पाकिस्तान : हिंदू धर्मांतर करून शीख का होत आहेत?

कृष्ण सिंग
प्रतिमा मथळा कृष्ण सिंग

गुरू ग्रंथ साहिब यांच्या पालखीसमोर कृष्ण सिंग तल्लीन होऊन चिमटा वाजवत आणि ढोलावर थाप मारत होते. समोर अंदाजे डझनभर लोक 'सतनाम वाहे गुरू'चा जप करत होते.

काळी पगडी घातलेले कृष्ण सिंग खरं तर अगोदर श्रीरामाचे भक्त होते, पण काही वर्षांपूर्वी त्यांनी शीख धर्म स्वीकारला.

कराचीच्या उपनगरांलगतचं त्यांचं गाव पूर्वी हिंदूबहुल होतं. आता इथे जवळजवळ 40 शीख परिवार राहात आहेत. यांनीही कृष्ण सिंग यांच्याप्रमाणे हिंदू धर्म सोडून शीख धर्म स्वीकारला आहे.

हे सर्व लोक बागडी जातीचे आहेत. इथे वर्षानुवर्षं कलिंगडाची शेती व्हायची. हे लोक कलिंगड पिकवण्यात आघाडीवर होते. पण पाण्याच्या टंचाईमुळे लोक हळूहळू शहारांकडे वळत आहेत.

कृष्ण सिंग यांचे चार भाऊ, दोन मुलं आणि दोन भाच्यांनी शीख धर्म स्वीकारला आहे. ते सांगतात, "शिखांना सरदार म्हटलं जातं. हिंदू असताना आम्ही सर्वसामान्य होतो. तेव्हा असा काही मान मिळत नव्हता."

'या बसा जेवण करा सरदार'

"शहरात फिरताना हातात लस्सीचा ग्लास घेऊन या सरदार जेवायला, असं कितीतरी लोक प्रेमानं बोलावतात. कदाचित यामुळेच आम्ही शीख झालो." असं कृष्ण सिंग सांगतात.

या हिंदूबहुल गावात एक मोठा गुरुद्वारा बांधला जात आहे. त्याला पाकिस्तान आणि बाहेरच्या देशातल्या शीख समुदायाकडूनही आर्थिक मदत मिळते आहे. या गुरुद्वारात पाचशेपेक्षा जास्त लोकांना बसण्याची सुविधा आहे. त्याचबरोबर गावात दोन छोटी मंदिरंही आहेत.

या गुरुद्वाराचे पहारेकरी दुरू सिंग सांगतात, "हिंदू समुदायाचे लोक मोठ्या प्रमाणात 'नानकाना साहिब' गुरुद्वाराला आवर्जून जातात. त्याचबरोबर लंडन, फ्रान्स, अमेरिका आणि इतर देशांतून येणाऱ्या शीख लोकांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळेही हिंदू लोक शीख धर्माला आपलंस करत आहेत."

पूर्वी हिंदू देव-देवतांच्या मूर्तींवर आसपासच्या गावांतील लोकांकडून दगडफेक होत असे. पण आता असे प्रकार बंद झाले आहेत.

दुरू सिंग यांच्या मते, हा बदल गुरुद्वारा उभारल्याचा परिणाम आहे. गेल्या वर्षी गुरू गोविंद सिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त शीख समुदायाच्या रक्षणासाठी चार पोलीस आणि दोन रेंजर तैनात केले आहेत.

कराची शहराच्या अगदी मध्यभागामध्ये 'आरामबाग गुरुद्वारा' आहे. हा गुरुद्वारा 24 वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर उघडण्यात आला.

Image copyright Getty Images

पाकिस्तान निर्मितीच्या अगोदर या गुरुद्वाराबरोबरच कराची शहरात आणखी अर्धा डझन गुरुद्वारा होते. पण फाळणीनंतर शीख समुदाय मोठ्या प्रमाणावर भारतात निघून गेला आणि यातील काही गुरुद्वारा बंद पडले तर काही ठिकाणी लोकांनी त्यांच्या जागांवर कब्जा केला. पण आता परिस्थिती बदलत आहे.

काही शीख नेत्यांचं मत आहे की, जुने गुरुद्वारा परत उघडले आणि धार्मिक स्वातंत्र्य दिलं तर शीखांची लोकसंख्या भराभर वाढू शकते.

हिंदू लोक एक ग्लास पाणीही देत नसत

पेशाने वकील असणारे सरदार हीरा सिंग यांचा दावा आहे की, आत्तापर्यंत अकराशे लोकांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली शीख धर्म स्वीकारला आहे.

ते म्हणतात, " मी त्यांना गुरुद्वारामध्ये बोलावतो. गुरू ग्रंथ साहिबचा अनुवाद करुन सांगतो. त्यांचा उपदेश पटवून सांगतो. एखादी गोष्ट त्यांना पटली तर ते त्यावर विश्वास ठेवतात. असं करत करत इथं 1100 लोक सरदार झाले आहेत."

"ही इथे येणारी सगळी गरीब लोकं आहेत. कुणी यांना विचारतही नाही आणि इतर हिंदू लोक यांना ग्लासभर पाणीही देत नसत."

सिंध प्रांतातील हिंदू समुदायापैकी मोठ्या प्रमाणात गुरू नानकांचे अनुयायी आहेत. इथे त्यांना नानक पंथी म्हणून ओळखलं जातं. मंदिरात गुरुग्रंथ साहिबची प्रत हमखास दिसते. पण आता शीख लोक स्वतंत्र गुरुद्वारा बांधत आहेत. त्या ठिकाणी इतर कोणत्याही धर्माची पूजा होत नाही.

प्रतिमा मथळा सरदार हीरा सिंग

सरदार हीरा सिंग पुढे सांगतात, "मूर्तिपूजा करू नका, असं गुरू नानक सांगतात. ते मूर्तिपूजेसंदर्भातले गुरूंचे विचार मानत नसतील तर आम्ही त्यांना का स्वीकारावं?"

'शिखांना जास्त स्वीकृती'

पाकिस्तानातील हिंदू कौन्सिलच्या नेत्या मंगला शर्मांच्या मते धर्मांतराच्या मागे राजकीय कारणं आहेत.

20 ते 25 वर्षांपूर्वी इथे एकही शीख नव्हता. पाकिस्तान नॅशनल असेंब्लीमध्ये अल्पसंख्याकांच्या जागांत एकही शीख जागा नव्हती.

त्या पुढं सांगतात, "2000नंतर काही राजकीय नेत्यांनी 'धर्म परिवर्तन' एक राजकीय मुद्दा केला. यातील हिंदू लोक आर्थिकदृष्ट्या कमजोर होते. शीख धर्म स्वीकारल्यावर त्यांना राजकीय लाभही झाला आहे."

मंगला शर्मा यांच्यानुसार, "पाकिस्तानातील हिंदूंना जागतिक पातळीवर कोणतंही समर्थन किंवा मदत मिळत नाही. भारताबरोबर पाकिस्तानचं शत्रुत्व असल्याने त्यांना भारताकडून मदत घ्यावीशी वाटत नाही."

"दुसऱ्या बाजूला जागतिक स्तरावर शीख समुदाय प्रभावी आहे. आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे. त्याच्यात समन्वय खूप चांगला आहे. पैसा आणि इतर गोष्टींमुळही लोक धर्मांतर करत आहेत", असं मंगला शर्मा यांनी सांगितलं.

Image copyright Getty Images

सिंध प्रांतात आणखी दोन कारणांमुळे शिखांना यश मिळालं आहे. एक - या राज्यात दारुबंदीला शीख नेत्यांनी पाठिंबा दिला. दुसरं, जनगणनेच्या वेळी शिखांसाठी वेगळा कॉलम असावा हा मुद्दा लावून धरण्यात. या दोन्ही वेळी त्यांना यश मिळालं.

मंगला शर्मा पुढे सांगतात, "जागतिक स्तरावरील शीख समुदाय पाकिस्तानला मित्रदेश मानतात. त्यामुळं पाकिस्तानमध्ये शिखांना सामाजिक, राजकीय आणि धार्मिक स्तरांवर अधिक प्रमाणात स्वीकारलं जातं."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)