स्वतंत्र कॅटलोनिया स्वयंपूर्ण होईल का?

स्पेन, कॅटलोनिया Image copyright LLUIS GENE/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा कॅटलोनियाच्या स्वातंत्र्यासाठी निदर्शनं

येत्या सोमवारी होणाऱ्या कॅटलन संसदेचं अधिवेशन स्पेनच्या न्यायालयानं स्थगित केलं आहे. कॅटलोनियाच्या स्वातंत्र्याला बळ मिळू नये, या उद्देशाने न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

पण आता कॅटलोनियाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळेल का? आणि जर मिळालं तर कॅटलोनियाची पुढची वाटचाल कशी असेल?

कॅटलोनिया प्रांत स्पेनपासून स्वतंत्र झाल्याचं काही दिवसांत जाहीर करण्यात येईल, असं या प्रांताचे नेते कार्ल्स पुजडिमाँ यांनी सांगितलं.

स्पेनपासून विलग व्हायचं की नाही, यावर घेण्यात आलेल्या जनमतानंतरच्या पहिल्याच मुलाखतीत पुजडिमाँ यांनी 'या आठवड्यात या प्रक्रियेला सुरुवात होईल', असं सांगितलं.

जनमत चाचणीच्या संयोजकांनी मला कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवलं, अशी नाराजी स्पेनचे राजे किंग फिलीप सहावे यांनी व्यक्त केली आहे. स्पेनमधली परिस्थिती अत्यंत गंभीर असून सगळ्यांनी एकत्रित येण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

जनमत चाचणीनंतर उद्भवलेल्या हिंसाचारामुळे स्पेन आणि कॅटलोनिया यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत.

कॅटलोनिया प्रांत स्वतंत्र झाल्यास काय होऊ शकतं?

एखाद्या देशाकडे ज्या गोष्टी, सोयीसुविधा, यंत्रणा असतात त्यापैकी बहुतांशी गोष्टी कॅटलोनियाकडे आहेत, असं तटस्थ पाहणाऱ्याला वाटू शकतं.

कॅटलोनियाकडे तसा स्वत:चा झेंडा आहे, संसद आहे, कार्ल्स पुजडिमाँ यांच्या रूपात नेता आहे. त्यांचं स्वत:चं 'मोसॉस डी इस्क्वॅड्रा' नावाचं पोलीस दलही आहे.

कॅटलोनियाची स्वत:ची वृत्तवाहिनी आहे. व्यापार आणि गुंतवणुका यांना चालना देणारे कॅटलोनियाचे मिनी दूतावास परदेशात कार्यरत आहेत.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
स्पेनपासून वेगळं होण्यासाठी कॅटलोनियामध्ये सार्वमत

कॅटलोनियातर्फे शाळा चालवल्या जातात आणि आरोग्यसेवाही पुरवल्या जातात.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणखी अनेक गोष्टी निर्माण कराव्या लागतील. नव्याने निर्माण झालेल्या देशाच्या सीमेचं रक्षण करावं लागेल. आयात-निर्यातीकडे लक्ष द्यावं लागेल. जगभरातल्या देशांशी संबंध प्रस्थापित करावे लागतील.

संरक्षणासाठी लष्कराचा ताफा सज्ज ठेवावा लागेल. एक सरकारी बँक उभारावी लागेल. सरकारचे उत्पनाचे स्त्रोत निश्चित करावे लागतील. विमान वाहतुकीसाठी एअर ट्रॅफिक कंट्रोलची निर्मिती करावी लागेल.

सध्या हे सगळं माद्रिदच्या नियंत्रणात आहे.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा कॅटलोनियाकडे स्वत:चं पोलीस दल आहे.

स्वातंत्र्यानंतर नव्या यंत्रणा स्थापन केल्या जातील. पण त्या स्वयंपूर्ण असतील?

आनंदी होण्यामागचं कारण

'माद्रिद आम्हाला लुटतं आहे'- कॅटलोनिया स्वतंत्र व्हावं ही मागणी रेटणाऱ्या फुटीरतावाद्यांचं हे लोकप्रिय घोषवाक्य आहे.

स्पेनच्या विकासात तुलनेनं सधन प्रांत असलेल्या कॅटलोनियाचा कराच्या रुपात मोठा वाटा आहे.

स्पेनमधल्या अन्य राज्यांच्या तुलनेत कॅटलोनिया सुबत्ता असलेला प्रांत आहे. स्पेनच्या लोकसंख्येपैकी फक्त 16 टक्के कॅटलोनिया प्रांताची आहे, पण स्पेनच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात कॅटलोनियाचा वाटा 19 टक्के एवढा आहे. स्पेनच्या निर्यातीच्या एक चतुर्थांश हिस्सा कॅटलोनियाचा आहे.

कॅटलोनिया स्पेनमधील पर्यटनाचं मुख्य केंद्र आहे. 75 दशलक्ष पैकी 18 दशलक्ष पर्यटक कॅटलोनियाला पसंती देतात. युरोपातली सगळ्यात मोठी केमिकल फॅक्टरी कॅटलोनियामधील तारागोना याठिकाणी आहे.

कॅटलोनियातल्या बार्सिलोनाचा युरोपियन युनियन समूहातल्या अव्वल वीस बंदरांमध्ये समावेश होतो.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
कॅटलोनियामध्ये सार्वमतादरम्यान नेमकं काय घडलं?

प्रांताच्या एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश जनतेनं किमान शिक्षण पूर्ण केलं आहे.

या प्रांतावर होणाऱ्या खर्चापेक्षा कॅटलोनियातले रहिवासी जास्त प्रमाणात कर भरतात. 2014 मध्ये कॅटलोनियाच्या रहिवाशांनी 10 अब्ज युरो रक्कम कर म्हणून भरली.

स्पेन सरकारने या भागासाठी यापेक्षा कमी पैसा खर्च केला आहे. स्वतंत्र कॅटलोनियाला याची भरपाई मिळेल का?

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कॅटलोनियाला कर सवलती मिळतील, असं गृहीत धरलं. तरी हे पैसे नव्या देशासाठीच्या यंत्रणा उभारण्यात खर्च होतील.

नव्या देशासाठी कठीण समीकरण

कर्जाचा डोंगर कॅटलोनियासाठी सगळ्यात मोठी अडचण आहे. कॅटलोनिया स्पेन सरकारला 52 अब्ज युरोचं कर्ज देणं लागतं.

आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीर स्पेन सरकारने 2012 मध्ये विशेष निधी पुरवठ्याची व्यवस्था केली होती. 67 अब्ज युरोसह कॅटलोनिया या योजनेचा सगळ्यात मोठं लाभार्थी राज्य होतं.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा स्वतंत्र झाल्यानंतर कॅटलोनियासाठी वाटचाल सोपी असणार नाही.

स्वतंत्र राष्ट्र झाल्यानंतर कॅटलोनियाला हा अर्थपुरवठा होणार नाही. या व्यतिरिक्त त्यांच्या डोक्यावरील कर्जात वाढ होणार आहे.

हे सगळं लक्षात घेता कॅटलोनिया स्पेन सरकारशी वाटाघाटी करण्याची शक्यता आहे. बार्सिलोना भाग असलेल्या कॅटोलनियाने माद्रिदच्या वाट्याचा कर्जाचा भार उचलावा, अशी अपेक्षा आहे.

कॅटलोनियाला स्वातंत्र्य कळीचं का?

स्पेनपासून विलग होत स्वतंत्र राष्ट्र म्हणून कॅटलोनियाची निर्मित्ती विविधागांनी महत्त्वाचं आहे.

स्पेनपासून वेगळं झाल्यानंतर कॅटलोनियाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसणार आहे. स्वतंत्र झाल्यानंतर कॅटलोनिया युरोपियन युनियन समूहाचा भाग असणार का, यावर त्यांची आर्थिक ताकद स्पष्ट होईल.

कॅटलोनियाची दोन तृतीयांश निर्यात युरोपियन युनियन देशांमध्ये होते. स्पेनपासून विभक्त झाल्यानंतर कॅटलोनियाला सदयस्तावासाठी युरोपियन युनियनकडे नव्याने अर्ज दाखल करावा लागेल.

युनियनचं सदस्य होण्यासाठी कॅटलोनियाला अन्य सदस्यांची मंजुरी घ्यावी लागेल. नॉर्वेच्या धर्तीवर कॅटलोनिया युरोपियन युनियनचा भाग न होता 'सिंगल मार्केट मेंबरशिप'साठी अर्ज करण्याची शक्यता आहे.

तसं झालं तर युनियनचा भाग असलेल्या देशांमध्ये कॅटलोनियाच्या नागरिकांना मुक्त व्यापार करता येईल. यासाठी त्यांना ठराविक शुल्क भरावे लागेल. मात्र कॅटलोनियाच्या नागरिकांना हा फायद्याचा सौदा असेल.

मात्र स्पेन या प्रक्रियेत अडथळा आणू शकतं. तसं झालं तर कॅटलोनियासाठी वाटचाल खडतर असेल.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)