गोध्रा स्टेशनवर साबरमती एक्सप्रेसच्या एस-6 डब्यात नेमकं काय झालं होतं?

गोध्रा रेल्वे स्टेशनच्या बॅकयार्डमध्ये ठेवलेले डबे Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा गोध्रा रेल्वे स्टेशनच्या बॅकयार्डमध्ये ठेवलेले डबे

2002 साली गोध्रा स्टेशनवर साबरमती एक्सप्रेसला आग लावल्याप्रकरणी गुजरात हायकोर्टाने 11 दोषींची शिक्षा कमी केली आहे. विशेष न्यायालयाने या 11 जणांना फाशीची शिक्षा दिली होती. त्यांना आता जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे.

पण 27 फेब्रुवारी 2002 रोजी नेमकं झालं तरी काय होतं? आणि त्याला जबाबदार कोण होतं? या भयंकर घटनेच्या आधी आणि नंतर काय झालं?

काय घडलं?

25 फेब्रुवारी 2002 रोजी उत्तर प्रदेशातल्या अयोध्या इथून 2000 हून जास्त कारसेवक अहमदाबादला जाण्यासाठी साबरमती एक्सप्रेसमध्ये बसले. अयोध्येत बाबरी मशीद पाडली, त्या वादग्रस्त जागी मंदिर उभारण्याचा विश्व हिंदू परिषद आणि आणखी काही संस्थांचा प्रयत्न आहे.

त्या कार्यक्रमाचा भाग म्हणून विश्व हिंदू परिषदेने पूर्णाहुती यज्ञाचं आयोजन केलं होतं. त्यात सहभागी होण्यासाठी ही मंडळी गुजरातहून अयोध्येला गेली होती.

27 फेब्रुवारी 2002चा दिवस उजाडला तेव्हा साबरमती एक्सप्रेस चार तासांच्या उशिराने धावत होती. तो बुधवारचा दिवस होता. सकाळी 7 वाजून 43 मिनिटांनी गाडी गोध्रा स्टेशनवर थांबली. हा या गाडीचा ठरलेला थांबा होता.

Image copyright SEBASTIAN D'SOUZA/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा साबरमती एक्सप्रेसच्या जळालेल्या डब्यांचे संग्रहित छायाचित्र

काही वेळातच गाडी प्लॅटफॉर्मवरून निघाली. ती थोडी पुढे जाते न जाते तोच कुणीतरी चेन ओढली. काही अंतरावर जाऊन फालिया नावाच्या सिग्नलजवळ निळ्या रंगाची साबरमती एक्सप्रेस उभी राहिली.

काय होतंय हे कळण्याच्या आत गाडीभोवती सुमारे 2000 लोकांचा जमाव गोळा झाला. या बाहेर जमलेल्या लोकांनी गाडीवर तुफान दडगफेक सुरू केली.

आतल्या बेसावध लोकांना काही कळण्याच्या आतच चार डब्यांना आग लावण्यात आली.

या आगीत 59 लोकांचा जळून मृत्यू झाला. त्यात 27 महिला आणि 10 मुलं होती. इतर 48 जण जखमी झाले.

कुणी केलं?

गुजरात सरकारने या घटनेच्या चौकशीसाठी नानावटी आयोग नेमला. या आयोगानं 2008 मध्ये सोपवलेल्या अहवालानुसार गोध्रामधली घटना हा नियोजनबद्ध कट होता.

2005मध्ये लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना केंद्र सरकारनं UC बॅनर्जी समिती स्थापन केली. या समितीने चौकशीनंतर 2006 मध्ये अहवाल सोपवला. त्यात ही घटना षड्यंत्र नसून फक्त दुर्घटना होती, असं म्हटलं होतं.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा संग्रहित छायाचित्र

सुप्रीम कोर्टाने बॅनर्जी समितीचा अहवाल अवैध असल्याचं सांगत विशेष तपास पथक (SIT) स्थापन केलं.

विशेष कोर्टाने 2011 साली 31 जणांना या घटनेसाठी दोषी धरलं आणि 63 जणांना निर्दोष मुक्त केलं. पोलीस ज्या मौलवी सईद उमरकडे मुख्य सूत्रधार म्हणून बघत होते, त्याला कोर्टाने मुक्त केलं.

ज्या 31 जणांना दोषी ठरवलं, त्यांपैकी 20 जणांना जन्मठेप तर 11 जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. हायकोर्टाने आता त्या 11 जणांनाही जन्मठेपेचीच शिक्षा दिली आहे.

का केलं?

या ट्रेनला आग कशी लागली हे आज 15 वर्षांनंतरही एक रहस्यच आहे. पोलिसांनी आरोपपत्रात म्हटलं होतं की मौलवी सईद उमरने बाबरी मशीद पाडल्याचा बदला घेण्यासाठी कारसेवकांवर हल्ला करण्याचा कट रचला होता. पण कोर्टाने सईदला निर्दोष ठरवल्यामुळे पोलिसांचा हा दावा फोल ठरला.

प्रतिक्रिया काय उमटल्या?

गोध्रामधल्या घटनेच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेने गुजरात बंदची हाक दिली. बातमी जशी पसरली, तसं वातावरण तापू लागलं. 28 तारखेला, म्हणजे ट्रेनला आग लावल्यानंतर एकाच दिवसात गुजरातमधल्या 27 शहरांत कर्फ्यू लावावा लागला. अहमदाबाद आणि बडोद्यातली स्थिती जास्त चिंताजनक होती.

अनेक ठिकाणी मुस्लीम वस्त्यांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या. नंतर हिंदू वस्त्यांवर हल्ले झाल्याच्या घटनाही नोंदवल्या गेल्या.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा गोध्रा रेल्वे स्टेशन परिसराचं संग्रहित छायाचित्र

पुढचे तीन महिने गुजरात धगधगत होतं. त्यात सरकारी आकड्यांनुसार 1044 लोकांचे जीव गेले, 223 जण हरवले आणि 2500 लोक जखमी झाले. काही बिगरसरकारी संस्थांचा दावा आहे की मृतांचा आकडा बराच जास्त आहे.

मृतांपैकी 790 मुस्लीम होते तर 254 हिंदू होते.

देशाच्या राजकारणाला कलाटणी?

गुजरातमध्ये दंगली उसळल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर चहू बाजूंनी टीका झाली. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनीही नाराज असल्याचे संकेत दिले.

अशातच मोदींनी विधानसभा निवडणुकीच्या आठ महिने आधीच राजीनामा दिला. त्यामुळे गोध्रा घटनेनंतर केवळ 10 महिन्यांतच, म्हणजे डिसेंबर 2002मध्ये निवडणुका झाल्या.

या निवडणुकांत गोध्रा आणि त्यानंतर उसळलेल्या दंगली हाच मोठा विषय होता. यात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं.

ही निवडणूक मोदींच्या पुढच्या राजकीय वाटचालीला कलाटणी देणारी ठरली, असं विश्लेषक मानतात.

सध्या काय परिस्थिती?

गोध्रा स्टेशनच्या बॅकयार्डमध्ये या घटनेची भयानकता आजही अनुभवता येते. एस6 आणि एस7 या जळालेल्या डब्यांच्या सुरक्षेसाठी गुजरात रेल्वे पोलीस सुरक्षा दलाची एक तुकडी नेहमी तैनात असते. चार सुरक्षारक्षकांची तुकडी शेजारीच बनविलेल्या एका खोलीत राहतात.

रेल्वे स्टेशन भागातल्या दुकानदारांना हे डबे इथून हलवले जावेत असं वाटतं. 27 फेब्रुवारीला दरवर्षी या भागात कर्फ्यूसारखी स्थिती निर्माण होते.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)