येमेनहून परतले फादर टॉम : 'माझ्या अपहरणाचा व्हिडीओ बनावट होता'

फादर टॉम Image copyright AFP
प्रतिमा मथळा वृद्धाश्रमात काम करतांना फादर टॉम यांचं अपहरण करण्यात आलं.

येमेनच्या एका वृद्धाश्रमात काम करत असताना भारतीय धर्मगुरू फादर टॉम यांचं मार्च 2016 मध्ये अपहरण झालं होतं. अनेक प्रयत्नांनंतर त्यांची सुटका करण्यात आली आणि अखेर भारतात सुखरूप परतले.

बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की अपहरणकर्त्यांनी त्यांना चांगली वागणूक दिली, पण ते कोण होते हे मात्र त्यांना कळलं नाही.

"त्यांनी शेवटपर्यंत आपली ओळख दाखवली नाही. मला अरेबिक कळत नाही आणि त्यांच्यातला एक व्यक्ती मोडक्यातोडक्या इंग्रजीत बोलत होता," असं फादर टॉम बीबीसी हिंदीशी बोलतांना सांगत होते.

त्यांच्या मारहाणीचा व्हीडिओ सुद्धा बनावट असल्याचं त्यांनी सांगितलं.

सौदी अरेबियात बदलाचं वारं वाहत आहे का?

येमेनमध्ये नागरी युदध सुरू झाल्यापासून अनेक विदेशी नागरिकांचं अपहरण करण्यात आलं आहे.

जिहादी उग्रवाद्यांनी अदेन येथील सामाजिक संस्थेवर हल्ला करून या 58 वर्षीय धर्मगुरुंचं अपहरण केलं होतं. या हल्ल्यात 16 लोकांची हत्याही करण्यात आली होती. त्यात मदर तेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटी संस्थेच्या चार कॅथलिक नन्सचा समावेश होता.

बीबीसी हिंदीच्या इम्रान कुरेशीशी बोलतांना ते म्हणाले, "त्यावेळेला नक्की काय झालं मला काहीच कळलं नाही. कारण मी जसा इमारतीच्या बाहेर आलो, एका माणसानं माझा हात धरला. मी त्यांना सांगितलं की मी भारतीय आहे."

ते म्हणाले की अपहरकर्ते त्यांना कुठे घेऊन गेले माहित नाही. पण त्यांनी फादरला जेवण आणि औषधं दिली आणि सांगितलं की तुम्ही सुरक्षित आहात.

मध्यंतरी एका व्हीडिओत त्यांना मारहाण होत आहे आणि ते मदतीसाठी याचना करत आहेत, असं दाखवलं होतं.

हा संपूर्ण प्रकार बनावट असल्याचं त्यांनी सांगितलं.

ते म्हणाले, "त्यांनी एक व्हीडिओ तयार केला, ज्यात ते मला मारहाण करत असल्याचा बनाव करत होते. त्यांनी मला शांत राहण्यास सांगितलं. हे फक्त प्रतिक्रिया मिळवण्यासाठी करत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी मला तशी मारहाण केली नाही. मला वाटतं त्यांना पैसै हवे होते."

फादर टॉम 1989 साली सलेशियन संस्थेत सहभागी झाले. येमेनला जाण्याआधी त्यांनी भारतात अनेक ठिकाणी काम केलं.

येमेनमध्ये युद्ध सुरू असताना त्यांनी भारतात येण्यास नकार दिला. ओमान सरकारानेही त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)