लास वेगास : हल्लेखोर स्टीफनचे वडील होते एफबीआयच्या मोस्ट वाँटेड लिस्टमध्ये

संशयित हल्लेखोर स्टीफन पॅडक Image copyright CBS NEWS
प्रतिमा मथळा संशयित हल्लेखोर स्टीफन पॅडक

अमेरिकेच्या लास वेगासमध्ये काल झालेल्या गोळीबारात मृतांची संख्या 59 च्या वर पोचली आहे. संशयित हल्लेखोर स्टीफन पॅडक यानं हा हल्ला नेमका का केला याचा सध्या तपास सुरू आहे.

अमेरिकेच्या लास वेगासमध्ये गोळीबार करणारा संशयित स्टीफन पॅडक (वय 64) हा मेस्कॉईट येथील रहिवासी होता. मंडाले बे हॉटेलच्या 32 व्या मजल्यावरच्या खोलीत तो 28 सप्टेंबरपासून राहात होता. याच खोलीत पोलिसांना 16 रायफल आढळून आल्या आहेत.

लास वेगासचे शेरिफ जोसेफ लोंबार्डो यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले, "पोलीस संशियाताच्या खोलीबाहेर पोहोचले होते, त्यावेळी त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली."

Image copyright Getty Images

स्टीफन यानं मंडाले बे हॉटेलच्या 32 व्या मजल्यावरून गोळीबार केला. यात 59 ठार तर 500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

या हल्ल्यानंतर पोलीस त्याच्यापर्यंत पोचायच्या आतच स्टीफननं स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

स्टीफन याच्याकडं पायलट लायसन्स आहे. शिवाय शिकारीचा परवानाही त्यानं घेतलेला होता. त्याची अन्य काही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

मात्र त्याच्या शेजाऱ्यानं सांगितलं की, तो पक्का व्यवसायिक जुगारी होता आणि त्याचं वागणं विचित्र असायचं.

अकाउंटंटच्या घरी शस्त्रास्त्र

पॅडक हा पूर्वाश्रमीचा अकाउंटंट आहे. तो आधीच मानसिक समस्यांनी ग्रस्त असावा, असं अमेरिकन अधिकाऱ्यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितलं.

नंतर उशीरा पोलिसांनी मेस्कॉईट येथील त्याच्या घराची झडती घेतली असता तिथंही 18 शस्त्रे आणि हजारो बंदुकीच्या गोळ्या सापडल्या. तर घराच्या परिसरात आणि कारमध्ये स्फोटकंही सापडली.

Image copyright CBS NEWS
प्रतिमा मथळा स्टीफन पॅडक

शेरिफ जोसेफ लोंबार्डो यांनी असंही सांगितलं की, अधिकाऱ्यांना तिथं इलेक्ट्रॉनिक उपकरणासारखंही काहीतरी सापडलं.

'न्यू फ्रंटियर आर्मी'चे डेव्हिड फॅमिग्लायटी यांनी बीबीसीला सांगितलं की, लास वेगासच्या उत्तरेला त्याच्या दुकानातून पॅडकनं काही महिन्यांपूर्वी शस्त्रं खरेदी केली होती. त्यासाठीच्या आवश्यक परवानग्या त्यानं सादर केल्या होत्या.

लास वेगासमधील व्हीडिओ बघितल्यावर शस्त्रांमध्ये काही विशिष्ट बदल केल्याशिवाय हे करणं शक्य नाही, असं फॅमिग्लायटी यांनी सांगितलं.

दहशतवाद्यांशी संबंध नाहीत

स्टीफन पॅडक याचे कुठल्याही परकीय दहशतवादी संटनेचे संबंध असल्याचं आम्हाला आढळून आलेलं नाही, असं एफबीआयनं सांगितलं. तथाकथित इस्लामिक स्टेट या हल्ल्यामागे असल्याचं बोललं जात असताना एफीबीआयननं हे स्पष्टीकरण दिलं आहे.

वडील एफबीआयसाठी मोस्ट वाँटेड

संशयिताचा भाऊ एरिक पॅडक यानं पत्रकारांना सांगितलं की, "त्यांचे वडील हे बॅंकेवर दरोडा घालणारे लुटारू होते. आणि एफबीआयचे मोस्ट वाँटेडच्या यादीत त्यांचं नाव होतं. एकदा ते तुरुंगातून फरारही झाले होते."

कायदा अंमलबजावणी विभागानं 1969 ला काढलेल्या पोस्टरप्रमाणं पॅट्रीक बेंजामिन पॅडक याचं मानसिक रुग्ण म्हणून निदान झालं असल्याचं त्यात म्हटलं होतं.

प्रतिमा मथळा एरीक पॅडक

ओरलँडो इथं स्टीफनच्या भावाचं - एरिक पॅडक याचं स्वतःचं घर आहे. त्यानं सांगितलं की, "या घटनेमुळं त्यांच्या कुटुंबाला धक्का बसला आहे."

"त्यानं हे का केलं यामागं कारण कायं आम्हाला माहित नाही", असं त्याचा भाऊ एरिक म्हणाला.

"त्याला पोकर खेळण्याचा नाद होता. तो जहाजांमधून सफरी करायचा आणि टॅको बेलमध्ये बरितोज खायला त्याला आवडायचं", असंही त्याच्या भावानं सांगितलं.

"त्याला बंदुकांचा किंवा कुठलाही नाद नव्हता किंवा आमची सैन्याची पार्श्वभूमीही नव्हती." असंही त्याच्या भावानं पत्रकारांना सांगितलं.

एनबीसी न्यूजच्या रिर्पोटनुसार, स्टीफन पॅडक यांना अलिकडच्या काळात जुगारात अनेक व्यवहार केले होते. पण त्यात तो जिंकला की हारला होता हे अद्याप स्पष्ट नाही.

संशयिताचा दुसरा भाऊ ब्रुस पॅडक यानं सांगितलं की, स्टीफन हा मोठा गुंतवणूकदार होता.

पॅडक यानं याआधी वाहतूकीचे नियम मोडल्याचं समोर आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मैत्रीण देशाबाहेर

जून 2016 मध्ये पॅडक हा रेनो, नेवाडा इथून मेस्कॉईट इथल्या दुमजली घरात शिफ्ट झाला होता.

रेकॉर्डनुसार तो इथं त्याची 62 वर्षीय मैत्रीण मॅरीलू डॅनलेसोबत राहत होता.

Image copyright Police Handout
प्रतिमा मथळा स्टीफनची मैत्रीण मॅरीलू डॅनली

तपास यंत्रणेनं मॅरीलूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ती अमेरिकेबाहेर असल्याचं समजतं. शेरिफ लोंबार्डो यांच्या माहितीनुसार ती जपानमध्ये आहे.

हॉटेल चेकइनमध्ये ती स्टीफनसोबत नसल्याचं आढळून आलं आहे.

पॅडकचा पूर्वीचा शेजारी डायने मॅके (वय 79) यांनी सांगितलं की, स्टीफन आणि त्याची मैत्रीण फारसे घराबाहे पडत नसत. ते नेहमी घरात स्वतःला बंद करून घ्यायचे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Related Topics