फ्रान्स : 'इस्लामिक स्टेट'च्या चाकू हल्ल्यात 2 महिलांचा मृत्यू

हल्ला झाला ते स्थळ Image copyright Reuters
प्रतिमा मथळा फ्रान्समधील या हल्ल्यात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.

फ्रान्सच्या मार्सेल्स शहरात झालेल्या चाकू-हल्ल्यात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.

सेंट चार्ल्स स्टेशनवर झालेल्या या घटनेनंतर सुरक्षारक्षकांनी हल्लेखोराला ठार केलं आहे, ज्याचं वर्णन पोलिसांनी 'उत्तर आफ्रिकन दिसणारा, जवळपास 30 वर्षांचा', असं केलं.

"हल्लेखोर 'अल्लाह-हू-अकबर' असं ओरडत होता," असं फ्रांसच्या एका अधिकाऱ्यानं ले मोंड या वर्तमानपत्राला सांगितलं आहे. फ्रान्सच्या प्रसार माध्यमांनी या घटनेला 'दहशतवादी हल्ला' म्हणून केलं आहे.

कथित इस्लामिक स्टेटने तो हल्लेखोर आपला एक 'जवान' असल्याचं म्हटलं आहे.

स्थानिक पोलीस प्रमुख ओलिवर डे मेजियर्स यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "हल्लेखारानं चाकू भोसकून दोन जणांना ठार केलं आहे."

फ्रान्सचे गृहमंत्री गेराड कोलांब यांनी पत्रकारांना सांगितलं की हल्लेखोर पहिल्यांदा चाकू भोसकून पळून गेला होतो, पण दुसरा हल्ला करायला थोड्या वेळानं परतला.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा सेंट चार्ल्स स्टेशनवर हा हल्ला झाला

"हल्ल्यानंतर घटनास्थळाची परिस्थिती नियंत्रणात आहे आणि हल्लेखाराला ठार करण्यात आलं आहे." असं फ्रान्सच्या राष्ट्रीय पोलिसांनी ट्विटरवरून जाहीर केलं आहे.

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुअल मॅक्रॉन यांनी या "क्रूर हल्ल्या"चा निषेध केला. तसंच त्वरित प्रतिसाद देणाऱ्या पोलिसांची प्रशंसाही केली.

दरम्यान, दक्षता म्हणून स्थानिक रेल्वेसेवा बंद करण्यात आली आहे. पोलिसांनी काही वेळापूर्वी लोकांना या जागेवर येण्यास मनाई केली होती.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)