायदा निवडणुकीत उजव्या विचारसरणीच्या फ्रीडम पार्टीला होईल अशीही चर्चा आहे.
फोटो स्रोत, Getty Images
मुस्लीम समजानं मात्र या कायद्याला विरोध केला आहे.
मुस्लीमांकडून कायद्याची निंदा
मात्र, ऑस्ट्रियातील मुस्लीम समाजानं या कायद्याची निंदा केली आहे. इथल्या मुस्लीमांमधील एक छोटासा गटच पूर्ण चेहरा झाकणारा नकाब परिधान करतो.
त्यांच्यावर या कायद्यामुळे अन्याय होईल अशी त्यांची धारणा झाली आहे.
या कायद्यामुळे केवळ मुसलमानानांच नव्हे तर मेडिकल फेस मास्क लावणारे, जोकर सारखा मेकअप करणारे अशा सर्वांनाच बंदीचा सामना करावा लागणार आहे.
एका अहवालानुसार, ऑस्ट्रियात फक्त १५० महिलाच पूर्ण चेहरा झाकणारा नकाब परिधान करतात.
नकाब
युरोपात ठिकठिकाणी बंदी
परंतु, या कायद्यामुळे ऑस्ट्रियाच्या पर्यटन विभागासमोर मोठी समस्याच उद्भवली आहे.
कारण यामुळे आखाती देशातील महिला पर्यटकांच्या संख्येत घट होण्याची चिंता पर्यटन विभागाला वाटते आहे.
फ्रान्स आणि बेल्जियमनं २०११ मध्ये बुरखा परिधान करण्यावर बंदी घातली होती. तसंच आता नेदरलँडच्या संसदेतही अशीच पावलं उचलली जात आहे.
जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल या सुद्धा पूर्ण चेहरा झाकणाऱ्या नकाबवर बंदी घालण्यासाठी आग्रही आहेत. कायद्याच्या कक्षेत राहून नकाबवर बंदी घालावी असं त्यांचं मत आहे.
मात्र ब्रिटनमध्ये नकाब किंवा बुरख्यावर कोणतीही बंदी अद्याप घालण्यात आलेली नाही.
बुरखा
नकाब आणि बुरख्यात फरक
नकाब परिधान केल्यावर डोळे आणि त्यांच्या आजू-बाजूचा चेहरा दिसतो. पण यावर जाळीदार स्कार्फ देखील घालता येतो.
बुरखा हा संपू्र्ण पोशाख असून त्यात शरिरातला कोणताही भाग दिसत नाही. बुरख्यात चेहरा पूर्णतः झाकलेल्या अवस्थेत असतो.
यात डोळ्यांपुढे एक हलकासा पातळ पडदा असतो ज्यातून समोरचे सगळे दिसू शकतं.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)