दक्षिण कोरियाच्या गोपनीय माहितीवर उत्तर कोरियाचा डल्ला

उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, अण्वस्त्रं, Image copyright AFP
प्रतिमा मथळा उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन

उत्तर कोरियाच्या हॅकर्सनी दक्षिण कोरियाच्या सैन्याच्या गोपनीय माहितीवर कब्जा मिळवला आहे. विश्वसनीय सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

गोपनीय माहितीचा ताबा मिळवत उत्तर कोरियानं देशप्रमुख किम जोंग उन यांना मारण्याची दक्षिण कोरियाची योजना हॅक केली आहे.

मिसाइल चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर उत्तर आणि दक्षिण कोरियातले संबंध ताणले गेले आहेत.

उत्तर कोरियानं चोरलेली माहिती आमच्या संरक्षण मंत्रालयासंदर्भात असल्याचं दक्षिण कोरियाच्या संसदपटू री शियोल यांनी सांगितलं.

मिसाइल चाचण्यांच्या मुद्यावरून अमेरिका आणि उत्तर कोरियात युद्ध झाल्यास युद्धनीतीचे डावपेच तसंच बचावासाठीच्या उपाययोजना अशा संवेदनशील गोष्टींचा चोरलेल्या माहितीत समावेश आहे.

सैन्य प्रमुखांसंदर्भातली माहितीही उघड?

अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या सैन्यप्रमुखांविषयीचा तपशीलही चोरलेल्या माहितीत आहे. दरम्यान याप्रकरणावर दक्षिण कोरियाने कोणतेही भाष्य केलेलं नाही.

235 जीबी डेटा लंपास

दक्षिण कोरिया सैन्याबाबतचा महत्त्वाचा तपशील, सुरक्षेच्या दृष्टीनं संवेदनशील वीजप्रकल्प तसंच सैन्याच्या विविध तळांबद्दलची माहिती उत्तर कोरियानं मिळवली आहे.

सैन्याचा तब्बल 235 गिगाबाइट डेटा 'डिफेन्स इंटिग्रेटेड डाटा सेंटर'मधून गहाळ झाल्याचं री शियोल यांनी सांगितलं. चोरी झालेल्या माहितीपैकी 80 टक्के माहितीची शहानिशा होणं बाकी आहे असंही त्यांनी सांगितलं.

गेल्यावर्षीची घटना

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात दक्षिण कोरियाची माहिती मोठ्या प्रमाणावर हॅक झाली होती. दक्षिण कोरियानं यंदा मे महिन्यात ते मान्य केलं होतं.

तसंच त्यामागे उत्तर कोरियाचा हात असल्याचा आरोप दक्षिण कोरियानं केला होता. मात्र यापेक्षा दक्षिण कोरियानं काहीही स्पष्ट केलं नाही. उत्तर कोरियानं दक्षिण कोरियाच्या आरोपांचं खंडन केलं होतं.

गेल्या काही वर्षात उत्तर कोरियानं सातत्यानं सायबर हल्ले केल्याचं दक्षिण कोरियातील सरकारी वृत्तसंस्था योनहॅपनं म्हटलं आहे. सरकारी ठिकाणं आणि वेबसाइट्स या हल्ल्याचं लक्ष्य असल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं होतं.

हॅकर्सची फौज

सायबर हल्ले करण्यासाठी उत्तर कोरियानं हॅकर्सची फौज तयार केल्याचं स्पष्ट झालं आहे. चीनसह अन्य देशात या हॅकर्सना धाडण्यात आलं.

मात्र आम्ही हॅकर्सची फौज तयार केल्याची अफवा पसरवण्यात आल्याचं उत्तर कोरियानं म्हटलं आहे.

या माहितीचोरीचा उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील ताणलेल्या संबंधावर काहीही परिणाम होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

उत्तर कोरिया-अमेरिका द्वंद् सुरूच

मिसाइल चाचण्यांवरून अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात आरोपांच्या फैरी झडत आहेत. उत्तर कोरियानं मिसाइल चाचण्या बंद कराव्यात अशी अमेरिकेची मागणी आहे.

दुसरीकडे आण्विक क्षमता वाढवणार असल्याचं प्रत्युत्तर उत्तर कोरियानं दिलं आहे.

काही दिवसांपूर्वीच क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून मारा करता येईल असे हायड्रोजन बॉम्ब तयार केल्याचा दावा उत्तर कोरियाने केला होता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी एकमेकांना अनेकदा धमक्याही दिल्या आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)