राष्ट्रगीताला उभं राहण्यावरून आता अमेरिकेतही वाद

राष्ट्रगीतावेळी उभे प्रेक्षक Image copyright VP/Twitter
प्रतिमा मथळा राष्ट्रध्वजाचा आणि सैनिकांचा अपमान होईल त्या ठिकाणी आपण उपस्थित राहणार नाही-पेंस

भारतात राष्ट्रगीतावेळी उभं न राहणं किंवा ते न म्हणणं यावरून वाद होत असतात. अमेरिकेतही आता असे वाद सुरू झाले आहेत. ज्याचा थेट संबंध व्हाईट हाऊसपर्यंत जाऊन पोहोचला आहे.

फुटबॉल सामन्याआधी होणाऱ्या राष्ट्रगीतावेळी काही खेळाडूंनी गुडघे टेकवून निषेध व्यक्त केल्यानंतर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माइक पेंस हे नॅशनल फुटबॉल लीगचा सामना न पाहताच त्याठिकाणाहून निघून गेले.

"ज्या कार्यक्रमात आपल्या राष्ट्रध्वजाचा आणि सैनिकांचा अपमान होईल त्या ठिकाणी आपण उपस्थित राहणार नाही," असं त्यांनी नंतर ट्विट केलं आहे.

नेमका वाद काय?

कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ काही कृष्णवर्णीय खेळाडूंनी फुटबॉल सामन्याआधी झालेल्या राष्ट्रगीतावेळी आपले गुडघे टेकवले होते.

"जर त्यांनी राष्ट्रगीतावेळी आपले गुडघे टेकवले तर तुम्ही तिथून निघून जा," असं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पेंस यांना सांगितलं होतं. त्याप्रमाणेच पेंस यांनी केलं. "तुमच्या या कृतीचा मला अभिमान आहे," असं ट्वीट ट्रंप यांनी केलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप

राष्ट्रगीतावेळी गुडघे टेकवणं ही निषेधाची पद्धत अलीकडच्या काळात रूढ झाली आहे. ट्रंप यांनी यावरून खेळाडूंवर टीका देखील केली.

"जर खेळाडूंनी ही पद्धत बंद केली नाही तर नॅशनल फुटबॉल लीग बंद केलं जाईल," असं देखील त्यांनी धमकावलं.

"ज्या ठिकाणी आपल्या सैनिकांचा, ध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा अपमान होईल अशा कार्यक्रमास उपस्थित राहू नका असं मला राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं होतं," असं ट्वीट पेंस यांनी केलं.

Image copyright VP/twitter
प्रतिमा मथळा उप-राष्ट्राध्यक्ष माइक पेंस

राष्ट्रगीताचा सन्मान न करणं हे गांभीर्यानं घेतलं जाईल असा संदेश देण्यासाठी ते नेवाडा ते इंडियाना पोलीसला गेले आणि कॅलिफोर्नियाला परतले.

पेंस यांना हा खेळ पूर्ण पाहायचा होता की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

"हा खेळ पाहण्यास आपण उत्सुक आहोत" असं ट्वीट त्यांनी केलं होतं. पण, त्यांनी सुरुवातीलाच काढता पाय घेतल्यानं त्यांच्या स्टेडिअममध्ये येण्याच्या उद्देशावर तर्कवितर्क लावले जात आहेत.

राष्ट्रगीतावेळी 'सॅन फ्रान्सिस्को फोर्टी नाइनर्स' संघाच्या कॉलिन केपरनिकनं गुडघे टेकवले. हे पाहताच पेंस तिथून निघून गेले. त्यानंतर काही वेळातच ट्रंप यांचं ट्वीट आलं आणि मग पेंस यांनी आपली भूमिका मांडली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पोलिसांनी कृष्णवर्णियांवर केलेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून कॉलिन केपरनिकने गेल्या वर्षी पहिल्यांदा राष्ट्रगीतावेळी गुडघे टेकवले होते.

आता खरा प्रश्न हा आहे की खेळाडूंच्या शांततापूर्ण निदर्शनाला उप-राष्ट्राध्यक्षांनी उत्तर देण्यासाठी आपला वेळ खर्च करणे योग्य आहे का?

तसंच आपला उद्देश काय आहे हे सांगण्यासाठी मुद्दामहून प्रवास करून करदात्यांचा पैसा बुडवण्याची गरज काय? असा प्रश्न अमेरिकेत विचारला जात आहे.

पेंस यांच्या या कृत्यामुळे ट्रंप समर्थक खूश झाले आहेत. ट्रंप यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिल्यामुळे पेंस यांच्यावर ते कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

खेळाडूंच्या या कृत्यामुळे अमेरिकेत वाद निर्माण झाला आहे. काही नागरिकांना हा पब्लिसिटी स्टंट वाटत आहे. या निषेधाच्या पद्धतीमुळे ते खेळाडूंवर नाराज आहेत. पण ट्रंप यांनी या वादात पडणं देखील नागरिकांना आवडलेलं नाही.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कॉलिन केपरनिक

ज्या वेळी उत्तर कोरिया आणि चक्रीवादळासारखे मुद्दे ऐरणीवर असताना पेंस यांनी राष्ट्रगीताच्या वादात पडणं लोकांना आवडलेलं नाही.

"प्रत्येकाला त्याचे विचार मांडण्याचा अधिकार आहे. पण ही निषेधाची अयोग्य पद्धत आहे. राष्ट्रगीतावेळी उभं राहणं त्यांना काही फार जड गेलं नसतं." असं पेंस यांनी नंतर ट्विट केलं

Image copyright Twitter

पोलिसांनी कृष्णवर्णियांवर केलेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून कॉलिन केपरनिकनं गेल्या वर्षी पहिल्यांदा राष्ट्रगीतावेळी गुडघे टेकवले होते. त्यानंतर जास्तीत जास्त सेलिब्रिटी खेळादरम्यान गुडघे टेकवून निषेध व्यक्त करत आहेत.

#TakeAKnee हे अमेरिकेत सोशल मिडियावर ट्रेंड होत आहे. काही खेळाडू राष्ट्रगीतावेळी एकमेकांचे हात पकडून उभे राहत आहेत. तर काही खेळाडू राष्ट्रगीतानंतरच ड्रेसिंग रूम बाहेर येतात.

त्यांच्या या वागण्यामुळे काही नागरिक नाराज आहेत तर काहींना हा शांततापूर्ण निषेधाचा मार्ग वाटतो.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)