2022 मध्ये कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषकाचं भवितव्य अधांतरी

कतार, फुटबॉल, विश्वचषक, राजकारण Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा विश्वचषकासाठीच्या स्टेडियमचं प्रस्तावित चित्र

कतारला मिळालेली फुटबॉल विश्वचषक आयोजनाची संधी राजकीय कारणांमुळे धोक्यात आली आहे. आयोजनासंदर्भात तयार करण्यात आलेल्या गोपनीय अहवालात ही भीती व्यक्त करण्यात आली आहे.

'कॉर्नरस्टोन ग्लोबल' या मॅनेजमेंट क्षेत्रातील कंपनीने तयार केलेला हा अहवाल बीबीसीकडे असून, त्यानुसार कतार विश्वचषकाचं आयोजन अधांतरी आहे.

विश्वचषकासाठी कतारमध्ये विविध वास्तू उभारणीसाठी 200 अब्ज डॉलर्स एवढी प्रचंड रक्कम गुंतवण्यात आली आहे. मात्र कॉर्नरस्टोन कंपनीनं विश्वचषकाचं आयोजन धोक्यात असल्याचं सांगितलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा विश्वचषकासाठी उभारण्यात येणार असलेल्या स्टेडियमचं संगणकप्रणाली निर्देशित चित्र

स्पर्धेशी निगडित महत्त्वाच्या व्यक्ती आणि आखाती देशांच्या तज्ज्ञांनी दोहा म्हणजेच कतारच्या राजधानीत विश्वचषक आयोजित होणं अवघड आहे, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

मात्र विश्वचषकाच्या डिलिव्हरी आणि लिगसी समितीनं स्पर्धेच्या आयोजनाला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

राजकीय घडामोडींचा परिणाम कतार विश्वचषकावर होणार नसल्याचं समितीनं स्पष्ट केलं आहे आणि अहवाल तयार करणाऱ्या कंपनीच्या हेतूबद्दल शंका व्यक्त केली आहे.

जागतिक फुटबॉलचं नियंत्रण करणाऱ्या फिफानं 2010 मध्ये कतारला 2022 विश्वचषक आयोजनाचे अधिकार बहाल केले. मात्र हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला.

पार्श्वभूमी

उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये कतारमधील वातावरण अतिउष्ण असते. हवेत प्रचंड आर्द्रता असते. या भौगोलिक कारणांमुळे विश्वचषकाच्या तारखा बदलून हिवाळ्याच्या हंगामात करण्यात आल्या.

Image copyright Neville Hopwood/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा विश्वचषकासाठीच्या स्टेडियमच्या उद्घाटनप्रसंगी

प्रादेशिक एकतेच्या दृष्टीनं ही स्पर्धा महत्त्वाची असेल असं संयोजकांनी सांगितलं. मात्र यंदा जूनमध्ये सौदी अरेबिया, बहरीन, इजिप्त यांच्यासह संयुक्त अरब अमिराती या शेजारी देशांनी कतारशी सर्वप्रकारचे संबंध तोडले.

आखाती प्रदेशाच्या एकात्मतेला धक्का लावणं आणि दहशतवादाचं समर्थन केल्याप्रकरणी शेजारी देशांनी कतारशी असलेले व्यवहार बंद केले आहेत.

दरम्यान आपल्यावरील आरोपांचं कतारने खंडन केलं असून संबंध पूर्ववत करण्यासाठीच्या सहकारी देशांनी सादर केलेल्या अटी स्वीकारायला नकार दिला आहे.

सौदी अरेबियाने कतारशी असलेली सीमारेषा सील केली आहे तर सौदीसह बहरीन, इजिप्त आणि संयुक्त अरब अमिरातीने कतारशी हवाई आणि समुद्रामार्गे वाहतूक बंद केली आहे.

अहवाल काय म्हणतो?

  • गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक वातावरणात व्यवसाय कसा करावा याविषयी सल्ला देणं आमचं काम आहे.
  • कतारमध्ये काम करणाऱ्या पाश्चिमात्य देशांच्या राजदूतांनी स्पर्धा आयोजन होईल की नाही, हे सांगता येणार नाही, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
  • विश्वचषक आयोजनासाठीच्या निविदा प्रक्रियेत तसंच पायाभूत सुविधांच्या उभारणीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप कतारवर आहे.
  • आखाती प्रदेशातील देशांनी कतारशी असहकार पुकारल्याने परिस्थिती चिघळली आहे.
  • कतारचं विश्वचषक आयोजन रद्द झाल्यास बांधकाम व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
  • विश्वचषकाशी निगडित यंत्रणांनी काम थांबवलेलं नाही. मात्र सहकारी देशांनी मदत पुरवठा बंद केल्यानं व्यावसायिकांच्या अडचणीत भर पडली आहे.
  • प्रकल्पासाठीचा खर्च 20 ते 25 टक्क्यांनी वाढला आहे.
  • सरकारी अधिकाऱ्यांच्या अतिरिक्त हस्तक्षेपाप्रकरणी कतार विश्वचषकाच्या सर्वोच्च समितीच्या अधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याची धमकी दिली आहे.

कतारची प्रतिक्रिया

अहवाल तयार करणाऱ्या कंपनीचे कतारशी असहकार पुकारणाऱ्या देशांशी दृढ संबंध आहेत. स्पर्धेच्या आयोजनाविषयी गोंधळ निर्माण करणं हाच अहवालाचा हेतू आहे, असं कतारनं म्हटलं आहे.

यामुळे कतारच्या नागरिकांमध्ये विदेशी संस्था आणि नागरिकांविषयी असंतोष वाढण्याची शक्यता आहे. विश्वचषक आयोजनाला कोणताही धोका नाही, असं कतारच्या आयोजकांचं म्हणणं आहे.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा विश्वचषकासाठी कतारमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू आहे.

दरम्यान सर्वंकष संशोधन करूनच अहवाल तयार करण्यात आल्याचं कॉर्नरस्टोन कंपनीनं म्हटलं आहे. हा अहवाल स्वतंत्र असून, यावर सरकार किंवा कोणत्याही संस्थेचा दबाव नाही.

प्रक्षेपण अडचणीत

कतार विश्वचषकाच्या प्रक्षेपणाचे अधिकार beIN Sports या वाहिनीकडे आहेत. सहकारी देशांनी साथ सोडल्यामुळे सामन्यांच्या प्रक्षेपणासाठी आवश्यक वस्तू कतारमध्ये पोहोचवणं अवघड होईल असं या चॅनेलनं बीबीसी स्पोर्ट्ला सांगितलं.

याप्रकरणी परिस्थितीवर आमचं लक्ष असल्याचं फिफाने म्हटलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)