सरकार अडचणीत आलं तर अनेक ठिकाणहून अदृश्य हात मदतीला येतील - फडणवीस
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

सरकार अडचणीत आलं तर अनेक ठिकाणहून अदृश्य हात मदतीला येतील - फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात गुप्त बैठक झाल्याच्या बातम्या अनेक वृत्तपत्रांनी दिल्या आहेत. राणे कॅबिनेटमध्ये आले आणि शिवसेनेने पाठिंबा काढला, तर संभाव्य परिस्थितीबद्दल त्यांची चर्चा केल्याचं या बातम्यांमध्ये म्हटलं आहे.

बीबीसी मराठीशी काही दिवसांपूर्वी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की, "माझं सरकार अडचणीत आलं तर अनेक ठिकाणचे अदृश्य हात मदतीला येतील आणि सरकार वाचवतील." माझं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल आणि मीच मुख्ममंत्री राहीन, असंही ते म्हणाले.

शिवसेनेसोबत तुमचं रिलेशनशिप स्टेटस काय आहे, असं विचारल्यावर ते म्हणाले की सध्या तरी आम्ही 'मॅरिड' आहोत. शिवसेनेच्या आरोपांवर उत्तर द्यायचं टाळत ते म्हणाले की काही जणांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात.

राष्ट्रवादी NDAमध्ये येण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नाही, असं स्पष्ट करतानाच ते हे सांगयला विसरले नाहीत की राजकारणात काहीही अशक्य नसतं.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मुलाखतीतले ठळक मुद्दे:

 • नारायण राणेंनी जर तयारी दर्शविली आणि नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व मान्य केलं, तर त्यांना नक्कीच एनडीएमध्ये सामाविष्ट करून घेण्यात येईल.
 • एल्फिन्स्टन रोड स्थानकात झालेल्या दुर्दैवी घटनेची जबाबदारी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी स्वीकारली आहे.
 • बुलेट ट्रेनचा फायदा महाराष्ट्रालाही होणार.
 • (राज ठाकरेंचं नाव न घेता) ज्यांचं राजकीय अस्तित्व हरपलं आहे, ते राजकीय अस्तित्व शोधण्यासाठी अशा घोषणा करत आहेत. तो त्यांच्या राजकारणाचा भाग आहे.
 • बुलेट ट्रेनबाबत बोलण्याआधी त्यांनी अभ्यास या संपूर्ण प्रकल्पाचा अभ्यास करावा.
 • शिवसेना आमच्यासोबत सरकारमध्ये आहे, त्यामुळे आम्ही 'मॅरिड' आहोतच. आमचा घटस्फोट झालेला नाही.
 • (शिवसेनेच्या टीकेबद्दल) प्रत्येकाचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळ असतात.
 • हे सरकार पाच वर्षे चालणार आहे आणि पाच वर्ष माझ्या मुख्यमंत्रिपदाला धोका नाही.
 • सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य हात आहेत. ते कोणाचे आहेत हे योग्य वेळी सांगू.
 • ज्या वेळी या हातांची गरज लागेल ते तेव्हा बाहेर येतील आणि ते तुम्ही विचारही करू शकणार नाही अशा लोकांचे असतील.
 • एनडीएमध्ये सहभागी होण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आम्हांला मिळालेला नाही. त्यांच्या सहभागाची कोणतीही शक्यता सध्या नसली तरी ही शक्यता नाकारताही येत नाही.
 • दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आहोत. शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करताना अडचणी आल्या ही गोष्ट खरी आहे. अण्णा हजारे
 • अण्णा हजारे यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. त्यांच्यात आणि नरेंद्र मोदींमध्ये संवादाचा अभाव असेल, तर तो भरून काढेन. त्यांच्याशी चर्चा करेन.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)