उत्तर कोरिया : किम जाँग-उन का म्हणतायत 'बहीण माझी लाडकी'!

किम जाँग-उन यांची बहीण किम यो-जाँग. Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा किम जाँग-उन यांची बहीण किम यो-जाँग.

आज दोन्ही कोरियांसाठी ऐतिहासिक क्षण आहे. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांनी सीमोल्लंघन करत दक्षिण कोरियाचे नेते मून जे-इन यांच्याशी चर्चा केली.

या बैठकीसाठी दोन्ही राष्ट्रांचे काही खास लोकच उपस्थित होते. उत्तर कोरियाकडून किम यांच्यासोबत राजदूत, संरक्षण मंत्री, राष्ट्राचे इतर ज्येष्ठ नेते, किम यांचे राजकीय गुरू, असं एक मार्गदर्शक मंडळच आलं होतं. सोबत आणखी एक महत्त्वाची व्यक्ती होती ती म्हणजे किम जाँग-उन यांची बहीण किम यो-जाँग.

किम यांनी या ऐतिहासिक प्रसंगात आपल्या बहिणीला सहभागी करत त्यांच्या महत्त्व आणखी वाढवलं आहे. म्हणून त्यांच्याविषयी जगभरात कुतूहल वाढलं आहे.

जगापासून नेहमीच अंतर राखून राहिलेल्या या देशाची सत्ता 1948 सालापासून किम यांच्याच परिवाराच्या हातात आहे.

कुणाची लेक?

किम जाँग-उन यांचे वडील किम जाँग-इल यांनी पाच विवाह केले होते. त्यातून त्यांना एकूण सात मुलं होती. किम जाँग-उन यांचं तिसरं लग्न हे इल या नर्तिकेशी झालं. या तिसऱ्या पत्नीपासून त्यांना तीन मुलं झाली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा किम जाँग-इल यांना त्यांच्या तिसऱ्या पत्नीपासून किम जाँग-उन आणि यो-जाँग ही मुलं झाली.

किम जाँग-उन आणि किम यो-जाँग या भावडांना आणखी एक भाऊ आहे, त्याचं नाव किम जाँग-चोल. या तीन भावडांमध्ये यो-जाँग सगळ्यांत धाकटी आहे.

सगळ्यांत लाडकी बहीण

यो-जाँग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1987 रोजी झाला. किम जाँग-उन यांच्यापेक्षा त्या चार वर्षांनी लहान आहेत. किम जाँग-चोल आणि किम जाँग-उन यांची लाडकी बहीण मानली जाते.

लोकांशी प्रेमपूर्वक बोलणाऱ्या यो जाँग मितभाषी म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात 'टॉम बॉय'ची प्रतिमा दिसत असल्याचंही बोललं जातं.

सन 1996 ते 2000 दरम्यान त्यांनी स्वित्झर्लंडच्या बर्न या शहरात शिक्षण घेतलं. किम जाँग-उनसुद्धा याच वेळी तिथे शिकत होते. त्याकाळातही त्यांना सुरक्षा रक्षकांचा गराडाच असायचा.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा किम यो-जाँग ही किम जाँग-उनची लाडकी बहीण मानली जाते.

एकदा तिला साधी सर्दी झाली तरीही लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, अशी माहिती त्या महाविद्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

यो-जाँग यांनी त्यांच्या पक्षाचे सचिव चोए याँग-हे यांच्या मुलाशी लग्न केल्याचं बोललं जातं.

भावाच्या प्रतिमेची काळजी घेणारी

2012मध्ये वडिलांच्या अंत्यविधीत त्या सहभागी झाल्या होत्या. त्याच वेळी त्या प्रथम जगासमोर आल्या. त्यानंतर त्या थेट 2014 मध्ये भावाच्या सत्तारोहणाच्या सोहळ्यात दिसल्या.

2014 सालापासून त्या पक्षाच्या प्रचार प्रमुख म्हणून किम जाँग-उन यांची प्रतिमा चांगली राखण्याचं काम करत होत्या.

मात्र काही महिन्यांपूर्वी किम यांनी त्यांच्यावर सत्ताधारी पक्षाची मोठी जबाबदारी सोपवली. त्यांना पॉलिट ब्युरोची सदस्य बनवलं. या पॉलिट ब्युरोच्या माध्यमातूनच किम जाँग-उन मोठे निर्णय घेतात.

कधी राजकीय सल्लागार, कधी प्रतिनिधी

त्या किम जाँग-उन यांच्या राजकीय सल्लागार म्हणूनही काम पाहतात. तसंच भाऊ किम यांची प्रचार यात्रा आणि त्यासाठी लागणाऱ्या सामग्रीच्या पुरवठ्याकडे त्या बारकाईने लक्ष देतात. म्हणूनच किम जाँग-उन देशाच्या दौऱ्यावर असताना अनेकदा किम यो-जाँग त्यांच्याबरोबर दिसतात. पक्षाच्या प्रचार मेळाव्यांमध्ये त्यांची लक्षणीय उपस्थिती असते.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा किम यांनी या ऐतिहासिक क्षणाचा भाग तिला बनवत त्यांच्या बहिणीचं महत्त्व आणखी वाढवलं आहे

ऑक्टोबर 2015 मध्ये यो-जाँग नीट काम करत नसल्यानं त्यांना प्रचार प्रमुख पदावरून किम जाँग-उन यांनी काढल्याच्या बातम्याही पसरल्या होत्या.

गेल्याच महिन्यात दक्षिण कोरियात झालेल्या विंटर ऑलिंपिक्ससाठी किम यांनी यो-जाँग यांना उत्तर कोरियाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवलं होतं. त्यामुळे दक्षिण कोरियात आता त्या सेलिब्रिटी आहेत तसंच त्या किम यांच्या शिष्टमंडळाच्याही प्रमुख आहेत, असं बीबीसी प्रतिनिधी रूपर्ट विंगफिल्ड-हेज यांनी सांगितलं.

हेही नक्की पाहा?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : उत्तर आणि दक्षिण कोरिया कशावर बोलणार नाहीत!

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)